शाळासिध्दी लेखमाला - 5
शाळासिध्दी लेखमाला - 5
शाळासिध्दी – शाळा
मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम -
शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – ग्रंथालय (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 5 )
ग्रंथालय
व्यक्ती, समाज व
राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. माहिती,
ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे उत्कृष्ट
साधन म्हणून ग्रंथांची उपयोगितता सर्वश्रुत आहे. म्हणूनच बौद्धीक विकासाचे
शक्तीकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जाकेंद्र म्हणून ग्रंथालयांची नितांत
आवश्यकता आहे. ग्रंथालयाचे अस्तित्व प्राचीन काळापासून आहे. प्राचीन भारतातील
तक्षशीला व नालंदा विद्यापीठे ग्रंथालयासाठी प्रसिध्द होती.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास त्याकाळी
ग्रंथालायाद्वारे करून घेतला जात असे. प्राचीन काळ ते आधुनिक काळ ग्रंथालयाचा
प्रवास पाहता ग्रंथालय हे शैक्षणिक व सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शैक्षणिक
दृष्टीने अध्ययन अध्यापन व मूल्यमापन पध्दतीचा पाया हा अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तकावर अवलंबून असतो. अभ्यासक्रम
व पाठ्यक्रम हे शिक्षणाच्या तात्विक, मानसशास्त्रीय
अधिष्ठानानुरुप संदर्भीय पुस्तकामधून देश व समाजाच्या गरजेनुरुप, उद्दीष्टानुरुप निवडलेले असतात. संदर्भ पुस्तके व
संदर्भ ग्रंथ हे केवळ शिक्षणच नव्हे तर एकूणच समाजजीवनासाठी
उपयोगी असतात. पुस्तके व संदर्भ ग्रंथ प्रत्येक व्यक्ती,
संस्था व शाळेच्या संग्रही असायला हवेत. समृध्द
ग्रंथालयामधून जीवनसमृध्द करणारी पुस्तके, संदर्भग्रंथ पाहावयास
मिळतात. व्यक्तीच्या जीवनात ग्रंथालयाला महत्त्वाचे स्थान
असून ग्रंथालयसेवा मोफत मिळणे हा व्यक्तीचा हक्क व राष्ट्राची जबाबदारी आहे.
ग्रंथालयविषयक हा दृष्टिकोन इंग्लंड, अमेरिका यांसारख्या
प्रगत राष्ट्रांत मान्य झाला व ग्रंथालय–चळवळीचे मूळ सर्व
प्रथम तेथे रुजले गेले. इंग्लंडमध्ये एफ. ए. एबर्ट व एडवर्डझ यांच्या
प्रयत्नांमुळे १८५० मध्ये सार्वजनिक ग्रंथालयविषयक पहिला कायदा मंजूर झाला. या
कायद्यान्वये जनतेकडून कर वसूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत ग्रंथालये
स्थापन करण्यात आली. तेथे सर्वांना मोफत ग्रंथालयसेवा मिळू लागली. १९६४ मध्ये
पब्लिक लायब्ररीज अँड म्युझियम्स ॲक्ट मंजूर झाला. या कायद्यान्वये सार्वजनिक
ग्रंथालयांची व्यवस्था ही राष्ट्राची जबाबदारी होय, हे
तत्त्व मान्य करण्यात आले. त्यानुसार कायद्याप्रमाणे ४२,८६८
ग्रंथालये सुरू करण्यात आली. अमेरिकेत १८४८ मध्ये मॅसॅचूसेट्स येथे पहिला ग्रंथालय–कायदा मंजूर झाला व त्यानुसार बॉस्टन येथे सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना
करण्यात आली.
