Tuesday, March 24, 2020

शिक्षकांची विद्यार्थ्याविषयी जाणीव (लेखमाला - १३)


शाळासिध्दी लेखमाला - १३
शाळासिध्दीशाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम -  शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
अध्यापन,अध्ययन आणि मूल्यांकन  शिक्षकांची विद्यार्थ्याविषयी जाणीव
(क्षेत्र क्रमांक २ – गाभामानके क्रमांक १३ )
शिक्षकांची विद्यार्थ्याविषयी जाणीव
मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास शिक्षणावरच अवलंबून असतो. तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात शिक्षणाची भूमिका महत्वाची असते.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या शालेय शिक्षणाची आता देशाला गरज आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षण, संस्कार आणि मुल्यांच्या आधारावरच पुढील जीवनातील यश अवलंबून असते. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिक्षण म्हणजे काही पुस्तके वाचली, परिक्षा दिली व उत्तीर्ण झालो असे नव्हे. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासुन मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे. एकविसाव्या शतकातही आपल्याला कायद्याचा बडगा उगारून शिक्षणाचे महत्त्व सांगावे लागते. शिक्षणाचे खरे महत्व समाजात रुजलेच नाही. त्यासाठी आपला समाजच कारणीभूत आहे. आपण केवळ आपल्या प्राथमिक गरजा व उपलब्ध साधन सामग्रीपर्यंत पोहचलो आहे. देशाची प्रगती, विकास व येणारी संधी यांचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले गेलेच पाहिजे.
व्यक्तिमत्त्वाचा विकास हे शिक्षणाचे उद्दिष्ट मानल्यास प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे, त्याच्या क्षमता, त्याची बुद्धिमत्ता, छंद, सवयी, वृत्ती/दृष्टिकोन, जीवनविषयक मूल्ये आणि क्षमता, शारीरिक कृती या सर्व आयामांसह मूल्यमापन होणे आवश्यक आहे त्यासाठी शिक्षक, पालक, संस्थाचालक, प्रशासक, विद्यार्थी या सर्व घटकांत जागृती आणि जिज्ञासा हवी. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करतानाच ते गुणवत्तापूर्ण करण्यावरही भर देण्यात येत आहे. कालानुरूप नवीन विषय, नवे अभ्यासक्रम, आवश्यक साधनसुविधा, नव्या अभ्यासपद्धती यांना प्राधान्य देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे हे एक आव्हान आहे. कारण बदल स्वीकारणे हे सहजरीत्या घडत नाही. ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत विद्यार्थ्याला केवळ माहिती मिळवून भागणार नाही. तिचा उपयोग करण्याची कौशल्ये आणि मार्ग त्याला अनुभवातून आत्मसात करता येणे ही खरी आवश्यकता आहे. शाळांच्या पालक-शिक्षक संघातून, गावच्या ग्रामशिक्षण समित्यांतून अशा निर्णय व  घोषणांवर, ध्येयधोरणांवर मोकळी चर्चा व्हायला हवी. शालेय शिक्षणात विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा असे चार मुख्य घटक असतात तर समाज हा त्याचा परिसर आहे. शिक्षणाच्या बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत अनेक पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीवर शिक्षणाचे नियोजन व्हायला हवे. अभ्यासक्रम एकच असला तरीही शाळा, शिक्षक, शहर वा खेडे तसेच इतर अनेक घटक यामुळे शिक्षणाचा दर्जा बदलतो व त्यात एकवाक्यता, सुसूत्रता दिसून येत नाही. यासाठी या सर्व घटकांचे संघटन करणे व उत्कृष्ट शिक्षणपद्धतीचा अवलंब करणे, सर्व स्तरावर पोहोचेल असा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मानवाच्या सामाजिक जीवनाच्या विकासातील कुटुंब ही पहिली अवस्था असून सामाजिक जीवनाचा आधारभूत घटक आहे. कुटुंब व्यक्तीच्या दृष्टीने बालसंगोपन,शारीरिकसंरक्षण,मानसिक संरक्षण, समाजीकरण, संस्कृती संक्रमण यासारखी कार्य पार पाडते. कुटुंबाचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे व्यक्तीला शिक्षण देणे हे होय. कुटुंब हे अनौपचारिक शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण साधन मानले जाते. अनौपचारिक शिक्षणाकडून विद्यार्थी औपचारिक शिक्षणाकडे म्हणजेच शाळेकडे येतात, त्यामुळे विद्यार्थ्यांची सामाजिक व कौटुंबिक  माहिती समजून घेणे हे शिक्षकाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते.
