शाळासिध्दी
लेखमाला - 12
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम -
शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य
स्त्रोत – स्वच्छतागृहे (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 12)
स्वच्छतागृहे
अन्नवस्त्र व निवारा
या मानवाच्या मूलभूत गरजा आहे. मानवी शरीराला कार्य करण्यासाठी,
विकासासाठी व शरीराची
झालेली झीज भरुन काढण्यासाठी अन्नाची गरज असते. अन्नामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळते. अन्न हे पोटात
गेल्यानंतर त्यावर विविध प्रक्रीया होते. अन्नपचनाची क्रीया झाल्यानंतर
अन्नाचा काही भाग शरीराला वापरण्या योग्य राहत नाही. त्याला शरीर
बाहेर काढते. घन (मल), द्रव (मूत्र व घाम) व वायू या स्वरुपात
अन्नाचा नको असलेला भाग शरीराच्या बाहेर टाकला जातो. मल व मूत्रविसर्जनासाठी
शौचालयाचा वापर केला जातो.अशावेळी विसर्जनासाठी शरीराच्या
ज्या भागाचा उपयोग केला जातो त्या भागाची स्वच्छता करणे महत्वाचे असते. शरीरातूनबाहेर टाकल्या जाणा-या टाकाऊ घन व द्रव पदार्थात
जंताची अंडी, असंख्य जीवाणू, विषाणू,
रोगजंतू व अपायकारक द्रव्य असतात. उघड्यावर शौचास
केल्याने हे रोगजंतू हवेत,परिसरात पसरण्याची शक्यता असते. पाण्याच्या
परीसरात उघड्यावर शौचास गेल्याने हे रोगजंतू पाण्यात जाऊन पाणी प्रदूषित होण्याची शक्यता
असते. उघड्यावर शौचास गेल्यावर वातावरणामधील कीटक ,माश्या या शौचावर बसतात. त्यानंतर अन्नावर बसतात.अशाप्रकारे प्रदूषित अन्न व
पाण्यातून पोटात गेल्यास विविध आजार होतात. उघड्यावर शौचास बसण्याच्या
पध्दतीला आळा घालण्यासाठी प्रत्येक गावात, प्रत्येकघरात,
प्रत्येक शाळेत शौचालय असणे आवश्यक ठरते.
उघडयावर मलविसर्जनाची
प्रथा अडाणीपणाची आहे. आरोग्याच्या दृष्टीने उघड्यावर हागणदारीचे अनेक दुष्परिणाम
होतात.हागणदारीचा मैला पावसाळ्यात वाहून जाऊन पाणीसाठे प्रदूषित होतात. उघड्यावर
मैला पडल्याने मानवी वस्तीचा आणि मळाचा संपर्क निरनिराळ्या प्रकारे होतो.यामुळे
त्यातले जीवजंतू मानवी अन्नसाखळीत फिरत राहतात. हात, पाय, पाणी, भाजीपाला, माशा या
सर्वांमधून रोगराई घराघरात पसरते. अतिसार, जंत, विषमज्वर, आव, पटकी, कावीळ या
आजारांचा सर्वत्र कमीजास्त प्रमाणात प्रभाव आहे. या आजारामुळे बालपणापासून
कुपोषणाची समस्या मागे लागते. यामुळे भूक कमी लागणे, पचन कमी होणे, खाल्लेले अन्न
अंगी ण लागणे असे दुष्परिणाम होतात. कुपोषणामुळे शिक्षण आणि उत्पादकता कमी होते. आजार
व रोगराईमुळे कुटुंबाचा आर्थिक तोटाही व परिणामी देशाचा आर्थिक तोटा होतो.
स्त्रिया, लहान मुले वृद्ध माणसे यांना स्वच्छतागृहाची सुविधा नसल्यास हाल सोसावे
लागतात. ही सर्व समस्या शाळा, समाज व संवादामधून प्रत्येक कुटुंबाला समजाऊन
सांगायला हवी. सर्व समाजाने स्वच्छतेचे महत्व ओळखून स्वच्छता अभियानामध्ये सहभागी
व्हायला हवे. स्वच्छता अभियान हे कायदा करून नव्हे तर प्रबोधनातून व्हायला हवे.
केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरी भागात देखील उघड्यावर मलविसर्जन व हागणदारीची समस्या
आहे. ग्रामीण भागात राहणारे गरीब कुटुंबाकडे स्वच्छतागृहाची सोय नाही. ग्रामीण
भागात बांधलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे उघड्यावर
मलविसर्जन केले जाते. ग्रामीण भागातील स्त्रिया भल्या पहाटे किंवा रात्री शौचास
जावे लागते. शहरी भागात असलेल्या झोपडपट्टी परिसरात भेट दिल्यास जागेची समस्या
दिसून येते. जागा उपलब्ध नसल्याने स्वच्छतागृहाचा अभाव दिसून येतो. सार्वजनिक
स्वच्छतागृह असतात परंतु लोकासंख्येचा विचार करता ते पुरेसे नसतात. त्याबरोबरच
बहुतेक वेळा त्यांची दुरुस्ती व देखभाल केली जात नसल्याचे आढळते. सार्वजनिक
स्वच्छतागृहात पाणी उपलब्ध करणे ही देखील मोठी समस्या असते. परिणामी दुर्गंधी पसरत
असते. त्यामुळे झोपडपट्टी परिसरातील लोक उघड्यावर शौचास जातात. उघड्यावर शौचास
बसणे, उघड्यावर कचरा टाकणे या समस्या सर्वच झोपडपट्टी परिसरात दिसून येतात.
शासनाची सुधारित धोरणानुसार उघड्यावर शौचास बसण्यास व अस्वच्छता करण्यास बंदी केली
असून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना दंड केला जातो. यामुळे स्वच्छतागृहाचा वापर
करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
उघड्यावर बसल्यामुळे
अनेक रोगांचा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसार होतो. रोगाची लागण झालेल्या
व्यक्तीच्या विष्टेमध्ये रोगाचे जंतू, जंताची अंडी व अळ्या असतात. त्या अतिशय
सुक्ष्म असल्याने माणसाच्या डोळ्याला दिसू शकत नाहीत. या रोगजंतूचा प्रसार हवा,
पाणी , माशा, झुरळे, हाताचा स्पर्श किंवा कीटक यांच्या मार्फत होतो. पोटात दुखणे,
अतिसार, विषमज्वर, कावीळ या आजाराचे महत्वाचे कारण जंतू संसर्ग हेच आहे.
घरात शौचालयाची सुविधा
उपलब्ध नसल्यास व शौचालय घरापासून दूर असल्यास काही लोक नदी किनारी, रेल्वेलाईन
जवळ किंवा रस्त्याच्या कडेस बसतात. स्त्रियांना भल्या पहाटे लोकांना जाग येण्याआधी
किंवा रात्री अंधारात जावे लागते. दिवसा उजेडात त्यांना जाता येत नाही.त्यामुळे
पोट दुखते व आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. बऱ्याच ठिकाणी लहान मुलांना
उघड्यावर, नालीमध्ये बसविले जाते. लहान मुलांच्या विष्टेमध्ये देखील अपायकारक
रोगजंतू असतात. त्यामुळे लहान मुलांना देखील लहानपणापासून स्वच्छतागृहाचा वापर
करण्याची सवय लावावी.
हागणदारीमुक्तीसाठी
तंत्रज्ञान – मानवी विष्ठा आणि माणूस यांचा संबंध येणार नाही अशाप्रकारे
विष्ठेची विल्हेवाट लावणे हे हागणदारीमुक्तीचे मुख्य तत्व आहे. यासाठी विष्ठा सरळ
जमिनीत पडणे किंवा गाडणे हेच महत्वाचे असते.जंगलात अनेक प्राणी आपली विष्ठा गाडून
टाकतात.पाळीव प्राण्यापैकी मांजर देखील हेच तत्व पाळते. यात्रा किंवा शिबिराच्या
वेळी चरांचे स्वच्छतागृह वापरले जातात.पुढे हे चर मातीने बुजविले जातात.