भारतातील ग्रंथालय चळवळ - भारतातील ग्रंथालय चळवळीचा
प्रारंभ बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात केलेल्या योजनाबद्ध
अशा मध्यवर्ती तसेच जिल्हावार, तालुकावार व ग्रामवार
ग्रंथालयांच्या स्थापनेने झाला. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात चळवळीचे हे पहिले
पाऊल पडले. तत्पूर्वी मुंबई सरकारने १८०८ मध्ये केलेली ग्रंथालयांच्या नोंदींची
तरतूद, एकोणिसाव्या शतकात भारतातील प्रमुख शहरी स्थापन
झालेल्या नेटिव्ह जनरल लायब्ररीज, १८६७ मध्ये मंजूर झालेला
प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट, इंपीरियल लायब्ररीची
स्थापना (१९१२) इ. गोष्टी ग्रंथालय चळवळीच्या दृष्टीने
महत्त्वाच्या आहेत.१९२४ मध्ये ग्रंथालयसंघाचे बडोदे येथे कार्य सुरू झाले व
ग्रंथालयशास्त्राच्या शिक्षणाची भारतात प्रथमच सोय झाली.बडोदे संस्थानात सुरू
झालेल्या ग्रंथालय चळवळीचे पडसाद इतरत्रही उमटले व त्या त्या प्रदेशाच्या शैक्षणिक
गरजा आणि प्रगती यांनुसार ग्रंथालय चळवळीची पावले पुढे पडत गेली. विशेषतः मद्रास,
बंगाल, पंजाब व मुंबई या प्रांतांनी
स्वातंत्र्यपूर्वकाळात ग्रंथालयाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. ग्रंथालयीन
कार्यकर्त्यांच्या बरोबरच समाजसेवक, राजकीय नेते व देणगीदार
यांचे पाठबळ ग्रंथालय चळवळीला लाभले. डॉ. रंगनाथन यांना आधुनिक भारतीय ग्रंथालय
चळवळीचे जनक म्हटले जाते. त्यांनी ग्रंथालयशास्त्रविषयक विपुल लेखनही केले आहे.
१९४८ मध्ये मंजूर झालेला कायदा, निरनिराळ्या विद्यापीठांनी
सुरू केलेले ग्रंथालयशास्त्राचे अभ्यासक्रम इ.कारणांनी ग्रंथालय चळवळीला व्यापक
स्वरूप प्राप्त झाले आहे.
भारत सरकारने ज्या पंचवार्षिक योजना
आखल्या, त्यांमधूनही ग्रंथालय चळवळीचे पाऊल
पुढेच पडत गेले. पहिल्या पंचवार्षिक योजनेत सर्व राज्यांतून सार्वजनिक
ग्रंथालयपद्धती अस्तित्वात यावी, अशी तरतूद करण्यात आली
होती. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत व तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुव्यवस्थित
ग्रंथालय योजना हे शिक्षण व्यवस्थेचे एक अंग होय हे मान्य करण्यात आले, त्याप्रमाणे आर्थिक तरतूद करण्यात आली होती. चौथ्या पंचवार्षिक योजनेत
ग्रंथालयाबाबत करावयाच्या उपक्रमांचा सर्वांगीण विचार व्हावा, म्हणून नियोजन आयोगाने भारतातील तज्ञ ग्रंथपालांची एक समिती नियुक्ती केली
होती. पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळातही ग्रंथालयविकासाचा विचार करण्यासाठी एक
समिती नेमण्यात आली होती. यानंतर आलेल्या सर्वच पंचवार्षिक योजनामधून सुसज्ज
आधुनिक ग्रंथालायाद्वारे मनुष्यबळाचा विकास हे तत्व डोळ्यासमोर ठेऊन नियोजन
केले गेले.