अनुकरण ही शिकण्याची एक महत्त्वाची पद्धती आहे. लहान मुले अनुकरणाद्वारे अनेक गोष्टी शिकतात. कुटुंबातील व्यक्तींचे अनुकरण विद्यार्थ्यांकडून केले जाते. बालवय हे खूपच संस्कारक्षम असते. बालवयात मुलांच्या वर्तनास हवे तसे वळण लावता येते. सिग्मंड फ्राईड यांच्यामते मुलांच्या भावी व्यक्तिमत्वाची मूस किंवा पाया वयाच्या ५ व्या वर्षापर्यंतच कुटुंबात तयार होतो. असे असले तरी बालवयात येणारे अनुभव होणारे संस्कार हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात.  म्हणूनच कुटुंबाला जीवनाची पहिली शाळा असे म्हणतात. प्रेम, बंधुत्व, संयम, सदाचार,सहजीवन, सहानुभूती, सहिष्णुता इत्यादी संस्कार कुटुंबामध्ये होत असतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये नैसगिक प्रेम व जिव्हाळा असतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सेवाभाव, त्याग, जबाबदारीची जाणीव इत्यादी संस्कार होतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कुटुंब हे विकासाचे महत्वपूर्ण साधन आहे. शिक्षण ही समाजीकरणाची समानार्थी संज्ञा आहे. व्यक्तीचा जन्म आणि संगोपन कुटुंबात होते. कुटुंब हे व्यक्तीचे पहिले शैक्षणिक व सामाजिक पर्यावरण असते. कुटुंबातील आई-वडील, भाऊ-बहीण व इतर नातेवाईक यांच्याशी होणाऱ्या आंतरक्रियामधून गाणी गोष्टी, खाणेपिणे, पोशाख करणे, बोलणे, शिष्टाचार पाळणे, नैतिक मूल्य आत्मसात करणे, पुढील आयुष्यात पार पाडावयाच्या विविध भूमिकांची तोंड ओळख करून घेणे इत्यादी गोष्टी मुले शिकत असतात. त्यासाठी आवश्यक अभिवृत्ती, क्षमता, पात्रता व कौशल्य मुलांमध्ये विकसित करणे इत्यादी कार्य कुटुंब पार पाडते.
कॉमेनिअस हा शिक्षणतज्ञ सहा वर्षापर्यंतच्या मुलांच्या कौटुंबिक जीवनास School of Mother's knee असे म्हणतो. रुसोने देखील Father is natural teacher and Mother is natural nurse अशा शब्दात कुटुंबाचा गौरव केला आहे. एकंदरीत मुलांच्या शिकण्याचा पाया हा कुटुंबातच घातला जातो. कुटुंबात होणाऱ्या संस्कारास गृहसंस्कार असे म्हणतात. या संस्काराचा उद्देश मुलास संस्कृतीतील विविध गोष्टीचे ज्ञान करून देऊन त्याला भावी आयुष्य व्यवस्थितपणे जगण्यास पात्र व समर्थ बनविणे हा असतो. अशाप्रकारे कुटूंब हे शिक्षणाचे प्रभावी साधन ठरते. कुटुंब हे औपचारिक शिक्षण देत नाही परंतु औपचारिक शिक्षणाला किंवा शाळेतून दिल्या जाणाऱ्या औपचारिक शिक्षणास  उत्तम प्रकारे सहाय्य करते. मुलांना शाळेत घालणे, त्याच्या शिक्षणावर खर्च करणे,अभ्यासाकडे लक्ष देणे,मुलांना अभ्यासाची व वाचनाची सवय लावणे, त्याच्या आवडीनिवडी पुरविणे, त्याच्यातील सुप्त गुणांना वाव देणे, त्याच्यातील कलात्मक प्रवृत्तींना उत्तेजन देणे हे सारे कुटुंबच पार पाडीत असते. मुलांनी कोणता अभ्यासक्रम निवडावा, कोणती शाळा निवडावी इत्यादी बहुतांश निर्णय कुटुंब घेत असते. त्याच पद्धतीने मुलाचा घरात अभ्यास घेणे, गृहपाठ पूर्ण करण्यास मदत करणे त्याच्या शैक्षणिक अडचणी सोडवणे इत्यादी कार्यही कुटुंब पार पाडत असते. म्हणूनच कुटुंब ही औपचारिक शिक्षणाची पूरक संस्था आहे असे म्हटले जाते. कुटुंबातच मुले नम्रपणा, प्रामाणिकपणा, सहानुभूती व जबाबदारीची जाणीव इत्यादी गुण संपादन करतात. हेच गुण त्याला पुढे जबाबदार नागरिक ठरवितात. कुटुंबातील चांगले वातावरण मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासास अनुकूल ठरते. आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त करण्याची व आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास करण्याची संधी बालकाला कुटुंबातच मिळते.
