Sunday, February 3, 2019

शिक्षणाची वारी - स्वच्छ भारत, सुंदर शाळा

शिक्षणाची वारी - स्वच्छ भारत, सुंदर शाळा
भारत सरकारने स्वच्छ भारत मिशनचा एक भाग म्हणून स्वच्छ भारत सुंदर शाळा अभियान सुरु केले आहे. देशातील सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी, मुला-मुलींसाठी, अपंगासाठी स्वतंत्र शौचालये, हात धुण्याची सुविधा या सुविधासोबतच त्यांचा वापर, देखभाल व दुरुस्ती , विद्यार्थी , शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांची क्षमता बांधणी अशा प्रमुख सहा घटकावर कार्य करण्याचे निश्चित केलेले आहे. विद्यार्थी जीवनात स्वच्छतेचे महत्व मोठे आहे. विद्यार्थी जीवनात त्यांना आरोग्यदायी सवयी लागल्या तर संपूर्ण आयुष्यभर त्यांना त्याचा लाभ होतो. शाळेमध्ये पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा विद्यार्थी उपस्थिती व गुणवत्तेवर चांगला परिणाम होतो. हार्वर्ड विद्यापीठाच्या डॉ अंजली अडूकीया यांनी २०१४ मध्ये केलेल्या अभ्यासात असे निदर्शनास आले आहे की, जर शाळेत पिण्याचे शुध्द पाणी व स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध असतील तर प्राथमिक शाळेतील उपस्थिती 12 टक्क्यांनी वाढते तर उच्च प्राथमिक शाळेतील उपस्थिती 08 टक्क्यांनी वाढते. या सुविधांचा मोठा फायदा मुलींना व महिला शिक्षकांना होत असतो. राजस्थान मधील अलवार जिल्ह्यातील माहितीनुसार स्वच्छता सुविधामुळे मुलींची शाळेतील नोंदणी 33 टक्क्यांनी वाढली तर मुलां-मुलींच्या प्रगतीत 25 टक्के वाढ झालेली आहे. यामुळेच भारत सरकारने हे स्वच्छता अभियान सुरु केले आहे.हे अभियान केवळ स्वच्छतेपुरतेच मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या एकूण विकासाशीही ते निगडीत आहे.
स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय कार्याक्रमाचे निकष
1)      पिण्याचे पाणी - पाण्याला जीवन असे नाव आहे. ते एकदम सार्थ आहे. सर्व सजीवांचे जीवन पाण्यावरच अवलंबून आहे. मानवाची पाण्याची गरज मानव जातीच्या निर्मितीपासूनची आहे. मानवी शरीरालाच नव्हे तर मानवाच्या उत्क्रांतीसाठी, भरभराटीसाठी व प्रगतीसाठी पाणी आवश्यक आहे.पाण्याला मराठीत रस असेही एक नाव आहे तेही अगदी सार्थ आहे. पाणी हेच मानवी शरीराचा जीवनरस आहे. मानवी शरीर ब-याच अंशी पाण्याचे बनलेले आहे. लहान बालकाच्या शरीराचा 75 टक्के भाग पाण्याचा असतो. हे प्रमाण हळूहळू बदलत जाऊन प्रौढामध्ये त्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्के होते. मानवी शरीरामध्ये ६० ते ७५ टक्के पाणी असूनही जर शरीराभोवती जलरोधक त्वचा नसती तर या पाण्याचे बाष्पीभवन होऊन गेले असते. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण सदा सर्वकाळ योग्य व पुरेसे असावे लागते. शरीरातील पाण्याच्या १० टक्क्याहून जास्त पाणी कमी झाले तर कोणताच सजीव जिवंत राहू शकत नाही. शरीरातील पाण्याचा दोन तृतीयांश भाग पेशीमध्ये असतो. उरलेला एक तृतीयांश भाग रक्त व इतर द्रव्याच्या रूपाने असतो. शरीरातील प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाला, प्रत्येक स्नायूला त्याचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी हा 6 ते 8 तास शाळेत बसत असतो. त्यांच्या शरीराला आवश्यक असणारे पाणी हे त्यांना वेळेत मिळायला हवे. यासाठी प्रत्येक शाळेत शुध्द व नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध असायला हवे. शाळेच्या आवारात किमान एक पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असावा. प्रती विद्यार्थी दररोज किमान 2 लीटर पाणी उपलब्ध असावे.   