महाराष्ट्रात ग्रंथालय प्रसाराची
सुरुवात १९२१ साली झाली. श्री द. वा. जोशी यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र मोफत
वाचनालय परिषद भरली व महाराष्ट्रीय वाचनालय संघाची स्थापना झाली. मुंबई सरकारने
नेमलेल्या फैजी समितीचा सार्वजनिक पुस्तकालयांच्या विकासासंबंधीचा अहवाल १९४०
मध्ये प्रसिद्ध झाला. फैजी समितीच्या शिफारशीनुसार १९४७ मध्ये मध्यवर्ती, प्रादेशिक, जिल्हा आणि तालुका वाचनालयांची रीतसर
उभारणी सुरू झाली. महाराष्ट्र राज्याची १९६० मध्ये स्थापना झाल्यानंतर १९६२ मध्ये महाराष्ट्रातील विभाग ग्रंथालय
संघांनी परस्परांत सहकार्य वाढावे आणि सर्व राज्याचे प्रतिनिधीत्व करू शकेल अशी
संघटना निर्माण करावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य
ग्रंथालय संघाची स्थापना केली असून ग्रंथालय चळवळ जनताभिमुख करण्याचे महत्त्वाचे
कार्य ह्या संघटनेने चालविले आहे. महाराष्ट्रात १९६७ मध्ये ग्रंथालय कायदे मंजूर
करण्यात आले. स्वतंत्र अशी शासकीय ग्रंथालय खाती या कायद्यांनी अस्तित्वात आली
असून सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना, संगोपन आणि
संघटन हे कार्य होत आहे.
ज्ञानविज्ञानाची प्रचंड वाढ व
त्यांविषयीचे साहित्य संशोधनासाठी उपलब्ध करून देण्याची सातत्याची निकड यांमुळे
ग्रंथालय क्षेत्रात सहकाराची गरज निर्माण झाली. नजीकच्या दोन ग्रंथालयांतच नव्हे, तर प्रांतांतील देशातील व आंतरराष्ट्रीय ग्रंथालयांतही परस्पर देवाणघेवाण
व सहकार्याची आवश्यकता असल्यामुळे हे करणाऱ्या संघटना निर्माण झाल्या.
ज्ञानसाहित्याची आंतर–ग्रंथालयीन देवघेव, सामूहिक ग्रंथखरेदी, वर्गीकरण–सूचिलेखनादी
तांत्रिक बाबतीत सहकार्य, अंधांकरिता सोयी, मोफत वा सवलतीची टपालवाहतूक इ. सहकार्याच्या काही बाबी होत. उपलब्ध
ग्रंथसंपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग हे ग्रंथालय सहकाराचे साध्य होय व त्यासाठी
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन झाल्या आहेत. त्यांपैकी काही ख्यातनाम
संस्थांची माहिती अशी : (१) इंटरनॅशनल फेडरेशन फॉर डॉक्युमेंटेशन (१८९५). (२)
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन्स (१९२७). (३) युनेस्को ग्रंथालय विभाग
(१९४६). (४) फार्मिंग्टन प्लॅन (१९४८): कार्नेगी कॉर्पोरेशनच्या विद्यमाने
अमेरिकेतील ग्रंथालयांत सहकार्य साधणारी संस्था. (५) स्कँडिनेव्हियन प्लॅन (१९५६)
: डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन.अशाप्रकारे
ग्रंथालय निर्मिती व ग्रंथालयाचा वापर सर्वच क्षेत्रामध्ये सुरु झाला.
शालेय शिक्षणात ग्रंथालयांचा वापर - शालेय शिक्षणाच्या गुणवत्तावाढीमध्ये शालेय ग्रंथालयाचे योगदान फार मोठे
आहे. ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या साहित्यांचा अधिकाधिक
वापर करण्यास शिक्षक आणि विद्यार्थी यांना प्रवृत्त करणे आणि त्यांना
आवश्यक त्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देणे हे शालेय ग्रंथालयाचे उद्दिष्ट असते.
शालेय शिक्षणात शालेय ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर होणे ही आजची शैक्षणिक गरज आहे.
केवळ पाठय़पुस्तकांतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून शिक्षणाची उद्दिष्टय़े साध्य होऊ
शकत नाहीत. त्या भागविण्याचे कार्य शालेय ग्रंथालय विधिध सेवांच्या आणि
उपक्रमांच्या द्वारे पार पाडू शकते. ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी
लावून त्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले आणि त्याचा वापर करण्याचे
शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांमध्ये स्वाभाविकच ज्ञानार्जनाची आवड निर्माण होते.