स्वच्छतागृह बांधण्याआधी व वापरण्याआधी त्यामागील तत्वे समजून घ्यायला हवीत.
त्यासाठी काही स्वच्छतागृहाचे प्रकार समजून घेणे क्रमप्राप्त ठरते.
साधे स्वच्छतागृह –
साध्या स्वच्छतागृहात तीन मुल घटक असतात. अ) आडोसा, ब) खड्डा किंवा टाकी , क)
भांडे तसेच थोड्या प्रगत स्वच्छतागृहात १)
आडोसा, २) टाकी, ३) भांडे, ४) एस पाईप किंवा कोंबडा, ५) हवेचा पाईप असे घटक असतात.
याशिवाय प्रगत स्वच्छतागृहात अत्याधुनिक तंत्राचा वापर केलें दिसून येतो. प्रत्येक
प्रकारचे काही फायदे तर काही तोटे आहेत. प्रत्येक प्रकारचा खर्च देखील वेगवेगळा
आहे. भारत सरकारच्या ग्रामीण विकास खात्याने स्वच्छतागृहाच्या बाबतीत अत्यंत सखोल
असे संशोधन केलेले आहे व करत आहे. आज अस्तित्वात असलेल्या बहुतांश
स्वच्छतागृहामधून मल व मुत्र एकत्रितपणे एकाच पाईपमधून वाहून नेले जाते. काही
ठिकाणी एकत्रित मल व मूत्र शेतीकरिता वापरले जाते परंतु असे आढळून आले आहे की,
मानवी विष्ठेमध्ये आरोग्यास घातक असे जे जीवाणू असतात त्यांचा परिणाम शेतीमधील
पिकांवर होऊ शकतो.त्यामुळे आरोग्यास धोका होण्याची शक्यता वाढते.
इको सॅनिटेशन – मानवी
मूत्रामध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसानकारक जीवाणू नसतात. याउलट शेतीसाठी उपयोगी
अशी अनेक मूलद्रव्ये असतात. ही मूलद्रव्ये शेतीमध्ये सरळ वापरल्याने आरोग्यास
नुकसान होण्याची शक्यता नसते. त्यामुळे इको सॅनिटेशन ही पध्दत वापरली जाते. या
पध्दतीमध्ये स्वच्छतागृहाची रचना अशी केली जाते की, मूत्र स्वतंत्रपणे जमा होते
आणि विष्ठा पाण्याचा वापर न करता वेगळ्या टाकीमध्ये जमा होते. या विष्ठेवर
राख/चुना किंवा भुसा टाकला जातो व कोरडी केली जाते. पाण्याचा संपर्क येत नसल्याने
घातक जीवाणूंची त्यात वाढ होत नाही तसेच कोरडी करण्याच्या प्रक्रियेत घातक
जीवाणूंचा त्वरित नाश होतो. त्यानंतर विशिष्ट संस्करण करून तिचे रुपांतर खतामध्ये
केले जाते. हे खत सुरक्षितपणे शेतीसाठी वापरले जाऊ शकते. इको सॅनिटेशन पध्दतीत
स्वतंत्रपणे जमा झालेल्या मूत्राचा वापर फळे देणाऱ्या झाडांसाठी करावा. मूत्राचा
वापर कच्च्या स्वरुपात खाल्ल्या जाणाऱ्या भाजीपाल्यासाठी करू नये. एका संशोधनात
असे आढळून आले आहे की, मानवी मुत्रामध्ये नत्राचे (नायट्रोजन ) प्रमाण 70 टक्के
असते आणि स्फुरदचे (फॉस्फरस) प्रमाण 20 ते 30 टक्के असते. घातक जीवाणू असल्याने मूत्राचा सरळ उपयोग खतासाठी केला जातो. मात्र
मल व मूत्र एकत्रित झाल्यास विष्ठेमधील जीवाणूंचा प्रादुर्भाव मूत्रावर होऊन त
देखील दुषित होते.त्यामुळे विभाजन करणे फायदेशीर असते.