कुटुंबानंतर मुले शाळेच्या सानिध्यात येतात. कुटुंबानंतर शाळेचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो.शिक्षकांचे वर्तन व व्यक्तिमत्वाचे अनुकरण मुले करतात. कळत-नकळत मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो. सन १८९३ मध्ये डब्ल्यू टी हेरीस या अमेरिकन शिक्षण आयुक्तांनी असे म्हटले आहे की कोणतेही शिक्षणाचे तत्त्वज्ञान त्याला सामाजिक बैठक असल्याशिवाय परिपूर्ण होऊ शकणार नाही. इसवी सन १८९९ मध्ये जॉन ड्युई यांनी अध्यापनाच्या सामाजिक बाजूकडे लक्ष वेधले. त्यांच्या मते शिक्षणप्रक्रियेच्या मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय अशा दोन बाजू आहेत. मानसशास्त्रीय संकल्पनेला जितके महत्व आहे, तितकेच महत्व समाजशास्त्रीय संकल्पनेला आहे. प्रत्येक शिक्षकाने अध्ययन अध्यापन व मूल्यमापन करत असतांना विद्यार्थ्याची समाजशास्त्रीय बाजू समजून घ्यायला हवी. समाजशास्त्रीय बाजुमध्ये कुटुंब महत्वाचे ठरते. व्यक्ती आपल्या कुटुंबात, शाळा, मित्रमंडळी समवेत, कामाच्या ठिकाणी ज्या आंतरक्रिया करते त्यातून ती अनेक गोष्टी शिकते. म्हणून शिक्षण प्रक्रिया ही केवळ व्यक्तीपुरती मर्यादित अशी वेगळी प्रक्रिया नसून ती एक सामाजिक प्रक्रिया आहे. अनेक व्यक्तींचे परस्पर संबंध त्यात गुंतलेले असतात. शाळा केवळ व्यक्तीच्या विकासाला चालना देणारी संस्था नसून त्याच्या गरजांची पूर्तता करणारी संस्था आहे. अमेरिका आणि ग्रेट ब्रिटन या देशांमध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, अशा विविध परिस्थितीचा अभ्यास केला जातो. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा आराखडा तयार केला जातो. आधुनिक समाजात शिक्षण व्यवस्था समाजाच्या केंद्रस्थानी राहून अत्यंत महत्त्वाची कार्ये पार पाडीत आहे. नवीन पिढीच्या सदस्यांचे समाजीकरण करून या बदलासाठी त्यांचे समायोजन करण्याची तयारी करून घेण्याचे काम शिक्षण करते.  राजकीय व आर्थिक व्यवस्थांच्या गरजांची पूर्तता शिक्षण करते. आधुनिक माणूस व आधुनिक समाज समजून घेण्यासाठी शिक्षण व्यवस्था समजून घेणे अत्यावश्यक आहे. आधुनिक गुंतागुंतीच्या समाजात शिक्षण व्यवस्था ही केंद्रस्थानी आहे. समाजातील सर्वच व्यवस्थांमध्ये होणारे बदल समजून घेण्याचे कार्य शिक्षण व्यवस्था करते. नवीन ज्ञान व क्षमता असलेले, तांत्रिक कौशल्याने परिपूर्ण आणि सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेने भरलेले नागरिक निर्माण करणे हे भारतीय समाजापुढचे उद्दिष्ट आहे.