म्हणून आजच्या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा वापर करण्याची संधी
प्राप्त करून देऊन त्यांची ज्ञानार्जनाची, जिज्ञासापूर्तीची
नैसर्गिक भूक भागविण्याचे कार्य शालेय ग्रंथालयाने केले पाहिजे. ग्रंथालयाच्या या
कार्याचे यश विद्यार्थी ग्रंथालय साहित्याचा वापर किती व कसा करतात यावर अवलंबून
असते. म्हणूनच विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देऊन त्याचा वापर करण्याचे
शिक्षण ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना द्यायला हवे. ग्रंथालयीन साधनांचा
विद्यार्थ्यांना अधिकाधिक वापर करता यावा म्हणून ग्रंथालयाने विविध सेवांचे आणि
उपक्रमांचे आयोजन करावयास हवे. उदा. विविध शालेय
उपक्रमामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये
चित्रकला, निबंध, हस्ताक्षर, वक्तृत्व , वाद विवाद अशा स्पर्धांचा समावेश असतो.
ग्रंथालयामधून या सर्व स्पर्धांवर मार्गदर्शन करणारी पुस्तके उपलब्ध
करुन देता येतात. ऐतिहासिक संदर्भ , भूगोल
, नागरिकशास्त्र यावर देखिल सखोल माहिती देणारी पुस्तके उपलब्ध करुन
देता येतात. शाळेतील सर्वच विषयाच्या अध्ययन अध्यापन व
मूल्यमापनासाठी ग्रंथालयाची मदत होते. म्हणूनच बालकाच्या
मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार प्रत्येक
शाळेत ग्रंथालय सक्तीचे करण्यात आलेले आहे.
शालेय ग्रंथालयाचे स्वरूप- ग्रंथालय
साहित्याचा संग्रह करताना विशिष्ट उद्दिष्टय़े डोळ्यासमोर ठेवलेली असतात. शाळेत एकच मध्यवर्ती ग्रंथालय असावे की, वर्ग-
ग्रंथालये असावीत या संबंधी निश्चित भूमिका शाळाचालकांनी व मुख्याध्यापकांनी स्वीकारली पाहिजे. ही भूमिका स्वीकारताना
त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावयास हवी ती ही की, शालेय
ग्रंथालयाचे यश विद्यार्थी व शिक्षकांना ग्रंथालय साहित्याचा वापर करण्याची संधी
किती आणि कशी मिळेल यावर अवलंबून असते.
1. मध्यवर्ती ग्रंथालय-
शाळेत उत्तम ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एकच मध्यवर्ती ग्रंथालय असणे ही
एक आदर्श ग्रंथालय व्यवस्था आहे. कारण संपूर्ण शाळेसाठी एकच सुसज्ज ग्रंथालय असले
की, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना चांगली
ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देता येते. मध्यवर्ती ग्रंथालयात सर्व साहित्य एकाच
ठिकाणी असल्यामुळे ग्रंथपालाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना त्या साहित्याचा
अधिक काळ वापर करण्याची संधी मिळते. मध्यवर्ती ग्रंथालयाचे हे फायदे लक्षात घेऊन
मुख्याध्यापकांनी शाळेत मध्यवर्ती ग्रंथालय स्थापन करावयास हवे. ग्रंथालय हे ज्ञान
प्राप्त करून घेण्याचे एक प्रभावी साधन आहे.
2. वर्ग ग्रंथालये-
प्रत्येक शाळेत मध्यवर्ती ग्रंथालय व प्रशिक्षित ग्रंथपाल असणे ही एक आदर्श
ग्रंथालय पद्धती आहे. परंतु आजच्या शाळांच्या जागेच्या अडचणी लक्षात घेता सर्वच
शाळांना मध्यवर्ती ग्रंथालय उपलब्ध करून देणे शक्य नाही. ज्या शाळा मध्यवर्ती
ग्रंथालय सुरू करू शकत नाहीत त्या शाळांत वर्ग-ग्रंथालये अपरिहार्य आहेत.
