Monday, August 13, 2018

प्रयोगशाळा - शाळासिध्दी लेखमाला - 6


शाळासिध्दी लेखमाला -  6
शाळासिध्दीशाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम -  शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – प्रयोगशाळा   (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 6 )
प्रयोगशाळा
आधुनिक युग हे विज्ञानयुग आहे. आज वैज्ञानिक प्रगतीच्या माध्यमातून मानवाने संपूर्ण जग काबिज केले आहे. उद्योग, व्यापार , दळणवळण , आरोग्य व शिक्षण अशा सर्वच क्षेत्रामध्ये विज्ञान आहे. विज्ञान हा केवळ एक विषय नसून, तो जीवनविषयक एक दृष्टिकोन आहे. नव्या युगाचा मूलमंत्र आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक वस्तूंशी आपला संबंध येत असतो, त्या प्रत्येक वस्तू म्हणजे विज्ञानाचा अविष्कार होय. आपण विज्ञानमय जीवन जगत आहोत असे म्हटले, तर फारसे वावगे ठरणार नाही. विज्ञान म्हणजे ज्ञानाची विशिष्ट मांडणी. ज्यामध्ये सुसूत्रता आहे. कारण मनुष्य जेव्हा वेगवेगळे प्रयोग करतो, तेव्हा अनेक निरीक्षणांवर आधारित सिद्धांत, तत्त्व तो मांडत असतो आणि मग त्याच निरीक्षणांच्या आधारावर पुनः अभ्यास करून त्यात सुधारणा करून परत नवीन तत्त्वे, सिद्धांत आपल्याला समोर आलेली दिसतात. भूगर्भात, जमिनीवर, अवकाशात सगळीकडेच विज्ञानाचे साम्राज्य पसरले गेले आहे. विज्ञानाचा विस्फोट झाला आहे. माणसाच्या दैनंदिन बदलणाऱ्या सवयी, वागणुकीतील बदल, वस्तू याचा विचार केला तर या सर्वांच्याच मुळाशी विज्ञानच आहे असे लक्षात येते. म्हणूनच विज्ञान सर्वस्पर्शी आहे, असे आपण म्हणतो. म्हणजेच विज्ञान कधीही स्थिर राहू शकणार नाही, त्याची गतिमानता ही दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. पूर्वी जे काम करण्यासाठी खूप कष्ट करावे लागत असे ते काम आज आता कमी कष्टात कमी वेळात होऊ लागले आहेत. कॅल्क्युलेटर, कॉंम्प्युटर, मोबाइल ही त्याचीच उदाहरणे. एक बटण दाबले की क्षणार्धात इच्छित गोष्ट आपल्याला प्राप्त होते. विज्ञानामुळे नवीन पद्धतीने विचार करण्याची सवय लागणे याचे प्रमाणही वाढते आहे. विद्यार्थी सुद्धा जागरूकतेने शास्रीय पद्धतीने विचार करू लागले आहेत. निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली, पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती, तर्कसुंसगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून वैज्ञानिक दृष्टीकोनाची वाढ होते. निरीक्षण करून, उपलब्ध ज्ञान वापरून, तर्क करुन त्या घटनेमागची  कारणे शोधायला हवी, ती योग्य आहे की नाही हे पडताळण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत, आणि ते पुरावेही तपासून बघायला हवेत. 'पुरावा तेवढा विश्वास' या पद्धतीनं विचार केला, तर जगात चमत्कार शिल्लक राहणार नाही. उरतात ती कदाचित सोडवायला कठीण अशी कोडी! एखादी घटना त्याच पद्धतीनं का घडते हे शोधून काढण्याची  सत्यशोधनाची वृत्ती म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत.