शाळेत शुध्द पिण्याचे पाणी अत्यंत आवश्यक झालेले आहे. शाळा स्तरावर पाणी व स्वच्छता संबंधी खालील मुद्दे विचारात घेतले जातात.
१)      पाणी पिंपात साठवल्यास उंचावर ठेवावे.
२)     पाणी घेण्यासाठी पिंपाला / मठाला नळ असावा.
३)      नळ नसल्यास पाणी घेण्यासाठी ओगराळे वापरावे.
४)    पाणी घेतांना हात स्वच्छ असावे.
५)     दररोज पिंप / माठ स्वच्छ धुवावे.
६)     पाण्याची टाकी असल्यास टाकी धुण्याचा दिनांक लिहावा.
७)     विद्यार्थी उंचीनुसार नळ/ तोटी  उंची ठरवावी.
८)     पिण्याच्या पाण्याचा व आसपासचा परिसर स्वच्छ असावा.
विद्यार्थी आरोग्य , शिक्षण व विकासाचा विचार करुन सदर सुविधा शाळेत उपलब्ध करुन देणे क्रमप्राप्त ठरते.
केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचना व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार
v  गावातील उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतामधून अन्न शिजविण्यासाठी प्रति विद्यार्थी  2  लिटर
v  स्वच्छतेसाठी प्रतिविद्यार्थी  5 लिटर
v  पिण्यासाठी प्रतिविद्यार्थी  2  लिटर याप्रमाणे पाणी आवश्यक आहे.
v  पिण्याच्या पाण्याची साठवण दररोज करावी. 
v  किमान 2000 लिटर पाण्याची क्षमता असलेली साठवण टाकी असावी. 
v  30 विद्यार्थ्यांसाठी  1 याप्रमाणे नळजोडणी असावी. 
v  पिण्याच्या पाण्याकरीता नळजोडणी ही बालकांची उंची विचारात घेऊन वेगवेगळ्या स्तरावर करावी. 
v  कायम स्वरुपी पिण्याचे पाणी व्यवस्था नसल्यास पाण्याची टाकी,  पिंप , माठामध्ये  साठवणूक करावी. 
v  ग्लास व  ओगराळे इत्यादी उपलब्ध असावे. 
v  सांडपाणी व्यवस्थापन ,  शोषखड्डा असावा.
2) हात धूण्याची सुविधा - अन्न वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहे. मानवी शरीराला कार्य करण्यासाठी, विकासासाठी व शरीराची झालेली झीज भरुन काढण्यासाठी अन्नाची गरज असते. अन्नामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळते. अन्न हे पोटात गेल्यानंतर त्यावर विविध प्रक्रीया होते. अन्नपचनाची क्रीया झाल्यानंतर अन्नाचा काही भाग शरीराला वापरण्यायोग्य राहत नाही. त्याला शरीर बाहेर काढते.  घन (मल),  द्रव (मूत्र व घाम) व वायू या स्वरुपात अन्नाचा नको असलेला भाग शरीराच्या बाहेर टाकला जातो. मल व मूत्रविसर्जनासाठी शौचालयाचा वापर केला जातो. अशावेळी विसर्जनासाठी ज्या शरीराच्या भागाचा उपयोग केला जातो त्या भागाची स्वच्छता करणे महत्वाचे असते.  शरीरातून बाहेर टाकल्या जाणा-या टाकाऊ घन व द्रव पदार्थात असंख्य जीवाणू, विषाणू , रोगजंतू व अपायकारक द्रव्य असतात. शौचास झाल्यानंतर संबंधित भागाची स्वच्छता करण्यासाठी  हाताचा उपयोग होतो. अशावेळी मानवी विष्टेमध्ये असंख्य रोगजंतू, जीवाणू, विषाणू, जंताची अंडी आपल्या हाताला चिकटतात. केवळ पाण्याने हात धूतल्याने हाताला चिकटलेले रोगजंतू दूर होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे शौचालयास जाऊन आल्यानंतर हात साबण किंवा हात धूण्याच्या द्रावणाने स्वच्छ धूणे आवश्यक असते. हात  स्वच्छ धूतला गेला नाही तर आपल्या हातावर असलेले रोगजंतू पोटात जाण्याची शक्यता असते. याबरोबरच आपल्या शरीरातील घाम हा त्वचेमार्फत बाहेर टाकला जातो. आपले संपूर्ण शरीर हे त्वचेने आच्छादलेले आहे. त्यामुळे संपूर्ण शरीरातून त्वचेच्या माध्यमातून  घाम बाहेर पडत असतो. तळहाताला देखिल घाम येत असतो. घामामधून देखिल शरीराला नको