वर्ग-ग्रंथालये योजनाबद्ध पद्धतीने व्यवस्थितरित्या चालविली तर विद्यार्थी विकासात
मोठी मदत होते.महाराष्ट्र राज्य शासनाने नेमलेल्या
चिपळूणकर समितीने आपल्या अहवालात वर्ग-ग्रंथालयासंबंधी पुढील विचार व्यक्त केले
आहेत. ‘‘वर्ग-ग्रंथालये ही शालेय ग्रंथालयात महत्त्वाची
प्रथा आहे. या प्रथेत वर्गग्रंथालय प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना
ग्रंथपालनाच्या कामाचा अनुभव मिळून नेतृत्वाचे गुण विकसित होण्यास मदत मिळते. इतर
विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या कार्याचे जवळून निरीक्षण करावयास मिळते.
3. पुस्तक , ग्रंथ देवघेव- विद्यार्थ्यांना ग्रंथ घरी
वाचायला देणे हे ग्रंथालयाचे महत्त्वाचे शैक्षणिक कार्य आहे. विद्यार्थ्यांना
शाळेच्या वेळेत पुस्तके व संदर्भ ग्रंथ वाचायला वेळ मिळत नाही म्हणून त्यांना
ग्रंथ घरी नेता येतील, अशी व्यवस्था केली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये
वाचनाची आवड निर्माण करून ती वाढीला लावण्यासाठी या ग्रंथ देवघेव सेवेची फार गरज
आहे.
4. ग्रंथालय तासिका -
माध्यमिक शाळांतून सर्व वर्गासाठी आठवड्यातून कमीत कमी एक ग्रंथालय तासिका असायला
हवी. या तासिकेत मध्यवर्ती ग्रंथालयातील किंवा
वर्ग-ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचायला मिळू शकतात. या तासिकेत
विद्यार्थ्यांना ग्रंथ घरी वाचायला देण्याचे कामही करता येते. या तासिकेचा उपयोग
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथपालाला आणि
वर्गशिक्षकांना करता येतो. वाचन-पेटय़ा, पुरवणी वाचन- पेटय़ांतील
पुस्तकांचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी या
तासिकेचा चांगला उपयोग करता येतो. विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथप्रेम आणि वाचनप्रेम
निर्माण करून त्यांना ग्रंथालयाचा वापर करण्यास उद्युक्त करण्यासाठी ग्रंथालय
तासिकेचा चांगला उपयोग होतो.
ग्रंथालयाचे काही उपक्रम-
शालेय ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर व्हावा आणि विद्यार्थ्यांना ग्रंथालय सेवेचा
फायदा मिळावा म्हणून जे काही उपक्रम ग्रंथालयाला हाती घेता येतात त्यापैकी काही
उपक्रमांचा येथे विचार केला आहे.
a) वाचन पेटय़ा- ग्रंथालय तासात किंवा विद्यार्थ्यांना मोकळा वेळ मिळतो त्या वेळेत वाचनासाठी त्यांना ग्रंथालयातून चांगले वाचनसाहित्य वाचन पेटय़ांतून देता येते. या पेटय़ा तयार करताना ग्रंथपालाने विद्यार्थ्यांना वाचायला प्रवृत्त करण्याचा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवावयास हवा. प्रत्येक पेटीत नोंदवही ठेवावी.
a) वाचन पेटय़ा- ग्रंथालय तासात किंवा विद्यार्थ्यांना मोकळा वेळ मिळतो त्या वेळेत वाचनासाठी त्यांना ग्रंथालयातून चांगले वाचनसाहित्य वाचन पेटय़ांतून देता येते. या पेटय़ा तयार करताना ग्रंथपालाने विद्यार्थ्यांना वाचायला प्रवृत्त करण्याचा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवावयास हवा. प्रत्येक पेटीत नोंदवही ठेवावी.
