शाळासिध्दी
लेखमाला - 2
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम -
शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे
सामर्थ्य स्त्रोत – क्रीडांगण, क्रीडा साधने / साहित्यासह
(क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 2 )
क्रीडांगण, क्रीडा
साधने / साहित्यासह
बालकाच्या सर्वांगिण विकासामध्ये शारीरिक
विकास महत्वाचा असतो. व्यक्तीच्या एकूणच जीवनामध्ये शरीर निरोगी
व बलवान असणे आवश्यक असते. व्यक्तीच्या जन्मानंतर टप्प्या टप्प्याने
शारीरीक विकास होत असतो. शारीरिक विकासाचा परीणाम आरोग्य व वर्तनावर
होत असतो. विविध प्रकारचे व्यायाम, विविध
प्रकारचे खेळ, कृती, नाचणे, गाणे इत्यादी कृतीमधून शारीरिक विकास होत असतो.
लहान मुलांचा स्वभाव खेळकर असतो. छोट्या मोठ्या
खेळामधून बालके आनंद मिळवत असतात. वेगवेगळया व्यायाम प्रकारामधून
व खेळामधून बालकांच्या वेगवेगळ्या अंगाचा विकास होत असतो. शाळेमध्ये
क्रीडांगण उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यांना वरीलप्रकारचे वेगवेगळे खेळ खेळता येतात.
अध्ययन अध्यापन यामधून आलेला कंटाळा खेळामुळे दूर होतो.
राज्यात क्रीडा संस्कृतीचा प्रसार व जोपासना होण्यासाठी
पोषक वातावरण तयार
करणे आवश्यक आहे हे जाणून महाराष्ट्र राज्याने स्वतंत्र क्रीडा धोरण
जाहीर केलेले आहे. अशा प्रकारे स्वतंत्र क्रीडा धोरण जाहीर करणारे
महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. सन 1996 च्या क्रीडा धोरणामध्ये खेळाडू तयार करणे, सन
2001 च्या क्रीडा धोरणामध्ये खेळाद्वारे सर्वांसाठी सुदृढता या बाबी
केंद्रस्थानी ठेऊन क्रीडा धोरण तयार करण्यात आले होते. राज्य
क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य राहावे, नागरिकांमध्ये व्यायामाची
आवड जोपासावी, राज्यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय
दर्जाचे खेळाडू तयार व्हावे यासाठी सुधारीत क्रीडाधोरण 2012 मध्ये
तयार करण्यात आले. या धोरणानुसार प्रत्येक शाळेमध्ये क्रीडांगण
व क्रीडासाहीत्याची आवश्यकता स्पष्ट केलेली आहे. राज्याच्या क्रीडा
धोरणामध्ये शाळा संबंधी खालील महत्वपूर्ण घटकांचा समावेश करण्यात
आलेला आहे.
1.
शालेय क्रीडास्पर्धा
2.
शाळांचा तालुका / जिल्हा / राज्य क्रीडास्पर्धामध्ये सहभाग
3.
जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविण्या-या शाळांना
प्रोत्साहनात्मक अनुदान
4.
खेळाडूंना शिष्यवृत्ती
5.
खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत आरक्षण व थेट नियुक्ती
6.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये योगासनाचे महत्व जागविणे.
7.
खेळांसाठी जादा तासिका उपलब्ध करुन देणे तसेच क्रीडा/ शारीरिक शिक्षण या
विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करणे.
8.
शारीरिक शिक्षण या विषयासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष
मूल्यमापन कार्यपध्दती.