शिक्षण व समाजीकरणाच्या प्रक्रियेत कुटुंबाची भूमिका महत्त्वाची आहे. कुटूंबानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे शाळा. शाळा ही कुटुंब आणि समाज या दोन्ही मधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते. शाळा मुलास समाजाचे सदस्य होण्यास मदत करते. कुटुंबात मिळालेला दर्जा हा अर्पित दर्जा (Ascribed Status) असतो  तो जन्माने मिळालेला असतो. याउलट शाळेत व समाजात मिळवलेला दर्जा हा अर्जित दर्जा (Achieved Status) असतो. अर्पित दर्जा मिळवण्यासाठी व्यक्तीला विशेष असे काहीच करावे लागत नाही तर अर्जित दर्जा मिळविण्यासाठी स्वतःमध्ये ज्ञान, कौशल्य व अभिवृत्ती विकसित करून योग्य ते कार्य करावे लागते. या प्रक्रियेत शाळेची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. समाजामध्ये अनेक प्रकारचे वर्ग,पक्ष, समूह असतात.  विद्यार्थ्यावर या गोष्टीचा परिणाम होत असतो.
सुप्रसिध्द जर्मन समाजशिक्षणशास्त्रज्ञ मेक्सवेबर यांनी समाज व स्तरीकरणाचे तीन परिमाणे सांगितली आहेत.
१. उत्पन्न व संपत्ती - व्यक्तीचा सामाजिक वर्ग संपत्तीवरून ठरतो. समान आर्थिक दर्जा असणारे यांचा एक वर्ग बनतो. यातूनच उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग असे स्तर निर्माण होतात. भांडवलदार आणि कामगार वर्ग निर्माण होतात. या वर्गाचे हितसंबंध परस्परविरोधी असल्यामुळे त्यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता असते. आर्थिक घटक हा वर्गाचा एक प्रमुख निकष असला तरी तो एकमेव नाही. याबरोबरच धर्म, जात, वंश या बाबीसुद्धा महत्त्वाच्या ठरतात.
२.  सत्ता - आपल्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडून आणण्याची व्यक्ती किंवा व्यक्तीच्या समूहाची क्षमता म्हणजे सत्ता होय. काहीवेळा शासकीय अधिकारी, राजकारणी, उद्योगपती, व्यापारी, जमीनदार, यांच्याजवळ सत्ता केंद्रित झालेली असते. त्यामुळे सत्ताधारी व सत्ताविहीन असे स्तर  निर्माण होतात.
 ३. प्रतिष्ठा - एखाद्या व्यक्ती किंवा समूहाला समाजातील इतर सदस्यांकडून जी समाज मान्यता, मानसन्मान व आदर मिळतो त्याला प्रतिष्ठा म्हणतात. प्रत्येक समाजात प्रतिष्ठेचे निकष वेगवेगळे असू शकतात. काहीवेळा धार्मिक कार्य करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळते. व्यक्तीचा व्यवसाय व प्रतिष्ठाअसा देखील संबंध काहीवेळा लावला जातो.याशिवाय प्रादेशिक भाषा, रहिवाशी याबरोबरच दिव्यांग इत्यादी प्रकारच्या परिस्थितीचा परिणाम बालकावर व शिकणाऱ्या मुलावर होत असतो.