विज्ञानाची सुरवात झाली ती आग पेटवून ती टिकवण्याच्या शोधातून. कोरडी पडलेली दोन झाडाची खोडं पडताना एकमेकावर घासली गेली आणि त्यातून जाळ पेटला हे एकंदर निरीक्षण. घर्षणामुळे आग पेटली असावी हा तर्क. दोन कोरडया कठीण वस्तू एकमेकांवर जोरात घासल्या गेल्या तर ठिणगी पडू शकते, हे प्रत्यक्ष प्रयोगानंतरचं अनुमान. वेगवेगळया परिस्थितीत पुन्हा प्रयोग. यातून पाहिजे तेव्हा आग निर्माण करण्याची आणि इंधन घालून ती टिकवण्याची पद्धती. या आगीचा थंड हवेत शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि मांस आणि कंदमुळं भाजून खाण्यासाठी उपयोग हे उपयोजन.  जेम्स वॅटबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. ती खरी नसली तरी वैज्ञानिक विचारपद्धती समजून घ्यायला उपयोगी आहे. जेम्स वॅटनं उकळणाऱ्या चहाच्या किटलीवरचं झाकण उडताना पाहिलं, तेव्हा तो असं म्हणाला नाही, की आतमध्ये भूत-पिशाच्च आहे. त्यानं या निरीक्षणावरून असा तर्क केला, की चहा उकळण्याच्या क्रियेतून, काहीतरी शक्ती तयार झाली आहे, आणि त्यामुळे ते झाकण उडतय. त्यानं झाकण उचलले, बाहेर येणारी वाफ पाहिली, आणि अनुमान केले, की वाफ ही ती शक्ती आहे. ही शक्ती आणखी कुठे वापरता येईल, याचा त्याने  विचार केला, प्रयोग केले, आणि त्यातूनच वाफेवर चालणारं इंजिन अस्तित्वात आले. भारताचे विज्ञानाचं पहिलं नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ, सी.व्ही.रामन यांचा संशोधनाचा नोबेल मिळवणारा प्रबंध संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. प्रकाशाच्या विकरणाच्या नियमांविषयी हा प्रबंध आहे. एकदा डॉ रामन परदेश प्रवासाला निघाले. प्रवासात ते जहाजाच्या डेकवर उभे होते. वर निरभ्र, निळं आकाश होतं तर सभोवती निळं अथांग पाणी. त्यांच्या जागरूक मनात एकदम प्रश्न उमटला, की हवा आणि पाणी ही दोन वेगळी माध्यम, त्यांची अंतरही वेगळी, तरीही रंग निळाच का दिसतो? या छोटया कुतूहलाच्या समाधानार्थ त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. निरीक्षणातून विचार पुढे जातो तो असा.
आपल्या आजूबाजूला, असंख्य घटना घडत असतात, त्यांच निरीक्षण आपल्याकडून कळत-नकळत होत असते. आपल्याला एखाद्या ठिकाणी धूर दिसला, तर तिथे आग पेटली असणार, हा तर्क आपण करतो. तो आपल्याला पूर्वीच जाणवलेल्या, आग आणि धूर यातील कार्यकारणसंबंधामुळे. 'उद्या सकाळी मी अमुक करीन.....' असं आपण म्हणतो, तेव्हा हा प्रश्न आपल्याला पडतो का, की उद्या उजाडेलच कशावरून ? कारण आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे, आपण असे अनुमान काढलेल असते, की ज्या अर्थी गेली 460 कोटी वर्षं सूर्य उगवतोय, त्याअर्थी तो उद्याही उगवणारच. अनुमानानंतरची पुढची पायरी  प्रचितीची किंवा अनुभवांची असते. आगीत हात घातला की चटका बसतो, यासारखा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो, कोणी जर आग अगदी थंडगार असते असे म्हटले तर आपण त्याला मूर्खात काढतो. कारण ते प्रत्यक्ष अनुभवलेलं सत्य असतं. कोणत्याही वैज्ञानिक सत्याचा अनुभव, सप्रमाण म्हणजे पुराव्यांसह, वारंवार म्हणजे पुन्हापुन्हा, आणि सर्वत्र म्हणजे सगळीकडे येत असतो.कोणताही निष्कर्ष हा प्रयोगानं तपासून बघता आला पाहिजे हे तर विज्ञानाचं आधारतत्त्व आहे.  