याबरोबरच शासन स्तरावरुन क्रीडांगण व क्रीडा साधनांच्या
बाबतीत विविध आयोग, समिती , शासन निर्णय व परिपत्रके
प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. डॉ यशपाल यांच्या कमिटीने ज्या
महत्वपूर्ण शिफारशी केलेल्या आहेत. त्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा
विशेष उल्लेख केलेला आहे. इयत्ता 1 ली ते
10 वी तील विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रकात क्रीडा या विषयासाठी आठवड्याला
किमान 5 तासिका असाव्यात असे नमूद केलेले आहे. वेळापत्रकात जरी 5 तासिका
क्रीडा विषयासाठी राखून ठेवलेल्या असल्या तरी प्रत्यक्षात या तासिकांच्या वेळेमध्ये इतर विषयाच्या तासिका घेण्यात येतात. वेळापत्रकाची
प्रभावी अंमलबजावणी करुन क्रीडा विषयाच्या तासिका क्रीडा विषयासाठीच उपयोगात आणाव्यात
तसेच खेळासाठी पोषक शरीर रचनेची गरज पाहता वेळापत्रकांना मंजूरी देत असतांना सकाळच्या सत्रातील शाळांनी वेळापत्रकातील पहिल्या तासिका
क्रीडा विषयासाठी ठेवाव्यात. दूपारच्या सत्रातील शाळांनी
वेळापत्रकातील शेवटच्या तासिका क्रीडा विषयासाठी ठेवाव्यात. अशाप्रकारे दररोज किमान एक तासिका खेळासाठी अनिवार्य करण्याचे नमूद केलेले
आहे. अध्ययनाचे ओझे ही संकल्पना स्पष्ट करतांना कमिटीने
विद्यार्थ्यांच्या मनावर “न समजता केलेल्या अध्ययनाचे
ओझे असते”
असे
स्पष्ट केलेले आहे. अशाप्रकारचे मनावरील ओझे कमी करण्यासाठी खेळ/
क्रीडा प्रकार उपयोगी असतात. कर्नाटक मधील एका
शाळेत शनिवारी दप्तराविना शाळा भरते. या
दिवशी विद्यार्थी विना गणवेश विना दप्तर शाळेत येतात. आवडीनुसार वेगवेगळे खेळ प्रकार खेळतात. त्यामुळे त्यांच्यामधील अध्ययनाचा ताण तर जातोच शिवाय व्यायामाची व खेळाची आवड निर्माण होते. कुमठे बीट, सातारा
येथील शाळांमधून क्रीडांगणावर विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खेळांचा सराव
दिला जातो. खेळातून शिक्षण, आनंददायी अध्यापन
पध्दती विद्यार्थी सर्वांगिण विकासात महत्वाची ठरते. “Our Children
Deserve The Best” प्रत्येक मुलाला
गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी अध्यापन पध्दती ही कृतियुक्त व आनंददायी असणे
आवश्यक असते. कृतियुक्त खेळ व अध्ययन अध्यपनात क्रीडांगण व क्रीडासाहीत्याचे स्थान
महत्वाचे आहे.
केंद्रीय सल्लागार मंडळ दिल्लीच्या शालेय बांधकाम
समितीच्या मतानुसार (1986) माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेसाठी 160 विद्यार्थ्यासाठी 2 ते 3 एकर, 320 विद्यार्थ्यांसाठी
4 ते 5 एकर, 480 विद्यार्थ्यांसाठी
6 ते 7 एकर क्रीडांगण असायला हवे.
v केवळ मोकळे मैदान
म्हणजे क्रीडांगण नव्हे.
v विशिष्ट खेळासाठी
तज्ञांकडून क्रीडांगणे तयार करुन घ्यावी.
v प्रत्येक खेळासाठी
आखिव व तयार केलेले क्रीडांगण असावे.
v सर्व क्रीडांगणाला
भिंतीचे किंवा तारेचे कुंपण असावे.
v कोणत्या वर्गाने
कोणत्यावेळी क्रीडांगणाचा वापर करावा याचे वेळापत्रक असावे.
v क्रीडासाहीत्य
ठेवण्याची स्वतंत्र सोय असावी..
v शाळेत किमान चार
खेळाची मैदाने आखलेली असावी.
अ)
सांघिक खेळ
कबड्डी – लहान गट - लांबी 11 मीटर
× रुंदी 8 मीटर , कर्ण 13.60 मीटर
मोठा गट - लांबी 12.50 मीटर × रुंदी 10 मीटर , कर्ण 16.00 मीटर
खो खो – लहान गट - लांबी 25 मीटर
× रुंदी 14 मीटर ,
दोन खुंटामधील अंतर 19.90
मीटर, खुंटाची उंची 1 मीटर
मोठा गट - लांबी 29 मीटर
× रुंदी 16 मीटर ,
दोन खुंटामधील अंतर 23.50
मीटर, खुंटाची उंची 1.2 मीटर
व्हॉलीबॉल - लांबी 18 मीटर × रुंदी
9 मीटर , कर्ण 20.13 मीटर
क्रिकेट –
खेळपट्टी दोन विकेटमधील लांबी 20 मीटर ,
रुंदी 5 फूट.
