प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
कार्यक्रम अंतर्गत शिक्षण परिषद माहे ऑगष्ट २०१९.
पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव - समरहिल (नील
ची शाळा )
लेखकाचे नाव - ए.एस.नील मराठी अनुवाद - हेमलता होनवाड.
प्रस्तावना - व्यक्ती, समाज व
राष्ट्राच्या जडणघडणीत पुस्तक, ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.
माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे उत्कृष्ट साधन म्हणून
ग्रंथांची उपयोगितता सर्वश्रुत आहे. म्हणूनच बौद्धीक विकासाचे शक्तीकेंद्र आणि
सामाजिक विकासाचे ऊर्जाकेंद्र म्हणून ग्रंथालयांची नितांत आवश्यकता आहे.
ग्रंथालयाचे अस्तित्व प्राचीन काळापासून आहे. प्राचीन भारतातील तक्षशीला व नालंदा
विद्यापीठे ग्रंथालयासाठी प्रसिध्द होती. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास त्याकाळी ग्रंथालायाद्वारे
करून घेतला जात असे. प्राचीन काळ ते आधुनिक काळ ग्रंथालयाचा प्रवास पाहता ग्रंथालय
हे शैक्षणिक व सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शैक्षणिक दृष्टीने अध्ययन
अध्यापन व मूल्यमापन पध्दतीचा पाया हा अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तकावर
अवलंबून असतो. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम हे शिक्षणाच्या तात्विक, मानसशास्त्रीय
अधिष्ठानानुरुप संदर्भीय पुस्तकामधून देश व समाजाच्या गरजेनुरुप, उद्दीष्टानुरुप
निवडलेले असतात. संदर्भ पुस्तके व संदर्भ ग्रंथ हे केवळ शिक्षणच नव्हे
तर एकूणच समाजजीवनासाठी
उपयोगी असतात. पुस्तके व संदर्भ
ग्रंथ प्रत्येक व्यक्ती, संस्था व शाळेच्या संग्रही असायला हवेत. समृध्द ग्रंथालयामधून
जीवनसमृध्द करणारी पुस्तके, संदर्भग्रंथ पाहावयास मिळतात. व्यक्तीच्या
जीवनात ग्रंथालयाला महत्त्वाचे स्थान असून ग्रंथालयसेवा मोफत मिळणे हा व्यक्तीचा
हक्क व राष्ट्राची जबाबदारी आहे.
भारत सरकारने ज्या पंचवार्षिक योजना आखल्या, त्यांमधूनही
ग्रंथालय चळवळीचे पाऊल पुढेच पडत गेले. पहिल्या पंचवार्षिक योजनेत सर्व राज्यांतून
सार्वजनिक ग्रंथालयपद्धती अस्तित्वात यावी,
अशी तरतूद करण्यात आली होती. दुसऱ्या
पंचवार्षिक योजनेत व तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुव्यवस्थित ग्रंथालय योजना हे
शिक्षण व्यवस्थेचे एक अंग होय हे मान्य करण्यात आले.चौथ्या पंचवार्षिक योजनेत
ग्रंथालयाबाबत करावयाच्या उपक्रमांचा सर्वांगीण विचार व्हावा, म्हणून
नियोजन आयोगाने भारतातील तज्ञ ग्रंथपालांची एक समिती नियुक्ती केली होती. पाचव्या
पंचवार्षिक योजनेच्या काळातही ग्रंथालयविकासाचा विचार करण्यासाठी एक समिती
नेमण्यात आली होती. यानंतर आलेल्या सर्वच पंचवार्षिक योजनामधून सुसज्ज आधुनिक
ग्रंथालायाद्वारे मनुष्यबळाचा विकास हे तत्व डोळ्यासमोर ठेऊन नियोजन केले गेले.
शालेय शिक्षणाच्या गुणवत्तावाढीमध्ये शालेय ग्रंथालयाचे योगदान फार
मोठे आहे. ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या साहित्यांचा अधिकाधिक वापर करण्यास
शिक्षक आणि विद्यार्थी यांना प्रवृत्त करणे आणि त्यांना आवश्यक त्या ग्रंथालय सेवा
उपलब्ध करून देणे हे शालेय ग्रंथालयाचे उद्दिष्ट असते. शालेय शिक्षणात शालेय
ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर होणे ही आजची शैक्षणिक गरज आहे. केवळ पाठय़पुस्तकांतून
दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून शिक्षणाची उद्दिष्टय़े साध्य होऊ शकत नाहीत. त्या
भागविण्याचे कार्य शालेय ग्रंथालय विधिध सेवांच्या आणि उपक्रमांच्या द्वारे पार
पाडू शकते. ग्रंथालयाने शिक्षक व विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावून त्यांना
आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले आणि त्याचा वापर करण्याचे शिक्षण दिले तर
स्वाभाविकच ज्ञानार्जनाची आवड निर्माण होते. शाळेतील सर्वच विषयाच्या अध्ययन
अध्यापन व मूल्यमापनासाठी ग्रंथालयाची मदत होते. विविध शैक्षणिक उपक्रमांचे
आयोजन करून पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करता येते. विविध पुस्तकांचे परीक्षण करून
त्याची माहिती शैक्षणिक उपक्रम, संमेलन व शिक्षण परिषदेमधून दिल्यास शैक्षणिक
गुणवत्ता विकासामध्ये मदत होते. म्हणूनच सध्या विविध शिक्षण परिषदांमधून पुस्तक
परीक्षण वा चर्चा घडवून आणल्या जात आहे. विविध शैक्षणिक प्रयोग यशस्वी केलेल्या
लेखकांची पुस्तके ही शिक्षण क्षेत्रामध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात.