'ज्वलनाला ऑक्सिजनची आवश्यकता असते' असं म्हटले तर ते सिद्ध करता आल पाहिजे. मेणबत्ती पेटवून ती उपडया हंडीखाली ठेवली तर हंडीतला ऑक्सिजन संपल्यावर ती विझते, याचाच अर्थ तो वायू ज्वलनाला मदत करतो. अशाप्रकारे निसर्गामधील प्रत्येक घटनेमागे विज्ञान आहे. हे विज्ञान समजण्यासाठी जिज्ञासा व कुतुहल प्रवृत्ती हवी. जिज्ञासा व कुतुहल यांनाच विज्ञान शिक्षणाचा पाया म्हटले जाते.  प्रत्येक व्यक्तीमध्ये जिज्ञासा व कुतुहल हे भाव असतातच. विद्यार्थी सर्वांगिण विकासामध्ये जिज्ञासा व कुतुहल जागृत करुन शिकविल्यास ते अधिक प्रभावी ठरते. विज्ञान विषय शिकवितांना विद्यार्थ्यांचे कुतुहल जागे करुन त्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी दिली जाते. ही संधी देण्यासाठी शाळेमध्ये प्रयोगशाळा असणे अत्यंत आवश्यक आहे. विज्ञान म्हणजेच प्रयोग व प्रात्यक्षिके. प्रयोगशाळेशिवाय विज्ञान शिकविणे अत्यंत अवघड आहे. विज्ञान व प्रयोगशाळा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज जगाच्या संपूर्ण प्रगतीची गुरुकिल्ली म्हणून विज्ञान व वैज्ञानिक शोध यांचेकडे पाहिले जात आहे. विज्ञानाचे महत्व सांगतांना भारताचे माजी पंतप्रधान कै. पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी Life without science is a hell. असे म्हटले आहे.
भारतामध्ये सन 1931 पूर्वी विज्ञान हा स्वतंत्र विषय नव्हता तर तत्वज्ञानाचा भाग म्हणून तो शिकवला जात होता. सन 1947 मध्ये राधाकृष्णन कमिटीने विज्ञान विषयाचे महत्व स्पष्ट केले. त्यांनतर शास्त्राचे महत्व वाढतच गेले. सन 1953 साली मुदलियार आयोगाने 10 वर्षाचा सामान्य विज्ञान विषय सूचविला. तो देशात सर्वच राज्यात राबविला गेला. सन 1966 साली कोठारी आयोगाने विज्ञानाचा शाखानिहाय अभ्यास सुरु करावा अशी शिफारस केली.विज्ञान हा शब्द फार व्यापक स्वरुपाचा आहे. विज्ञान म्हटले की एखादी कृति व्यवस्थितपणे करण्याची पध्दती असा अर्थ आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. विज्ञानाच्या वेगवेगळ्या व्याख्यांमधून जगातील सर्व गोष्टींचा संपूर्ण अभ्यास म्हणजे विज्ञान होय. सर्व सिध्दांत, तत्वे, कायदे, पुन्हा पुन्हा नवीन निरिक्षणाचे निष्कर्ष काढून त्यात सुधारणा करणे किंवा नवीन तत्वे, सिध्दांत तयार करणे म्हणजे विज्ञान होय. स्वतंत्रपणे विचार करणारी आणि कार्य करणारी व्यक्ती बनविणे, हे शिक्षणाचे ध्येय असायला हवे, असे अल्बर्ट आईन्स्टाइन यांनी म्हटले होते. विज्ञान शिक्षणाचा उद्देश वैज्ञानिक माहितीचे आकलन होणे, तिचे विश्‍लेषण करणे आणि त्या आधारे योग्य शिक्षणापर्यंत पोचणे हा असायला हवा. पण सध्या शालेय स्तरावर काय चित्र दिसते ? अभ्यासक्रमात जास्तीत जास्त आशय (content) शिकविण्यावर भर देण्याचा प्रयत्न  काही शाळांमधून होताना दिसतो. प्रयोगशाळा मात्र कमी कमी होत आहेत. (काही अपवाद वगळता) त्यामुळे माहिती वाचायची आणि ती लक्षात ठेवायची, असे अभ्यासाचे स्वरूप बनत आहे. त्यामुळे विज्ञान शिकणे आणि शिकविणे कंटाळवाणे वाटू शकते. हे चित्र बदलायला हवे. प्रत्येकाला शास्त्रज्ञ व्हायचे नसते; पण विज्ञानशिक्षणातून जी दृष्टी मिळते, ती सगळ्यांनाच उपयोगाची असते. युनेस्कोने देखील "सर्वांसाठी विज्ञान-तंत्रज्ञान साक्षरता' हे ध्येय स्वीकारले आहे. विज्ञानाशी संबंधित अनेक बाबी अशा असतात, की त्यांना सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्व