आ) वैयक्तिक खेळ
लांब उडी – खड्ड्याचा
आकार लांबी 9 मीटर × रुंदी 2.75 मीटर (खड्ड्यात वाळू असावी.)
धावपट्टी लांबी 20 ते 30 मीटर ×
रुंदी 1.22 मीटर
उंच उडी – खड्ड्याचा
आकार लांबी 5 मीटर × रुंदी 3 मीटर (खड्ड्यात वाळू असावी.)
धावपट्टी लांबी
25मीटर × रुंदी 1.22 मीटर
शालेय क्रीडांगण व साहीत्याबाबतीत काही महत्वाचे संदर्भ -
1.
केंद्र शासनाच्या Whole School Development Plan नुसार
प्राथमिक शाळेसाठी 4000 चौरस मीटर क्रीडांगण असावे.
2.
National Building Code नुसार शाळेकरीता
0.40 हेक्टर जागा (एक एकर) म्हणजेच 4000 चौरस मीटर असावी. पैकी 2000 चौरस मीटर क्रीडांगणासाठी क्षेत्र असावे.
3.
केंद्र शासनाच्या 26 आक्टोबर 2012 च्या पत्रान्वये प्रत्येक शाळेच्या आवारात शाळा व्यवस्थापन समितीने
खेळण्यासाठी जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे.
4.
शाळेकरीता किमान क्षेत्रफळाचे क्रीडांगण उपलब्ध नसल्यास
शाळेच्या आसपास असलेल्या परिसरामध्ये शाळा व्यवस्थापन समितीने बालकांना खेळण्यासाठी
संबंधिताकडून
( ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगर पालिका , खाजगी
मालकीची जागा ) यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन तात्पुरत्या स्वरुपात
क्रीडांगण उपलब्ध करुन द्यावे.
5.
क्रिडांगणाच्याबाबतीत सुधारीत निकष - बालकाच्या मोफत
व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 व शासन निर्णय दिनांक 29 जून 2013 नुसार 500 विद्यार्थी
संख्या असलेल्या शाळेमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार क्रीडांगणाचे क्षेत्र
2000 चौरस मीटर (20 गुंठे ) इतके असावे. तसेच शाळेतील विद्यार्थी संख्या कमी असल्यास
18 मीटर × 36 मीटर म्हणजेच 648 चौरस मीटर ( 6 गुंठे ) इतके किमान
क्षेत्रफळाचे क्रीडांगण असावे.
शासन निर्णयामध्ये शालेय क्रीडांगण व क्रीडा साधनामध्ये शाळेत किमान कोणकोणत्या
बाबी असायला हव्यात याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक शाळेने वरील निकषाची
पूर्तता करण्याचे सांगितले आहे. शाळा जर वरील निकषाची पूर्तता
करीत नसेल तर पूर्ततेसाठी तीन वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे. शाळासिध्दी कार्यक्रमात प्रत्येक गाभामानकांचा विचार उपलब्धता, पर्याप्तता व उपयोगीता या तीन दृष्टीकोनामधून केला जातो.
शालेय क्रीडांगण व
क्रीडा साधने उपलब्ध आहे काय ?
शालेय क्रीडांगण व
क्रीडा साधने पर्याप्त आहे काय ?
शालेय क्रीडांगण व
क्रीडा साधने उपयोगी आहे काय ?
या तीन प्रश्नांची उत्तरे ही प्रत्येक शाळेने स्वत: च्या विकासासाठी
प्रामाणिकपणे दिल्यास त्या शाळेची गुणवत्ता दिसून येते. एखाद्या
शाळेत क्रीडांगण व क्रीडा साधने आहे ही झाली उपलब्धता. क्रीडांगण व
क्रीडा साधने ही निकषानुसार विद्यार्थीसंख्येनुसार
आहे, ही झाली पर्याप्तता. या दोन्ही पेक्षा महत्वाचे ठरते
ती आहे उपयोगिता . उपयोगिता म्हणजेच गुणवत्ता. शाळेतील क्रीडांगणावर विद्यार्थी शालेय वेळेशिवाय इतर वेळेत व सुटीमध्ये सुध्दा
व्यायाम व शारीरिक विकासाच्या खेळासाठी हजर असतात. जिल्हास्तरीय
, राज्यस्तरीय क्रीडास्पर्धामध्ये सहभागी होतात ही झाली गुणवत्ता.