शिक्षणाचा आशय शिकणाऱ्या व्यक्तीच्या मनावर म्हणजेच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचे कार्य करणाऱ्या घटकांना शिक्षणाची साधने किंवा माध्यम असे म्हणतात. यामध्ये कुटुंब, शाळा, प्रसार माध्यमे आणि शिक्षक या चार साधनांचा समावेश होतो. साधारणपणे कुटुंब व प्रसारमाध्यमे ही साधने अनौपचारिक शिक्षण देण्याचे कार्य करतात. तर शाळा व शिक्षक ही साधने औपचारिक शिक्षण देण्याचे कार्य करतात असे मानले जाते. तथापि कुटुंब व प्रसारमाध्यमे ही देखील संस्कृतीतील काही बाबींचे ज्ञान औपचारिकपणे करून देण्याचा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे करत आहेत. शाळा व शिक्षक देखील शिक्षण  देण्याबरोबरच इतर अनेक गोष्टीचे ज्ञान विद्यार्थ्यांना अनौपचारीकपणे करून देत असतात. कुटुंब ही सार्वत्रिक स्वरूपाची मूलभूत अशी सामाजिक संस्था आहे. अध्ययन अध्यापन व मूल्यमापनाचे नियोजन करत असतांना शिक्षकाने विद्यार्थ्याच्या सामाजिक जीवनाची अर्थात कुटुंब व परिस्थितीची माहिती करून घ्यायला हवी. विद्यार्थी वैयक्तिक माहिती घेत असतांना वय, वजन , उंची, आवड व छंद, वाचन व लेखन क्षमता, विशेष प्राविण्य, मित्र व खेळातील सवंगडी कोण आहेत याची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते. विद्यार्थी अध्ययनातील गरजा व अडथळे कोणते आहेत याचा शोध विविध विषयाच्या  प्रश्नावली व मुलाखतीमधून घेता येतो. विद्यार्थी कौटुंबिक माहितीमध्ये आई वडिलांचे शिक्षण, भाऊ बहिण यांची माहिती, राहणीमान व कुटुंबाचे उत्पन्न इत्यादी माहिती संकलित केल्यास विद्यार्थी अध्ययन व अध्यापनात, उपक्रम व गृहपाठात पालकांची मदत घेता येते. याबरोबरच सामाजिक पार्श्वभूमी, ग्रामीण/शहरी/औद्योगिक/ भोगौलिक परिसर इत्यादी माहिती संकलित असावी. विद्यार्थ्यांचे सर्वंकष नोंदी व माहितीचे अभिलेखे तयार केल्यास व वेळोवेळी सुधारित केल्यास  विद्यार्थी विकासामध्ये सहाय्यीभूत ठरतात.
बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमं २००९ मधील कलम ४ नुसार प्रवेश दिलेल्या बालकांना विशेष शिक्षण व भावनिक आधार देणे क्रमप्राप्त आहे. शाळेत दाखल केलेल्या बालकांना सर्व प्रथम नवीन वातावरणाशी समायोजन साधण्याकरिता भावनिक आधाराची गरज असते. अशावेळी प्रवेशित बालकाच्या कुटुंबाची, परिस्थितीची माहिती शिक्षकाला असल्यास त्याच्या विकासाच्या दृष्टीने व समायोजन करण्यात मदत होते. काही मुले शाळेच्या बाहेर दैनंदिन जीवनातील विविध व्यवहार व कौशल्ये शिकलेले असू शकतात. आपण जर त्या बाबींचा शोध घेऊ शकलो तर, त्या बालकाच्या अंगी असलेले व्यवहारज्ञान व कौशल्यांचा उपयोग इतर मुलांना शिकविण्याकरिता निश्चितच होईल. असे केल्याने विद्यार्थ्यांची शाळेविषयी आत्मीयता वाढेल. याउलट काही मुले अबोल असण्याची, शालेय अभ्यासात मागे असण्याची, अशैक्षणिक वातावरणातून आलेले असण्याची, शाळेविषयी मनात भीती असण्याची शक्यता असते. अशी मुले पुन्हा शाळाबाह्य होण्याची शक्यता अधिक असते. अशी मुले ज्या वर्गात दाखल झालेली आहे त्या वर्गातील शिक्षकानेच नव्हे तर शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी अशा बालकाचे समायोजन साधण्यास पोषक वातावरण तयार करणे आवश्यक असते.