असते. उदाहरणार्थ, अणुऊर्जा प्रकल्पांचे ठिकाण किंवा धरणांची उंची, यासारखे विषय. अशा गोष्टींचे स्वतंत्रपणे आकलन करून घेण्याची क्षमता प्रत्येक नागरिकाकडे असणे ही एक गरज आहे. त्याचबरोबर ज्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी पुरेशी पायाभरणी करणे हाही शालेय अभ्यासक्रमातील विज्ञान शिक्षणाचा उद्देश आहे. कोणत्याही पाठ्यक्रमातून त्या त्या विषयाबद्दल विद्यार्थ्यांत रूची निर्माण होणे अपेक्षित असते. विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा जागी करणे, मनात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे आणि या सगळ्यांतून त्यांना आनंद घेता येणे, अशा प्रकारच्या शिक्षणातून खरे ज्ञान मिळते.शालेय शिक्षणात विज्ञानाची प्रभावीपणे रुजुवात करण्यासाठी पारंपरिक पद्धतीचे शिक्षण हा एक पध्दती आहे. पण त्याचा उद्देश केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि परीक्षेची तयारी करणे असा नसावा, तर विद्यार्थ्यांच्या प्रश्‍न विचारण्याच्या वृत्तीला त्यात प्रोत्साहन द्यायला हवे. शिक्षकांनी त्यांना अधूनमधून प्रश्न  विचारून विद्यार्थ्यांना विषय समजला आहे किंवा नाही, याची चाचपणी करायला  हवी. दुसरी पध्दती आहे ती प्रयोगशाळेतील शिक्षणाची. साठ वर्षांपूर्वी अमेरिकेत विज्ञान-तंत्रज्ञान या विषयाच्या शिक्षणात जो बदल करण्यात आला, तो लक्षात घेण्यासारखा आहे. त्या काळात अमेरिका व तत्कालीन सोव्हिएत संघराज्य यांच्यात शीतयुद्ध शिगेला पोचले होते. चार ऑक्‍टोबर 1957 रोजी जगात पहिल्यांदा उपग्रहाचे (स्पूटनिक) प्रक्षेपण केले. याचा अमेरिकेला चांगलाच धक्का बसला. त्यांनी आत्मपरीक्षण केले. त्याचा एक भाग म्हणजे विज्ञानाच्या शिक्षणात त्या देशाने आमूलाग्र बदल केले. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे "प्रयोगातून शिक्षण' यावर शालेय शिक्षणपद्धतीत भर दिला. विज्ञानातील संकल्पनांच्या आकलनास ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. त्यांचे समग्र आकलन होते.
21 व्या शतकात वावरणारी आमची नवीन पिढी विज्ञानाभिमुख असावी. विद्यार्थ्यांमध्ये चौकसपणा, जिज्ञासावृत्ती, प्रत्येक घटनेचा कार्यकारणभाव जाणून घेण्याची वृत्ती जोपासली जावी यासाठी आजचे विज्ञान प्रयोगशील असायला हवे. प्रत्येक विद्यार्थी प्रयोगातून प्रत्येक घटनेचा पडताळा घेण्यासाठी सक्षम व्हावा या हेतूने प्रत्येक शाळेत विविध साधनांनी युक्त प्रयोगशाळा असायला हवी. वर्गखोलीमध्ये केवळ खडू व फळा यांच्या साह्याने विज्ञान शिक्षण परिणामकारक होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी त्यांना प्रात्यक्षिकासह शैक्षणिक अनुभव देणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्वत: प्रयोग करावेत, उपकरणे हाताळावी, त्यांची योग्य ती निगा राखावी यासाठी प्रयोगशाळा अत्यंत आवश्यक व महत्वाची ठरते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व राज्य अभ्यासक्रम आराखडा यामध्ये दिलेल्या निर्देशानुसार राज्याचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. राज्याने विद्यार्थी सर्वांगिण विकासासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. वरील सर्व मार्गदर्शक अभिलेखांमधून विज्ञान विषयाच्या अध्यापनात प्रयोग व प्रात्यक्षिकाला महत्व देण्यात आलेले आहे.