शाळासिध्दी कार्यक्रमामध्ये या तीन प्रश्नावर आधारीत वर्णन विधाने आहेत.
वर्णन विधाने ही देखिल उपलब्धता, पर्याप्तता व
उपयोगीता अशीच गुणवत्ता दर्शवितात. प्रत्येक शाळेने या तीन प्रश्नानुसार
व वर्णन विधानानुसार आपल्या शाळेची स्तर निश्चिती करावयाची असते. निवडलेल्या वर्णन विधानानुसार आपल्या शाळेची नेमकी स्थिती समजल्यानंतर शाळेला
आपल्या विकासाचा आराखडा तयार करता येतो. विकास आराखड्याचा पुढील
टप्पा कोणता याचे ही मार्गदर्शन शाळासिध्दी वर्णन विधाने करतात. या आराखड्यामध्ये विकासाचा प्राधान्यक्रम
ठरऊन नियोजनबध्द पध्दतीने शाळेचा विकास करता येतो. यामध्ये एक
वर्षात साध्य करावयाची भौतिक सुविधा व गुणवत्ता, दोन वर्षात साध्य
करावयाची भौतिक सुविधा व गुणवत्ता, तीन वर्षात साध्य करावयाची
भौतिक सुविधा व गुणवत्ता निश्चित करता येते. क्रीडांगण व क्रीडा साधनांशी संबंधीत खालील
प्रश्न मूल्यमापन प्रक्रीयेमध्ये विचारले जातात. उपयुक्तता किंवा गुणवत्ता केवळ याच
प्रश्नाशी संबंधित आहे असे नाही. सदर प्रश्न हे केवळ त्या गाभामाणकांच्या
विषयी माहीती घेण्यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात विचारण्यात आले आहेत. या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा गुणवत्ता ही मोठी बाब आहे.
क्रीडांगण व
क्रीडा साधनांच्या बाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले
जातात.
1) क्रीडांगणाचे
क्षेत्रफळ ( उपलब्ध असल्यास ) - (चौरस मीटरमध्ये)
2) क्रीडांगण नसल्यास शाळेतील मोकळ्या जागेचे क्षेत्रफळ - (चौरस मीटर मध्ये)
3) क्रीडांगण
उपलब्ध नसल्यास पर्यायी व्यवस्था कोणती आहे ?
4) क्रीडेसाठी
खेळासाठी राखीव वेळ ठेवला आहे काय ?
5) शालेय
क्रीडा स्पर्धा होतात काय ?
6) क्रीडांगणावर
कोणकोणती मैदाने आखलेली आहेत- (शाळेत किमान चार मैदाने आखलेली
असावीत.)
7) क्रीडेसाठी
प्रशिक्षक प्रशिक्षण सुविधा आहे काय ?
8) क्रीडांगणावर
खेळाचे साहित्य पुरेसे उपलब्ध आहे काय? (प्रत्येक विद्यार्थ्यास साहित्य
मिळावे इतपत )
9) खेळाच्या
साहित्याचा विद्यार्थी नियमित वापर करतात काय ?
10) खेळ, क्रीडा ,इतर सहशालेय उपक्रमांची यादी, विविध उपलब्ध उपकरणे साहित्य यांची यादी समर्थक पुरावे, क्रीडांगण /मैदान जागा क्षेत्रफळ मालकी हक्क
याबाबतची कागदपत्रे,उतारे, पुरावे उपलब्ध
आहेत काय ?
11) शाळेला स्वतःचे क्रिडांगण नसल्यास ज्यांचे असेल त्यांचे ना हरकत
प्रमाणपत्र आहे काय ?
12) मागील वर्षी घेतलेल्या विविध
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नोंदी आहे काय ?
13) क्रीडा साहित्य खरेदी केल्याचा दिनांक व साठा
नोंदवही आहे काय ?