b) पुरवणी वाचन पेटय़ा-
उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त
काही अवांतर वाचन करण्याच्या हेतूने शिक्षण विभागाने पुरविलेली पुस्तके
विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यावीत. या पुस्तकांच्या
पेटय़ांतील पुस्तके वाचायला वर्ग शिक्षकांनी आणि विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना
प्रोत्साहन दिल्यास विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागते. शैक्षणिकदृष्टय़ा ही
अतिशय उपयुक्त योजना आहे. ती ग्रंथालयाने व्यवस्थित राबविली पाहिजे.
c) मधल्या सुट्टीत वाचन-
शाळेच्या दिनचर्येत विद्यार्थ्यांना रिकामा वेळ असा फार कमी मिळतो यामुळे ज्या
विद्यार्थ्यांना वाचनाची आवड असते अशा विद्यार्थ्यांना वाचनाचा लाभ मिळावा म्हणून
मधल्या सुट्टीत त्यांना ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध करून द्यावीत.
d) नियतकालिके व वृत्तपत्रे-
मासिके व वृत्तपत्रे विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत इच्छा असूनही वेळेअभावी वाचता
येत नाहीत. वास्तविक नियतकालिके आणि वृत्तपत्रे यांचे शालेय विद्यार्थ्यांनी वाचन
करणे शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाचे आहे. विद्यार्थी या
चांगल्या वाचन साहित्यापासून वंचित राहू नयेत म्हणून विद्यार्थ्यांना ती मधल्या
सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर वाचता येतील, अशी खास सोय
करावी.
e) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास सोय-
१० वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशाची चिंता असते. या विद्यार्थ्यांचा
त्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून शालेय ग्रंथालयाने विचार करून त्यांना
त्यांच्या अभ्यासात जेवढी मदत करता येईल तेवढी केली पाहिजे. त्यांना अभ्यासोपयोगी
पुस्तके आणि इतर साहित्य उपलब्ध करून देऊन त्या साहित्याचा त्यांना वापर करता यावा
म्हणून शाळेच्या वेळेबाहेर त्यांची वाचनाची खास सोय केली पाहिजे. ज्या
विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासाची सोय नसते, अशा
विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या या उपक्रमाचा निश्चितच फायदा होतो आणि ग्रंथालय
आपल्या शाळेच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याच्या कामात सहभागी होऊ शकते.
f) विशेष परीक्षांसाठी पुस्तके-
शाळेतील बरेच विद्यार्थी बाहेरच्या विशेष परीक्षांना बसतात.अशा विद्यार्थ्यांना
परिक्षांना बसायला उत्तेजन देऊन त्यांना लागणारी पुस्तके व इतर साहित्य
ग्रंथालयाने उपलब्ध करून द्यावे. शाळेतील विद्यार्थ्यांचे या परीक्षेतील यश शाळेला
निश्चितच भूषणावह असते आणि या यशातील ग्रंथालयाचा वाटा महत्त्वाचा असतो.
g) व्यवसाय मार्गदर्शन-
विविध अभ्यासक्रमांची आणि व्यवसायाची माहिती देणारी पुस्तके आणि माहितीपत्रके
विद्यार्थ्यांना ग्रंथालयात उपलब्ध करून द्यावीत. शिवाय विद्यार्थ्यांना हवी
असलेली माहिती व्यवसाय मार्गदर्शन केंद्राकडून त्यांना मिळवून द्यावी.
h) वाचन दोरी उपक्रम - प्राथमिक शाळामधून हल्ली वाचन
दोरी उपक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतांना दिसतो. यामध्ये
वर्गात समोरच्या भिंतीवर एक दोरी बांधली जाते. विद्यार्थी वय,
आवड व अभ्यासक्रम विचारात घेऊन दोरीवर पुस्तके लटकविली जातात.
विद्यार्थी त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार पुस्तके घेऊन वाचन करतात.
ठराविक कालावधीनंतर पुस्तके बदलली जातात. अशाप्रकारे
ग्रंथालयामधून विद्यार्थी सर्वांगिण विकासासाठी चालना मिळते.