1.      प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये सोपे प्रयोग व प्रात्यक्षिक करण्या-या कौशल्यांची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेमध्ये प्रयोगशाळा, विज्ञान कोपरा, विज्ञानपेटी असणे सक्तीचे करण्यात आलेले आहे.
2.      उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावर विज्ञानाचे अध्यापन करतांना अध्यापनाची उद्दीष्टे व कौशल्यनिर्मिती यांचा विचार करून विद्यार्थांना प्रयोग व प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी करायला हवे. निरिक्षण करणे, साम्यभेदाचा विचार करणे, माहिती जमा करणे, वर्गीकरण करणे, सामान्यीकरण करणे, निष्कर्ष काढणे यासारखी कौशल्ये उच्च प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये विकसीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असायला हवी.
निरिक्षण, आकलन, संकलन, वर्गीकरण, निष्कर्ष, अनुमान, तर्क, उपयोजन यासारख्या उद्दीष्टांचा विचार करुन विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. यामधून विद्यार्थ्यांमध्ये प्रयोग कौशल्याचा विकास करुन वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करता येतो. एकंदरीत शाळेमध्ये प्रयोगशाळा असणे अत्यंत महत्वाचे व आवश्यक ठरते.
प्रयोगशाळा - विषयातील स्थापित प्रयोग जेथे करून बघितले जातात व ते विद्यार्थ्यांना शिकविण्यास विविध उपकरणांची सोय जेथे केलेली असते त्या ठिकाणास प्रयोगशाळा असे म्हणतात. शालेय प्रयोगशाळेचे दोन प्रकार पाहावयास मिळतात.
1. आदर्श प्रयोगशाळाडॉ. आर.एच. व्हाईटहाऊस माजी प्राचार्य सेंट्र्ल ट्रेनिंग कॉलेज, लाहोर यांनी आदर्श प्रयोगशाळेचा आराखडा तयार केला आहे. हा आराखडा सर्व प्रथम पंजाबमध्ये वापरला गेला. या प्रयोगशाळेत विषयानुरुप दालने, कक्ष असतात. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र खोल्या असतात. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र या विज्ञान शाखांच्या अध्ययन अध्यापनासाठी ही प्रयोगशाळा उपयोगी असते. या प्रयोगशाळेत कपाटांची सुनियोजित रचना असते. दिग्दर्शन टेबल, प्रयोग करण्याचे टेबल, नोंदी घेण्याचे व लेखन करण्याचे टेबल अशाप्रकारे स्वतंत्र टेबल असतात. प्रत्येक टेबल हे गरजेनुरुप बनविलेले असतात. आवश्यकतेनुरुप पाणी व विजेची सोय केलेली असते. प्रयोगशाळेत प्रत्येक वस्तू व टेबल वापरण्याच्या सूचना दिलेल्या असतात. कपाटातील वैज्ञानिक साधने , उपकरणे व यंत्र कसे वापरावे याचे मार्गदर्शन करणारे फलक व पुस्तके देखिल उपलब्ध असतात. रसायने, द्रव्य, औषधे यांच्या कुपी, बाटली, जार, भांडे यावर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या लावलेल्या असतात. प्रत्येक उपकरणे व साधनांची आधी माहिती दिली जाते व त्याच्या वापराचे प्रशिक्षण दिले जाते. जीवशास्त्र विषय अध्यापनासाठी प्राणी व पक्षी देखील प्रत्यक्ष दाखविले जातात. प्राणी ठेवण्यासाठी पिंजरे, साधन सुविधा असते. प्रयोगशाळेत पिंजरे ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा असते.