घातक जीवाणूंचा नाश
करणे
– ही पर्यावरणीय स्वच्छता पध्दती सध्या प्रचलित असलेल्या मलमूत्राच्या सर्व
प्रकारच्या प्रक्रीयापेक्षा स्वस्त, सुरक्षित आणि गतिमान अशी पध्दती आहे. अतिशय
कमी वेळात खताचे मूल्य वाढते आणि घातक जीवाणूंचा नाश लवकर होतो. विष्ठेचे तापमान
वाढविले जाते त्यामुळे त्यातील घातक जीवाणूंचा नाश लवकर होतो त्यानंतर त्यामध्ये
राख टाकली जाते. राखेमुळे घातक जीवाणूंचा नाश अधिक गतीने होतो व अतिशय चांगले खत
तयार होते असे एका संशोधनात आढळून आले आहे.
इकॉलॉजिकल सॅनिटेशन
तंत्रज्ञान – सुरुवातीलाच वेगळ्या केलेल्या मूत्रामध्ये नायट्रोजन व स्फुरदचे
प्रमाण अधिक असते. मूत्रामध्ये नायट्रोजन अमोनियाच्या रुपामध्ये आहे आणि अमोनिया
हा काही झाडाकरिता अधिक उग्र व जहरी असल्यामुळे याचा वापर करतांना झाडांसोबत
मूत्राचा सरळ संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच झाडांपासून काही अंतर सोडून
जमिनीमध्ये मूत्राचा वापर खतासाठी करावा. असे केल्याने मूत्राचा खाता म्हणून वापर
अधिक प्रमाणात केला जाऊ शकतो.मूत्र स्वतंत्रपणे गोळा करणे,त्यांना वाहून नेणे व
शेतामध्ये वापरणे हे अधिक स्वस्त व फायदेशीर असल्याचे लक्षात येईल. इकॉलॉजिकल
सॅनिटेशन किंवा पर्यावरणीय स्वच्छता हे एक तंत्र म्हणून विचार करण्याऐवजी एक वेगळी
चळवळ म्हणून त्याचा प्रसार करणे आवश्यक आहे. मूत्रामधून मिळणारे मूलद्रव्य शेतीतील
पिक वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त व सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. इकॉलॉजिकल
सॅनिटेशन या तंत्रज्ञानास फक्त गरिबांसाठी किंवा दुय्यम दर्जाचे तंत्रज्ञान किंवा
स्वस्त शौचालय पध्दती या रूपाने बघण्यात येऊ नये.त्याऐवजी हे तंत्रज्ञान
सर्वांसाठी समाजातील सर्व घटकांसाठी कसे उपलब्ध करून देता येईल हे बघणे आवश्यक
आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणीय समतोल साधणे सहज शक्य होणार आहे.
भारत
सरकारने स्वच्छ भारत मिशनचा एक भाग म्हणून स्वच्छ भारत सुंदर शाळा अभियान सुरु
केले आहे. देशातील सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी, मुला-मुलींसाठी व अपंगासाठी
स्वतंत्र शौचालये, हात धुण्याची सुविधा या सुविधासोबतच त्यांचा वापर, देखभाल व
दुरुस्ती , विद्यार्थी , शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांची क्षमता बांधणी अशा
प्रमुख सहा घटकावर कार्य करण्याचे निश्चित केलेले आहे. विद्यार्थी जीवनात
स्वच्छतेचे महत्व खूप मोठे आहे. विद्यार्थी जीवनात त्यांना आरोग्यदायी सवयी
लागल्या तर संपूर्ण आयुष्यभर त्यांना त्याचा लाभ होतो. शाळेमध्ये पिण्याचे शुध्द
पाणी, स्वच्छतेच्या सुविधा विशेषत: मुला-मुलींना स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध
झाल्यास त्याचा विद्यार्थी उपस्थिती व गुणवत्तेवर चांगला परिणाम होतो. हार्वर्ड
विद्यापीठाच्या डॉ अंजली अडूकीया यांनी २०१४ मध्ये केलेल्या अभ्यासात असे निदर्शनास
आले आहे की, जर शाळेत पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छतेच्या सुविधा व स्वतंत्र
स्वच्छतागृहे उपलब्ध असतील तर प्राथमिक शाळेतील उपस्थिती 12 टक्क्यांनी वाढते तर
उच्च प्राथमिक शाळेतील उपस्थिती 08 टक्क्यांनी वाढते. या सुविधांचा मोठा फायदा
मुलींना व महिला शिक्षकांना होत असतो. राजस्थान मधील अलवार जिल्ह्यातील
माहितीनुसार स्वच्छता सुविधा व स्वच्छतागृहामुळे मुलींची शाळेतील नोंदणी 33
टक्क्यांनी वाढली तर मुलां-मुलींच्या प्रगतीत 25 टक्के वाढ झालेली आहे. यामुळेच
भारत सरकारने हे स्वच्छता अभियान सुरु केले आहे. हे अभियान केवळ स्वच्छतेपुरतेच
मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या एकूण विकासाशीही ते निगडीत आहे. प्रत्येक शाळेत
स्वच्छता विषयक सुविधांसह स्वच्छतागृह
असणे ही काळाची गरज बनले आहे.