'व्यक्ती तितक्या प्रकृती' या विधानानुसार तंतोतंत साम्य असलेल्या दोन व्यक्ती अस्तित्वात असणे  शक्य नाही. हे सत्य लक्षात घेऊन शिक्षकाने आपले कार्य करणे आवश्यक असते. प्रत्यक्षात मात्र सर्व विद्यार्थ्यांकडून समान प्रगतीची, तीही अतिशय उच्च दर्जाची, समान क्षेत्रातील प्रगतीची आणि वर्तनाची अपेक्षा केली जाते ही अपेक्षा करणे योग्य आहे का ? याचा अभ्यास शिक्षकाने करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकाला विद्यार्थी जाण व विद्यार्थी व्यक्तिभेदाबद्दल माहिती असायला हवी. व्यक्तिभेद , व्यक्ती वैशिष्ट्ये  नेमके कोणत्या प्रकारचे व कसे असतात हेही शिक्षकास माहीत असणे अत्यावश्यक आहे. व्यक्तिभेदांचा व व्यक्ती वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्याने शिक्षकास आपले कार्य अधिक शास्त्रशुद्ध व योग्य रितीने करता येईल.
व्यक्ती वैशिष्ट्ये,व्यक्तिभेदांचे प्रकार पुढील प्रमाणे असतात.
(१) शारीरिक व्यक्तिगत भेद : प्रत्येक व्यक्तीची शारीरिक घटना भिन्न असते. वजन, उंची, बांधा, चेहरा, वर्ण, डोळ्यांचे वा केसांचे रंग, कारक क्षमता इत्यादी कारणांनी व्यक्ती व्यक्तीमध्ये फरक पडतात.
(२) बौद्धिक व्यक्तिभेद : व्यक्तींच्या बौद्धिक पात्रता वेगवेगळ्या असतात. बुद्धिगुणांक समान असलेल्या व्यक्तींच्याही बुद्धिघटकांच्या प्रमाणात सूक्ष्म तफावत असते. ही तफावत त्यांच्यातील बौद्धिक व्यक्तिभेदांना कारणीभूत असते.
(३) भावनिक व्यक्तिभेद : प्रत्येक व्यक्तीचे भावजीवन भिन्न प्रकारचे असते. स्वभाव भिन्न असतात. भावनिक भेदामुळे त्यांच्या वृत्ती भिन्न भिन्न बनतात.
(४) अभिरुचीतील व्यक्तिभेद : व्यक्तींच्या अभिरुचीची क्षेत्रे भिन्न भिन्न असल्याने हे फरक निर्माण होतात.
(५) कार्यशक्ती (aptitude) व्यक्तिभेद : प्रत्येक व्यक्ती सर्व क्षेत्रात समान दर्जाचे कार्य करू शकत नाही. यांत्रिक कार्यशक्ती अथवा भाषिक कार्यशक्ती व्यक्तीला संबंधित क्षेत्रात चांगले काम करायला मदत करतात. प्रत्येकाची कार्यशक्ती प्रबल असण्याचे क्षेत्र भिन्न असते.
(६) प्रावीण्य संपादनातील व्यक्तिभेद : शारीरिक, बौद्धिक व कार्यशक्तीविषयक क्षमतांच्या साह्याने व्यक्ती विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य संपादन करू शकते. या क्षमता भिन्न भिन्न असल्याने व्यक्तींच्या प्रावीण्य संपादनात भेद आढळतात. संगीताच्या क्षेत्रातील आवड, शारीरिक क्षमता म्हणजेच आवाजाची देणगी आणि त्याच्या विकासाला जबाबदार असलेली बुद्धिमत्ता या घटकांमुळे व्यक्तीच्या संगीतातील प्रावीण्याची पातळी ठरते. त्या क्षमता प्रत्येकात भिन्न प्रकारच्या असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे प्रावीण्यही भिन्न स्तरावर असतात.
व्यक्तिभेदाची कारणे
(अ) अनुवंश: प्रत्येक व्यक्तीचा अनुवंश वेगळा असतो.माता, पिता व आधीचे पूर्वज यांच्या मार्फत विविध प्रकारचे शारीरिक व मानसिक गुण व्यक्तीच्या जन्मवेळी तिच्या शरीरात संक्रमित होतात. त्यांच्या विकासातून भिन्न प्रकारची व्यक्तिमत्त्वे घडतात. शरीराचा बांधा, चेहरामोहरा, कातडीचा, केसांचा वा डोळ्यांचा रंग, उंची, बुद्धिमत्ता या सर्वांमधील व्यक्तिभेद प्रामुख्याने अनुवंशिक गुणांमुळे निर्माण होतात.