14) क्रीडा , खेळासाठीचे
वेळापत्रक व प्रशिक्षक माहिती क्रीडा स्पर्धा सहभाग व प्रमाणपत्रेआहेत काय ?
15) कलाशिक्षण व इतर सहशालेय उपक्रमांची यादी तसेच उपकरणे व साधने साठानोंदवही
आहे काय?
वरील प्रश्नांचा हेतू हा क्रीडांगण व क्रीडा साधनांशी संबंधीत माहीती
मिळविणे या बरोबरच शालेय क्रीडांगण व क्रीडा साधनांचे संपूर्ण चित्र समोर उभे
करणे आहे.
स्वयं मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन करण्याआधी मुख्याध्यापक व निर्धारकांनी
वरील माहीतीचा अभ्यास शाळा विकासाच्या दृष्टीकोनातून करणे आवश्यक आहे. वरील माहीती मिळविल्यानंतरच वर्णनविधाने अभ्यासणे उचित
ठरते. शाळासिध्दी कार्यक्रमामध्ये उपलब्धता, पर्याप्तता व उपयोगिता या तीनही दृष्टीकोनातून वर्णनविधाने तयार केलेली आहे.
त्यानुसार गुणदान केलेले आहे. मुख्याध्यापक व निर्धारकांनी
वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे ठरवावे.
वर्णनविधानाची निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1)
a) क्रीडांगण उपलब्ध नाही शेजारील शाळेचे मैदान अथवा
सामाजिक जागेचा वापर शाळा प्रसंगी करते. मर्यादित उपकरणे व साहित्य उपलब्ध
आहे अथवा अभाव आहे.
b) विद्यार्थी
कधीकधी केवळ तेच खेळ खेळताना दिसतात ज्यांना कमीत कमी साहित्याची गरज असते किंवा
साहित्य लागत नाही. मार्गदर्शन व पर्यवेक्षण उपलब्ध नाही.
( वरील
वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे.
)
2)
a) अपुऱ्या आकाराचे क्रीडांगण उपलब्ध आहे.
ठराविक खेळासाठी प्रसंगी दुसऱ्या शाळेचे क्रीडांगण वापरले जाते. काही खेळासाठीच पुरेसे साहित्य व उपकरणे उपलब्ध आहे.
b) विद्यार्थी
ठराविक खेळासाठी क्रीडांगणाचा चांगला वापर करतात. क्रीडा / खेळासाठी विशिष्ट वेळ राखलेला आहे. क्रीडांगणावरील कृतीचे
नेहमी पर्यवेक्षण केले जाते. साहित्य व्यवस्थित ठेवलेले आहे
व आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जाते. शाळेच्या
क्रीडांगणावर किंवा बाहेर क्रीडा प्रकार घेतले जातात.
( वरील
वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे. )
3)
a) शाळेच्या आवारात पुरेसे आकाराचे क्रीडांगण व
साहित्य उपलब्ध आहे. विविध खेळासाठी साहित्य पुरेसे आहे आणि उपकरणे
देखील पुरेशी आहेत.
b) विद्यार्थी
सुनियोजितपणे विविध क्रीडा किंवा खेळ प्रकारात सहभागी होतात. क्रीडेसाठी
प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहे. शाळा सर्व साहित्याची यादी
ठेवते व आवश्यकतेनुसार झीज भरते. शाळा दरवर्षी आंतरशालेय
क्रीडा स्पर्धा आयोजित करते.( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास
3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करतात. तसेच गुणवत्तेचा
चढता क्रम दर्शवितात. त्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजते. गाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास
शाळेने नेमकेपणाने काय करावे हे देखिल समजते. वर्णनविधानाची निवड
केल्यानंतर शाळेला स्वत: चे गुणवत्तेमधील स्थान समजते.
त्यानंतर प्रत्येक शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागते. या नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. प्राधान्यक्रमानुसार
प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागते. या कार्यवाहीसाठी
किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतो. अशाप्रकारे कालबध्द
व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.
क्रीडांगण व क्रीडा साधनांविषयी अधिक माहीतीसाठी
shalasiddhimaha@gmail.com या मेल
आय डी वर सविस्तर मेल करावा.
असिफ शेख,
कार्यक्रम अधिकारी RMSAतथा
राज्यसंपर्क अधिकारी शाळासिध्दी.
No comments:
Post a Comment