शालेय
स्वच्छतागृह निर्माण करतांना घ्यावयाची काळजी
१) स्वच्छतागृह
व मुतारीघर हे शाळेच्या इमारतीत असावे. किंवा शालेय इमारतीपासून 30 मीटर अंतरात
असावे.
२) स्वच्छतागृहात
व मुतारीघर मध्ये जातांना विद्यार्थ्याच्या मनात भीती निर्माण होणार नाही अशी
व्यवस्था असावी. स्वच्छतागृहाची जागा सुरक्षित असावी.
३) स्वच्छतागृहात
व मुतारीघरमध्ये पाण्याची सुविधा असावी. खेळती हवा व सूर्यप्रकाश असावा.
४) स्वच्छतागृह
शोषखड्डा असलेले असावे. सेप्टिक टाकीचे शक्यतो नसावे.शोषखड्डा झाकण्यासाठी
सुरक्षित झाकण असावे.
५) स्वच्छतागृहाची
उंची 6 फुट किंवा अधिक त्यापेक्षा असावी.
६) स्वच्छतागृहाचा
दरवाजा शक्यतो बाहेर उघडणारा असावा.
केंद्र
शासनाचे मार्गदर्शक सूचना व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार
स्वच्छतागृह
मुलींसाठी
v 60 विद्यार्थ्यांपर्यंत
एक युनिट- एक युनिट म्हणजे दोन मुताऱ्या व एक शौचालय.
v 60 ते 120
विद्यार्थी संख्या असल्यास एक युनिट म्हणजेच तीन मुताऱ्या व एक
शौचालय.
v पुढील प्रत्येक
30 विद्यार्थ्यांमागे एक अतिरिक्त मुतारी आणि शंभर विद्यार्थ्यांमागे एक
अतिरिक्त शौचालय असावे.
स्वच्छतागृह
मुलांसाठी
v 60 विद्यार्थ्यांपर्यंत
एक युनिट- एक युनिट म्हणजे दोन मुताऱ्या व एक शौचालय.
v 60 ते 120
विद्यार्थी संख्या असल्यास एक युनिट म्हणजेच तीन मुताऱ्या व एक
शौचालय.
v पुढील
प्रत्येक 30
विद्यार्थ्यांमागे एक अतिरिक्त मुतारी आणि शंभर विद्यार्थ्यांमागे
एक अतिरिक्त शौचालय असावे.
स्वच्छतागृह
विशेष गरजा असणाऱ्या मुला-मुलींकरिता एकत्र
v विशेष
गरजा असणाऱ्या मुला-मुलींकरिता एकत्रित असलेल्या
शौचालयामध्ये कमोड पद्धतीचे भांडे हंड्रेल तसेच रॅम्पची व्यवस्था असावी.
v सर्व शिक्षा
अभियान अनुदानाचा वापर प्राधान्याने शौचालय देखभाल व
दुरुस्तीसाठी करण्यात यावा तसेच शाळेच्या उपलब्धतेनुसार तात्पुरते शौचालय किंवा
फिरते शौचालय ठेवण्यात यावे .