सद्यस्थितीचा विचार करता ग्रंथालय अतिशय सुसज्ज असायला हवे. ग्रंथालयात
असलेली पुस्तके ही विद्यार्थ्यांचा वयोगट, बालमानसशास्त्र व अध्ययन अध्यापन पध्दतीचा विचार करुन
घेतलेली असावी. ही पुस्तके दरवर्षी गरजेनुसार व उपलब्ध
निधीनुसार घेण्यात यावी. पुस्तकांच्या नोंदीसाठी पुस्तक
साठानोंद रजिष्टर, पुस्तक लेखक, किंमत
व उपयोगिता विषयक नोंदीचे रजिष्टर, विद्यार्थी,शिक्षक पुस्तक देवघेव रजिष्टर असायला हवे. ग्रंथालयात
ग्रंथालयीन नियम लिहिलेले असावेत. पुस्तकांची वर्गवारी करुन
ती पुस्तके विषयनिहाय कपाटात, रकान्यात रचून ठेवलेली असावीत.
कपाटाला असलेल्या काचेमधून पुस्तकांची नावे व लेखक यांची
वाचन करता येतील अशाप्रकारची रचना असावी. पुस्तकांचे विषयनिहाय,
घटकनिहाय, लेखक निहाय तालिकिकरण केलेले असावे. ग्रंथालयमध्ये विद्यार्थ्यांना बसून वाचन करता येईल अशाप्रकारची सुविधा असायला हवी. ग्रंथालयात बसून विद्यार्थ्यांना
वर्तमानपत्रे , साप्ताहिके, मासिके
वाचन करता यावीत. आधुनिक काळात संगणकाचा वापर मोठ्या
प्रमाणावर वाढला आहे. विद्यार्थी आवडीचा व आधुनिक तंत्राचा
विचार करता ई साहित्य उपलब्ध असायला हवे. संगणकाद्वारे
विद्यार्थी नेटवर उपलब्ध पुस्तके वाचन करु शकतील, अभ्यास करु
शकतील अशाप्रकारची सुविधा उपलब्ध असायला हवी. अध्यापन करत असतांना विषय शिक्षकांनी आठवड्यातून किमान एक ग्रंथालय
तासिकेचे नियोजन करायला हवे.
सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट येथील प्रत्येक शाळेत ग्रंथालय समृध्द
करण्यासाठी ग्रंथालय विकास चळवळ सुरु करण्यात आलेली आहे. प्रत्येक शाळेतील
ग्रंथालय समृध्द करण्यासाठी समाजातील दानशुर व्यक्ती, संस्था यांचेकडून पुस्तक
रुपाने मदत घेतली जात आहे.
भिलार या सातारा जिल्ह्यातील गावाची ओळख “पुस्तकांचे
गाव” म्हणून देशभर झाली आहे. गावातील
प्रत्येक घरामध्ये विविध पुस्तकांचा संग्रह दिसून येतो. प्रत्येक घराच्या समोर ,
घरात बसून तेथील पुस्तक वाचनाचा अनुभव घेता येतो.
शासनाने खडू-फळा योजने अंतर्गत प्राथमिक
शाळांना पुस्तकसंच उपलब्ध करुन दिलेला आहे. तसेच सर्व शिक्षा अभियान अंतर्गत
प्रत्येक शाळेला पुस्तक खरेदीसाठी निधी देखिल उपलब्ध करुन दिलेला होता.
एकंदरीत ग्रंथ हेच गुरु हा विचार करुन शाळेमधून
ग्रंथालये तयार करायला हवीत.
केंद्र
शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क
अधिनियम
2009 नुसार ग्रंथालय संदर्भात दिलेले निकष.
v प्रत्येक
शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांचेसाठी ग्रंथालय असावे.
v विद्यार्थी
संख्या विचारात घेता विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात (1: 5) पुस्तके उपलब्ध असावी.
v प्राथमिक शाळा
( कमी पटाच्या )असल्यास कमीत कमी 200 पुस्तके असावीत.
वरील निकष हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या
सर्व माध्यमांच्या शाळांकरिता लागू राहतील.