(आ) परिस्थिती : प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न परिस्थितीत वाढत असते. प्रत्येकाची जन्मपूर्व व जन्मोत्तर परिस्थिती सारखी नसते. एकाच मातापित्यांच्या दोन बालकांच्याही परिस्थितीत खूपच फरक असतो. त्याचाच परिपाक एकाच कुटुंबातील ही दोन मुले वेगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वांची असतात. भिन्न भौगोलिक परिस्थितीही व्यक्तिमत्त्वाला वेगळे बनविते. भिन्न प्रकारची सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती व्यक्तिभेदाला आणखी खतपाणी घालते. त्यामुळे समान भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्या लोकांमध्येसुध्दा शहरी, ग्रामीण असे भेद आढळतात. शहरात झोपडपट्टीमधील  सांस्कृतिक परिस्थिती वेगळी व सुस्थितीतील घरातून राहणाऱ्या मध्यमवर्गीयांची वेगळी, त्यामुळे व्यक्तिभेद आणखी फुलतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, कुटुंबाचे सामाजिक स्थान व त्याची सांस्कृतिक पातळी हे सर्व घटक व्यक्तिमत्त्व घडवतात.
(इ) लिंग: स्त्री व पुरुष या दोघांमध्ये मूलतः काही शारीरिक व मनोरचनात्मक भेद आहेत. त्यातच त्यांना कुटुंबात व समाजात समान परिस्थिती उपलब्ध नसते. प्रत्येकास मिळणारी वागणूक बहुतेक वेळा भिन्न प्रकारची असते. त्यामुळे व्यक्तिभेदांचे लिंग हे एक महत्त्वाचे कारण ठरते.
(ई) वंश : व्यक्तींमध्ये विविध प्रकारचे फरक वांशिक भेदांमुळे पडतात. प्रत्येक वंशाच्या जनसमूहाची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. बुद्धिमत्ता, शरीर बांधा, कातडीचा वर्ण इत्यादी फरक वांशिक भेदांमुळे संभवतात.
(उ) राष्ट्रीयत्व : प्रत्येक राष्ट्रातील जनसमूहांची खास वैशिष्ट्ये असतात. भारतीय माणसाची सहनशीलता, जपानी माणसाची कामसूवृत्ती किंवा अमेरिकन माणसाचा जीवन उपभोगण्याचा व्यावहारिक दृष्टिकोन या वैशिष्ट्यांमुळे व्यक्तिभेदांना चालना मिळते.
(ऊ) अंतःस्राव :शरीरातील विविध प्रकारच्या ग्रंथी, वेगवेगळे स्त्राव शरीरात सोडतात. त्यांच्या रासायनिक घटनेचा परिणाम व्यक्तीच्या स्वभावावर व त्याच्या भावनिक जीवनावर होत असतो. आनुवंशिक शारीरिक वैशिष्ट्ये, व्यक्तीला मिळणारे अन्न व इतर भौतिक परिस्थिती यांचा या स्त्रावावर परिणाम होतो व व्यक्तीचे वर्तन त्यावर ठरते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. सर्वांगीण विकास साधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्याला करणे हे शिक्षकाचे मुख्य काम आहे. हे मार्गदर्शन विद्यार्थ्याला करीत असताना त्याच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकास वैशिष्ट्यांचा वापर शिक्षकाने करणे अत्यावश्यक आहे. कारण या वैशिष्ट्यांच्या कच्च्या मालावरच संस्कार करून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व घडविणे शिक्षकाला शक्य आहे. व्यक्तिभेद, व्यक्तीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊनच शिक्षकाने आपले कार्य करणे अत्यंत आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या अभिरुची व अभिवृत्ती लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना विकासाची संधी देणे योग्य असते त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन - अनुभव शिक्षकाला योजावे लागतील. याशिवाय विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार, प्रावीण्यानुसार त्यांचे गट करून शिक्षणकार्य करावे लागते.
शाळासिध्दीमध्ये क्षेत्र क्रमाक २ अंतर्गत शिक्षकाला विद्यार्थ्यांविषयी जाणीव असणे हे एक महत्वाचे गाभामानक मानले गेले आहे. शिक्षकांची विद्यार्थ्याविषयी जाणीव या बाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
१. शिक्षकांना विद्यार्थ्यांची सामाजिक-सांस्कृतिक  आणि  आर्थिक पार्श्वभूमी  आणि त्याच्या अध्ययन गरजा याबाबत किती  जाण असते ?