वरील निकष हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व
माध्यमांच्या शाळांकरिता लागू राहतील.
स्वच्छतागृह याबाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न
शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1. शाळेत
स्वच्छतागृह आहे काय ?
2. चालू
स्थितीतील स्वच्छतागृहांची संख्या - (
पर्यायासमोर संख्या लिहावी)
अ) मुलांसाठी
स्वच्छतागृह --- ब)
मुलींसाठी स्वच्छतागृह---
क) विशेष
गरजा असणा-या मुलांसाठी स्वच्छतागृह-- ड)
मुलांसाठी मुता-या ----
इ.) कर्मचा-यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह--- फ) स्वच्छतागृह नाही
ग) एकच स्वच्छतागृह
वरील प्रश्नासह शाळासिध्दी कार्यक्रमात वर्णन विधाने
दिलेली असतात. या वर्णन विधानानुसार शाळा स्वयं
मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन होत असते. मुख्याध्यापक व
निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे
ठरवावे. वर्णनविधानाची निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व
वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन विधाने व वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1) a) स्वच्छतागृहाचा अभाव आहे अथवा स्वच्छतागृह अपुरे
आहे. मुलांसाठी ,मुलींसाठी व विशेष गरजा असणा-या
मुलांसाठी स्वच्छतागृहाचा अभाव आहे.
b) स्वच्छतागृहे वाईट अवस्थेत
आहेत.व अनियमित स्वच्छ केली जातात. स्वच्छतागृह धूण्यास व स्वच्छ करण्यास पुरेसे
पाणी नाही.
(वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास
1 गुण देण्यात यावे.)
1) a) मुले
व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध आहेत. संडास व मुता-यांची संख्या
निकषानुसार पुरेशी नाही.
b) स्वच्छतागृहे कार्यान्वित
आहेत व दिवसातून किमन एकदा स्वच्छ केली जातात. धूण्यास व स्वच्छ करण्यास पाणी
मर्यादित वेळेत उपलब्ध आहे. स्वच्छतागृहाची देखभाल प्रसंगी हाती घेतली जाते.
(वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास
2 गुण देण्यात यावे.)
2) a) मुले
व मुलींसाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र स्वच्छतागृह व मुता-या उपलब्ध आहेत. विशेष
गरजा असणा-या मुलांसाठी बालकस्नेही स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
b) सर्व स्वच्छतागृहे
कार्यान्वित आहेतआणि नेहमी देखभाल केली जाते. स्वच्छतागृहाची स्वच्छता नियमित केली
जाते. धूण्यास व स्वच्छ करण्यास नियमित
पाणी पुरवठा सतत उपलब्ध आहे. शाळा स्वच्छतागृहाच्या सफाई व आरोग्यरक्षक व्यवस्थेची देखभाल करते.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास
3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने
ही गुणवत्तेचे वर्णन करतात. तसेच गुणवत्तेचा चढता
क्रम दर्शवितात. त्यामुळे शाळेला स्वत:चे
स्थान समजते. गाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने
काय करावे हे समजते. वर्णनविधानाची निवड केल्यानंतर शाळेला
स्वत: चे गुणवत्तेमधील स्थान समजते. त्यानंतर
प्रत्येक शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागते. या
नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. प्राधान्यक्रमानुसार
प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागते. या
कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतो. अशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.
स्वच्छतागृह
याविषयी अधिक माहीतीसाठी shalasiddhimaha@gmail.com या मेल आय डी वर सविस्तर मेल करावा.
लेखाबाबत आपल्या प्रतिक्रीया asiflshaikh1111@gmail.com
मेलवर कळविण्यात याव्यात ही विनंती. शाळासिध्दी
लेखमाला (ENGLISH) मध्ये व आधीचे सर्व भाग asiflshaikh.blogspot.com वर उपलब्ध आहेत.
असिफ शेख,
कार्यक्रम अधिकारी RMSAतथा
राज्यसंपर्क अधिकारी शाळासिध्दी.
No comments:
Post a Comment