ग्रंथालय
याबाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1.
शाळेत ग्रंथालय आहे काय ?
2.
ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली आहे काय ? ( असल्यास क्षेत्रफळ
-----------------चौरस मीटर मध्ये )
3.
ग्रंथालयात एकावेळी बसून वाचू शकतील अशा विद्यार्थ्यांची
संख्या ?
4.
ग्रंथालयाचे व्यवस्थापन ?
5.
शाळेने वर्गणी लावलेले नियतकालिके ?
6.
ग्रंथालयातील शब्दकोश व विश्वकोश वगळता प्रति 100 विद्यार्थी
पुस्तकांची संख्या ?
7.
ग्रंथालयासाठी संगणक उपलब्ध आहे काय ?
वरील प्रश्नासह शाळासिध्दी कार्यक्रमात वर्णन विधाने
दिलेली असतात.
या वर्णन विधानानुसार शाळा स्वयं मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन होत
असते. मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन
आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे ठरवावे. वर्णनविधानाची
निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन विधाने व वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1)
a) पुस्तके अपु-या
संख्येने आहेत. ग्रंथालय कक्ष किंवा वाचनाची जागा उपलब्ध
नाही.
b) पुस्तकाचे
व्यवस्थित तालिकीकरण केलेले नाही. वेळापत्रकात विशिष्ट
ग्रंथालय तासिका नाही. घरी साधारणत: पुस्तके
दिली जात नाहीत.
( वरील
वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे. )
2)
a) पुस्तके, मासिके
व वृत्तपत्रे पुरेशा संख्येने उपलब्ध आहेत. आणि नियमितपणे
अद्ययावत केली जातात. वाचनाची जागा/ ग्रंथालय
कक्ष उपलब्ध आहे. ई पुस्तके किंवा डीजीटल साहित्य उपलब्ध
नाही.
b) पुस्तके
नीट ठेवलेली आहेत. तालिकीकरण केलेले आहे व नियमित दिली जातात.
वेळापत्रकात ग्रंथालय
तासिका ठेवल्या आहेत. जेंव्हा स्त्रोत
उपलब्ध असतात तेव्हा नवीन पुस्तके घेतली जातात.
( वरील
वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे. )
3)
a) पुस्तकांचा मोठा साठा आहे.नियतकालिके, मासिके, वृत्तपत्रे
यांची नियमित वर्गणी भरली जाते.ग्रंथालयासाठी पुरेशा
वाचनाच्या जागेसोबत स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहे. ई पुस्तक
किंवा डीजीटल साहित्य उपलब्ध आहे.
b) पुस्तके
नीट तालिकीकरण केली आहेत. रकान्यामध्ये व्यवस्थित रचली आहेत
व विद्यार्थी शिक्षकाद्वारे वापरली जातात. ई पुस्तके व
डिजीटल साहित्य वापरण्याची संधी ग्रंथालयात दिली जाते. ग्रंथालयातील
स्त्रोत अभ्यासक्रम पूर्ततेत मदत करतात. शिक्षक व विद्यार्थी
यांचे वय, भाषिक पार्श्वभूमी, शैक्षणिक
गरजा लक्षात घेऊन नियमितपणे नवीन पुस्तकांची भर योग्य निवड प्रक्रिया अवलंबून
घातली जाते.
( वरील वर्णनविधाने लागु होत
असल्यास 3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने
ही गुणवत्तेचे वर्णन करतात. तसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितात.
त्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजते. गाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने काय करावे हे
समजते. वर्णनविधानाची निवड केल्यानंतर शाळेला स्वत: चे गुणवत्तेमधील स्थान समजते. त्यानंतर प्रत्येक
शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागते. या नियोजनात
सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. प्राधान्यक्रमानुसार
प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागते. या
कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतो. अशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.
असिफ शेख,
कार्यक्रम
अधिकारी
RMSAतथा राज्यसंपर्क अधिकारी शाळासिध्दी.
No comments:
Post a Comment