२. विद्यार्थ्याची सामाजिक - सांस्कृतिक आणि आर्थिक पार्श्वभूमी शिक्षक कशी जाणून घेतात ?
अ) शालेय रेकॉर्ड
ब) पालकाशी आंतरक्रिया
क) विद्यार्थ्यानाच प्रश्न विचारून
ड) इतर साधनाने (कृपया उल्लेख करावा.)
वरील प्रश्नांचा हेतू हा शिक्षकांची विद्यार्थ्याविषयी जाणीव यासंबंधी माहीती मिळविणे या बरोबरच विद्यार्थी परिस्थितीचे संपूर्ण चित्र समोर उभे करणे आहे. शाळासिध्दीमध्ये प्रत्येक घटकाचा सुक्ष्म विचार केला जातो. स्वयं मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन करण्याआधी मुख्याध्यापक व निर्धारकांनी वरील माहीतीचा अभ्यास शाळा विकासाच्या दृष्टीकोनातून करणे आवश्यक आहे. वरील माहीतीनंतरच वर्णनविधाने अभ्यासणे उचित ठरते. शाळासिध्दी कार्यक्रमामध्ये उपलब्धता, पर्याप्तता व उपयोगिता या तीनही दृष्टीकोनातून वर्णनविधाने तयार केलेली आहे. त्यानुसार गुणदान केलेले आहे. मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होते याची निवड करावी. वर्णनविधानाची निवड करतांना वरीलप्रमाणे वस्तूस्थिती दर्शक प्रश्न, प्रत्यक्ष परिस्थिती, विद्यार्थी शिक्षक मुलाखती,  दाखले, पुरावे यांचा आधार घ्यावा. वर्णनविधानाची निवड ही अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
१. विद्यार्थी ज्या समाज जीवनाचा घटक आहे तेथील सामाजिक - सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीची जाणीव शिक्षकास आहे. विद्यार्थ्याच्या घरची पार्श्वभूमी  आणि त्याची अध्ययन पातळी याबाबत शिक्षकास सर्वसाधारण कल्पना आहे
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे. )
२.  शिक्षकास सामाजिक - सांस्कृतिक आणि आर्थिक परिस्थितीविषयी तेथील समाज जीवनाची जाणीव आहे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन गरजांची माहिती आहे. ही माहिती त्यांना वर्गातील अनुभव, वैयक्तिकपणे इतर शिक्षक, पालक/आईवडील आणि सभोवतालचा समाज यांच्याशी होणाऱ्या आंतरक्रियेतून झालेली आहे.
 ( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे. )
३.  शिक्षक विद्यार्थ्यांच्या कामगिरीविषयीचे प्रत्याभरण (Feedback) विद्यार्थी व पालक यांचेकडून पद्धतशीरपणे मिळविली जाते. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा, अध्ययन पद्धत आणि शक्तिस्थाने याकडे लक्ष दिले जाते.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करतात. तसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितात. त्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजते. गाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास  शाळेने नेमकेपणाने काय करावे हे देखिल समजते. वर्णनविधान निवड केल्यानंतर शाळेला स्वत: चे गुणवत्तेमधील स्थान समजते. त्यानंतर प्रत्येक शाळेला शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागते. या सुधारणेसाठी नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. प्राधान्यक्रमानुसार प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे देखिल नमूद करावे लागते. या कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा देखिल उल्लेख करावा लागतो. अशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.
अशाप्रकारे शाळासिध्दी कार्यक्रमामध्ये शिक्षकांची विद्यार्थ्याविषयी जाणीव या गाभामानकाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
शिक्षकांची विद्यार्थ्याविषयी जाणीव विषयी अधिक माहीतीसाठी shalasiddhimaha@gmail.com या मेल आय डी वर सविस्तर मेल करावा. वरील लेखाबाबत आपल्या प्रतिक्रीया  asiflshaikh1111@gmail.com मेलवर कळविण्यात याव्यात ही विनंती.
                                                                                                                        असिफ शेख.
                                                                              ९८६०३८८०९६.

No comments:

Post a Comment