2. सर्व सामान्य प्रयोगशाळाविज्ञान विषयातील प्रात्यक्षिके व तात्विक आशयाच्या स्पष्टेसाठी शाळामधून सर्व सामान्य प्रयोगशाळा पाहावयास मिळते. सामान्य प्रयोगशाळा एका मोठ्या खोलीत तयार केली जाते. एकाच खोलीमध्ये विविध विषय शिकविले जातात. या प्रयोगशाळेत चार ते पाच कपाटे असतात. ही कपाटे विषयानुरुप असतात. कपाटाची रचना ही विशिष्ट पध्दतीची असते. कपाटाला असलेल्या काचेमधून कपाटातील वस्तू, साधने, उपकरणे, कुप्या, बरण्या व द्रव्ये दिसून येतात. प्रत्येक वस्तू व साधनांची नावे व उपयोग कसा करावा याचे मार्गदर्शन केलेले असते. प्रयोगशाळेतील भिंतीवर सुरक्षा फलक लावलेले असतात. काही भिंतीवर शास्त्रज्ञांची माहिती दिलेली असते. प्रयोगशाळेत पाणी, हवा, उजेड व विद्युत सुविधा असते. प्रयोग करण्याच्या टेबल भोवती विद्यार्थी बसण्यासाठी स्टूलची रचना केलेली असते. वायुविजनचे प्रयोजन केलेले असते.
विज्ञान कोपरा - भारतातील विषेशत: महाराष्ट्रातील छोट्या शाळांचा विचार केल्यास अशाप्रकारे सुसज्ज प्रयोगशाळा निर्माण करणे हे देश व राज्यापुढील मोठे आव्हान आहे. शालेय इमारत व खोल्यांच्या कमरतेमुळे स्वतंत्र खोलीमध्ये प्रयोगशाळा सुरु करण्यात अडचणी आहेत. ग्रामिण भागात नव्याने सुरु झालेल्या व छोट्या लोकवस्तीमधील शाळा या दोन शिक्षकी आहेत. अशा शाळामध्ये फक्त दोनच वर्ग खोल्या आहेत. अशा शाळामधून विज्ञान विषय शिकविण्यासाठी स्वतंत्र व अद्ययावत खोली उपलब्ध होत नाही. विद्यार्थी सर्वांगिण विकासामध्ये विज्ञान विषयाचे, प्रयोग व प्रात्यक्षिकाचे महत्व पाहता या शाळामधून विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी विज्ञान कोपरा तयार केला जातो. वर्ग खोलीच्या एका कोप-यामध्ये गरजेनुरुप एक कपाट, दोन ते तीन टेबलची रचना करुन विज्ञान कोपरा तयार केला जातो. विज्ञान विषयक प्रयोग व प्रात्यक्षिके याठीकाणी दाखविले जातात.
विज्ञान पेटीप्राथमिक शाळामधून विज्ञान विषयाचे प्रयोग व प्रात्यक्षिकाच्या अध्ययन अध्यापनासाठी शासनाकडून विज्ञान पेटी पुरविण्यात आलेली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तराचा अभ्यास करुन आवश्यक असलेली प्रयोग साधने, उपकरणे, यंत्रे, द्रव्ये, काचेची भांडी लिटमस पेपर, रसायने व इतर आवश्यक साहित्य यामधून पुरविण्यात आलेली आहे. शिक्षक विज्ञान विषयाच्या अध्ययन व अध्यपनाच्या वेळी या विज्ञानपेटीचा  गरजेनुरुप वापर करतात.
क्षेत्रभेटी -  अध्यापनात शब्द प्रतीकांपेक्षा प्रत्यक्ष अनुभव महत्वाचे असतात.  विज्ञान व त्यासोबतच परिसर अभ्यास विषयासाठी क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते.अद्ययावत यंत्रे व उपकरणे असलेल्या ठिकाणाच्या भेटीमधून देखिल विद्यार्थ्याच्या जिज्ञासूवृत्तीला चालना मिळते. क्षेत्रभेटीच्या माध्यमातून लहान शाळांना आपल्या जवळच्या माध्यमिक शाळांमध्ये उपलब्ध प्रयोगशाळांना भेट देऊन माहिती मिळविता येते. 
अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज - अलीकडे आपल्या केंद्र सरकारने "अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज' या नावाचा कार्यक्रम तयार केला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची संस्कृती (इनोव्हेशन) बिंबवणे हा त्याचा उद्देश आहे. तसेच डिझाईन माईंडसेट, कम्प्युटेशनल थिंकिंग आणि ऍडेप्टिव्ह लर्निंग इ. कौशल्ये अंगी बाणवणे हाही हेतू आहे. विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील उपकरणे नि सुविधा वापरून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयांतील संकल्पना शिकण्याची संधी मिळणार आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स, रोबोटिक्‍स, सेमीकंडक्‍टर बोर्डस, सेन्सर्स, थ्री डी प्रिंटर्स व कॉम्प्युटर या बाबतीत प्रयोग करता येतील. पात्र शाळांना सुरुवातीला पाच लाख रुपये आणि नंतर पाच वर्षांसाठी दरवर्षी दहा लाख रुपये अशी मदत देण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळांनी आवश्यक त्या माहितीसह प्रस्ताव सादर केल्यास शाळांना प्रयोगशाळा निर्मितीसाठी केंद्र शासनकडून अनुदान प्राप्त होते. राज्यातील 19 माध्यमिक शाळांना सन 2016/17 मध्ये याचा लाभ मिळालेला आहे. सन 2017/2018  मध्ये देखिल मोठ्या प्रमाणात शाळांनी या प्रयोगशाळांची मागणी केल्याचे दिसून येत आहे.
प्रयोगशाळेत लागणारे किमान फर्निचर
शिक्षकांना प्रयोग व दिग्दर्शन करण्यासाठी टेबल
विद्यार्थी प्रयोग टेबल
काचेचा दरवाजा असलेले कपाट
काचेची भांडी ठेवण्याचे कपाट किंवा मांडणी
तक्ते व फलक ठेवण्याची मांडणी
साधे कपाट (रजिष्टरे व नोंदवह्या ठेवण्यासाठी)
शिक्षक खुर्ची
विद्यार्थ्यांना बसण्यासाठी स्टूल्स किंवा खुर्च्या
प्रयोगशाळेत लागणारे आवश्यक व किमान अवजारे, साधने व इतर वस्तू
हातोडी
चिमटे
स्क्रू ड्रायव्हर संच (पेचकस)
सुरी
बुच उघडण्याचा पान्हा
कात्री साधी
कात्री पत्रा कापण्याची
प्रथमोपचार पेटी
रबरी पाईप
रबरी बुच
सोल्डरींग वायर
छीद्र पाडण्याची आरी (गिरमिट)
स्टीकर पट्टी
ऍरलडाईट , डींक, फेव्हीकॉल
बादली (2 ते 3 नग)
मग (2 ते 3 नग)
विच्छेदन पेटी
तापमापी
थर्मास फ्लास्क
लाकडी फळी
सुक्ष्मदर्शक यंत्र
चुंबक सूची
काचपट्ट्या पेटी
स्क्रु प्रमापी, व्हर्निअर कैवार
टेप मीटर
वजन
मापे
प्रथमोपचार पेटी प्रयोगशाळेत प्रयोग चालू असतांना अपघाताने इजा होऊ शकते. त्यासाठी प्रयोगशाळेमध्ये  प्रथमोपचार पेटी आवश्यक आहे. प्रथमोपचार पेटीत खालील साहित्य व औषधे ठेवणे आवश्यक असते.
बॅंडेजेस
कॉटन वुल
ॲडीझिव्ह प्लास्टर
ड्रेसिंग्ज
आय ड्रॉपर
डोळा धुतांना वापरावयाचे भांडे
चिमटे
निर्जंतुक गॉज पट्ट्या
विविध सेफ्टी पीन्स
टोकदार कात्री
मऊ कापूस
डीस्टील वॉटर
मलम
सल्फोनामाईड क्रीम
व्हॅसलीन डबी
मोहरी तेल
खाण्याचे मीठ
सोडीयम बय कार्बोनाईट
एरंडी तेल
ग्लिसरीन
मिल्क ऑफ मॅग्नेशियम
बोरीक ॲसिड
टींक्चर आयोडीन
सिल्व्हर नायट्रेट
ॲसेटीक ॲसिड
डेटॉल
साबण

केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार
v  प्रत्येक शाळेत विज्ञान विषयाच्या प्रयोग व प्रात्यक्षिकांसाठी प्रयोगशाळा असावी.
v  प्रयोगशाळेमध्ये आवश्यक फर्निचर असावे.
v  प्रयोगशाळेत विद्यार्थी व शिक्षक यांचेसाठी प्रथमोपचार पेटी असावी.