असलेले द्रव्ये बाहेर पडत असतात. याद्रव्यामध्ये शरीराला नको असलेले घटक असण्याची शक्यता असते. या बरोबरच घाम आल्याने शरीराला दुर्गंध येतो. जास्त वेळ घाम शरीरावर राहील्यास या घामात जीवाणू किंवा सुक्ष्मजीव जंतू निर्माण होण्याची शक्यता असते. तळहाताला सुटलेल्या घामातून निर्माण झालेले किंवा प्रदूषित वस्तूला हात लावण्याने हातावर आलेले हे जंतू जेवण घेतांना आपल्या पोटात जाण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी जेवणापूर्वी योग्य पध्दतीने हात धूणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वच्छ हात धुणे अत्यंत आवश्यक आहे. हात धुण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये लागावी याकरिता हात धुण्याच्या सुविधा प्रत्येक शाळेमध्ये असणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचना व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार
v  प्रत्येक शाळेत हात धूण्याची जागा/ हस्त प्रक्षलन केंद्र असणे आवश्यक आहे.
v  विद्यार्थी संख्या विचारात घेऊन हस्त प्रक्षलन केंद्र / तोट्या असावेत. (विद्यार्थी व नळतोटी प्रमाण 12 : 1)
v  हस्त प्रक्षालन द्रव्य किंवा साबण उपलब्ध असावा.
3) स्वच्छतागृहे – अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहे. मानवी शरीराला कार्य करण्यासाठी, विकासासाठी व शरीराची  झालेली झीज भरुन काढण्यासाठी अन्नाची गरज असते. अन्नामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळते.अन्न हे पोटात गेल्यानंतर त्यावर विविध प्रक्रीया होते. अन्नपचनाची क्रीया झाल्यानंतर अन्नाचा काही भाग शरीराला वापरण्या योग्य राहत नाही.  त्याला शरीरबाहेर काढते. घन (मल),  द्रव (मूत्र व घाम) व वायू या स्वरुपात अन्नाचा नको असलेला भाग शरीराच्या बाहेर टाकला जातो.  मल व मूत्रविसर्जनासाठी शौचालयाचा वापर केला जातो. अशावेळी विसर्जनासाठी ज्या शरीराच्या भागाचा उपयोग केला जातो त्या भागाची स्वच्छता करणे महत्वाचे असते.  शरीरातूनबाहेर टाकल्या जाणा-या टाकाऊ घन    द्रव पदार्थात जंताची अंडी, असंख्य जीवाणू, विषाणू, रोगजंतू व अपायकारक द्रव्य असतात. उघड्यावर शौचास केल्याने हे रोगजंतू पसरण्याची शक्यता असते. पाण्याच्या परीसरात उघड्यावर शौचास गेल्याने हे रोगजंतू पाण्यात जाऊन पाणी प्रदूषित होण्याची शक्यता असते. उघड्यावर शौचास गेल्यावर वातावरणामधील कीटक, माश्या या शौचावर बसतात. त्यानंतर अन्नावर बसतात.अशाप्रकारे प्रदूषित अन्न व  पाण्यातून पोटात गेल्यास विविधआजार होतात. उघड्यावर शौचास बसण्याच्या पध्दतीला आळाघालण्यासाठी प्रत्येक गावात, प्रत्येकघरात,  प्रत्येक शाळेत शौचालय असणे आवश्यक ठरते.
केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचना व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार
स्वच्छतागृह मुलांसाठी व मुलींसाठी 
v  60 विद्यार्थ्यांपर्यंत एक युनिट एक युनिट म्हणजे दोन मुताऱ्या व एक शौचालय.
v  60 ते 120 विद्यार्थी संख्या असल्यास एक युनिट म्हणजेच तीन मुताऱ्या व एक शौचालय.
v  पुढील प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे एक अतिरिक्त मुतारी आणि शंभर विद्यार्थ्यांमागे एक अतिरिक्त शौचालय असावे.
स्वच्छतागृह विशेष गरजा असणाऱ्या मुला-मुलींकरिता एकत्र
v   विशेष गरजा असणाऱ्या मुला-मुलींकरिता एकत्रित असलेल्या शौचालयामध्ये कमोड पद्धतीचे भांडे हंड्रेल तसेच रॅम्पची व्यवस्था असावी