 वरील निकष हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांकरिता लागू राहतील.
प्रयोगशाळा याबाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1.      शाळेत प्रयोगशाळा आहे काय ?
2.      प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र खोली आहे काय ?    
3.      शाळेत उपलब्ध प्रयोगशाळा स्थिती
अ)   एकत्रित विज्ञान प्रयोगशाळा
आ) विविध उद्देशासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा (प्रयोग दिग्दर्शन)
इ)      उपकरणे व साहित्य ठेवण्यासाठी केवळ एक कोपरा किंवा कपाट
ई)      प्रयोग करण्यासाठी साहित्य नाही.
वरील प्रश्नासह शाळासिध्दी कार्यक्रमात वर्णन विधाने दिलेली असतात. या वर्णन विधानानुसार शाळा स्वयं मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन होत असते. मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे ठरवावे. वर्णनविधानाची निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन विधाने व वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1)      a) स्वतंत्र प्रयोगशाळा नाही. उपकरणे व प्रयोगशाळा साहित्य ठेवण्यासाठी काही जागा राखून ठेवली जाते.
b) शिक्षक काही प्रयोगांचे वर्गात दिग्दर्शन करतात. विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यास क्वचितच संधी मिळते.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे. )
2)      a) दिग्दर्शनासाठी मुलभुत साहित्य उपलब्ध आहे. विज्ञान व गणितासाठी संयुक्त प्रयोगशाळा अस्तित्वात आहे.(उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्गासाठी )
b) अभ्यासक्रमानुसार सूचित प्रयोग दिग्दर्शन करुन शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवितात. विद्यार्थ्यांना कधी कधी प्रयोगशाळेत प्रयोग करण्याची संधी मिळते. सुरक्षा यंत्रणा सुस्थितीत आहे.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे. )
3)      a) सर्व आवश्यक प्रयोगशाळा उपलब्ध आहेत व राज्याच्या निकषांनुसार व विवरणानुसार साहित्याने परिपूर्ण आहेत. विद्युत पुरवठा व वाहते पाणी सुनिश्चित केले आहे.
b) प्रयोगशाळेत सर्व सुचित प्रयोग करण्यासाठी संधी प्रत्येक विद्यार्थाला मिळते. शिक्षक प्रयोगशाळेचा वापर संबंधीत घटक वर्गात शिकवितांना त्याचवेळी प्रयोग करण्यासाठी करतात.
 ( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 3 गुण देण्यात यावे. )

वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करतात. तसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितात. त्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजते. गाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने काय करावे हे समजते. वर्णनविधानाची निवड केल्यानंतर शाळेला स्वत: चे गुणवत्तेमधील स्थान समजते. त्यानंतर प्रत्येक शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागते. या नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. प्राधान्यक्रमानुसार प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागते. या कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतो. अशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.

प्रयोगशाळा याविषयी अधिक माहीतीसाठी shalasiddhimaha@gmail.com या मेल आय डी वर सविस्तर मेल करावा.

लेखाबाबत आपल्या प्रतिक्रीया  asiflshaikh1111@gmail.com मेलवर कळविण्यात याव्यात ही विनंती. शाळासिध्दी लेखमाला (ENGLISH) मध्ये व आधीचे सर्व भाग   asiflshaikh.blogspot.com  वर उपलब्ध आहेत.

                                                                                                   असिफ शेख,
कार्यक्रम अधिकारी RMSAतथा राज्यसंपर्क अधिकारी शाळासिध्दी.

No comments:

Post a Comment