v  सर्व शिक्षा अभियान अनुदानाचा वापर प्राधान्याने शौचालय देखभाल व दुरुस्तीसाठी करण्यात यावा तसेच शाळेच्या उपलब्धतेनुसार तात्पुरते शौचालय किंवा फिरते शौचालय ठेवण्यात यावे.
४) देखभाल व दुरुस्ती – शाळेतील पिण्याचे पाणी, हात धुण्याची सुविधा व स्वच्छतागृहे यांची नियमितपणे देखभाल व दुरुस्ती होणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा विचारात घेतल्यास पाण्याची दरवर्षी तपासणी करून घेणे आवश्यक ठरते.याबरोबरच शाळेत सांडपाणी व्यवस्थापन,परसबाग किंवा शोष खड्डा असावा. पिण्याच्या पाण्याची टाकी शक्यतो उंचावर असावी. पाणी पिण्यासाठी स्वच्छ ओगराळे, ग्लास  किंवा नळ असावेत. पिण्याच्या पाणी घेण्यासाठी आवश्यक असलेले नळ हे विविध उंचीवर असावेत त्यामुळे सर्वच उंचीच्या मुलांना सहज पाणी घेता येते. हात धुण्याची सुविधा निर्माण करतांना देखील विद्यार्थी उंचीचा विचार करावा.सांडपाण्याचे व्यवस्थापन करावे. दोन तोट्यामध्ये 1.5 फुट इतके अंतर असावे.हात धुण्यासाठी साबण किंवा द्रावण उपलब्ध असावे. स्वच्छतागृह हे शालेय इमारतीत किंवा इमारतीपासून 30 मीटर अंतरात असावे. स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हात धुण्यासाठी साबण उपलब्ध असावा. शालेय स्वच्छतागृह व मुतारी स्वच्छ ठेवण्यासाठी त्यामध्ये पाणी उपलब्ध असावे. मुतारीमध्ये 2.6 फुटापर्यंत ग्लेझ टाईल्स बसवलेल्या असाव्यात.वरील सर्वच सुविधांची देखभाल दुरुस्ती अत्यंत महत्वाची असते.
5) वर्तन बदल व क्षमता बांधणी -  स्वच्छता ही सवय होण्यासाठी विद्यार्थी , शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांची क्षमता बांधणी आवश्यक असते. त्यासाठी शाळेमध्ये नियमितपणे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात यावेत. याबरोबरच शाळा व्यवस्थापन समितीचे प्रशिक्षण आयोजित करावे. शालेय परीपाठामधून नियमितपणे स्वच्छता विषयक कामाचा सहभाग असावा.
वरील प्रमाणे पाच निकषावर शाळेने कार्य केल्यास शाळांना राष्ट्र / राज्य / जिल्हा पातळीवर होणा-या स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय पुरस्कारामध्ये सहभाग घेता येतो. स्वच्छता विषयक उपक्रमामुळे केवळ शाळेच्या भौतिक सुविधेतच वाढ होते असे नसून शाळेचा एकंदर गुणवत्ता विकास होण्यास मदत होते. प्रत्येक शाळा स्वच्छ व सुंदर होणे काळाची गरज आहे.

शिक्षणाची वारी या महत्वपूर्ण शैक्षणिक कार्यक्रमातून स्वच्छ भारत सुंदर शाळा उपक्रम राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या क्षमता बांधणीसाठी निवडला गेला. राज्यातील शिक्षणप्रेमी, संस्था, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी शिक्षणाच्या वारीमध्ये स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या स्टॉलला भेट दिली. स्वच्छता विषयक उपक्रम समजून घेतले. झिरो बजेट हॅंड-वॉश स्टेशन, कमी खर्चाचे स्वच्छतागृह, वैयक्तिक स्वच्छता या बाबी समजून घेतल्या व आपल्या शाळेत राबविण्याचा निर्धार केला. शिक्षणाची वारी  -या अर्थाने राज्यातील सर्व शाळांसाठी व समाजासाठी  प्रशिक्षणाचे प्रभावी व्यासपीठ ठरले आहे.

                                                                                                    असिफ शेख

                                                                                                कार्यक्रम अधिकारी ,

                                                                                    राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई.


No comments:

Post a Comment