विचारवंत, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना ही पुस्तके नेहमीच उपयोगी
ठरलेली आहे. आज प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रत्येक केंद्रामधून
शिक्षण परिषदांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये पुस्तक परीक्षण हा महत्वाचा विषय
घेण्यात आलेला आहे. पुस्तक परीक्षणासाठी समरहिल (नील ची शाळा ) हे पुस्तक देखील
निवडण्यात आलेले आहे. या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती प्रस्तुत लेखात देण्याचा
प्रयत्न केलेला आहे.
पुस्तकाचे
नाव - समरहिल (नील ची शाळा )
लेखकाचे
नाव - ए.एस.नील ( मराठी अनुवाद -
हेमलता होनवाड.)
लेखकाचा
परिचय - ए.एस.नील यांचा जन्म १८८३ साली
फार्फर , स्कॉटलंड येथे झाला. त्यांनी एडीन्बरा विद्यापीठामधून इंग्रजी विषयामध्ये
एम.ए. पदवी संपादन केली. त्यांनतर एक तप सरकारी शाळांमध्ये शिकविण्याचे काम केले.
१९२१ साली त्यांनी व त्याच्या सहकारी शिक्षकांनी मिळून एक आंतरराष्ट्रीय शाळा
ड्रेस्डेन येथे सुरु केली. पुढे इंग्लंडला परतल्यावर त्यांनी ही शाळा एका टेकडीवर
सुरु केली. या टेकडीवरुनच शाळेचे नाव समरहिल ठेवण्यात आले. त्यांच्या विचारावर फ्राईड, राईंश, होमर लेन यासारख्या विचारवंताच्या विचारांचा प्रभाव
होता. समरहिलमधील विद्यार्थ्यांचे लोकसत्ताक पध्दतीने चालणारे कामकाज लेनच्या
" लिटल कॉमनवेल्थ " वर आधारित होते. नील यांना स्वत:ला केवळ कामकरी म्हणून घ्यायला आवडत असत.
सर्व विद्यार्थ्यांमध्ये अलौकिक बुद्धिमत्ता असते यावर नील यांचा ठाम विश्वास
होता. प्रेम कराव, लढाई कशाला ? अशी घोषणा लिहिलेला बोर्ड त्यांच्या ऑफिसमध्ये
लावलेला असायचा. प्रेमाच्या शक्तीवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. त्यांच्या
शिक्षणाचा पाया हाच मुळी प्रेमावर आणि लोकशाही मूल्यांवर आधारलेला होता. जगभरात व
विविध देशात नील यांना भाषणासाठी बोलावण्यात येत असत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात
केलेल्या प्रयोगांना अतिशय प्रसिद्धी मिळाली. शिक्षकांचे सर्वात महत्वाचे काम
म्हणजे "मुलांच्या हृदयातील प्रेमाला आवाहन करणे" आणि ज्या शिक्षकाला
मुलावर निरपेक्ष प्रेम करता येते त्यालाच ते साध्य करता येते यावर त्यांची दृढ
श्रध्दा होती. नील हे दिवसा शाळेत शिकवायचे आणि रात्री लेखन करायचे. त्यांनी
आपल्या जीवन काळामध्ये ए डॉमिनीज लॉग, द प्रोब्लेम चाईल्ड , द प्रोब्लेम पारेंट, द
प्रोब्लेम टीचर, द प्रोब्लेम फेंमिली, द लास्ट मेंन अलाईव्ह , द फ्री चाइल्ड,
हार्ट्स, नॉट हेड यासारख्या विविध शैक्षणिक पुस्तकांचे लेखन केले. या पुस्तकामधील
चार पुस्तकांचा (द प्रोब्लेम चाईल्ड , द प्रोब्लेम पारेंट, द प्रोब्लेम
टीचर, द प्रोब्लेम फेंमिली
) सारांश एकत्रित करून समरहिल हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. खूप
लोकांनी हे गृहीत धरले होते की नीलच्या मृत्युनंतर समरहिल ही त्याची शाळा बंद
पडेल, पण समरहिल आजही फुलते आहे. या शाळेमधून नील चा स्वतंत्रतेचा संदेश चिरंजीव
राहील. निलच्याच शब्दात सांगायचे झाल्यास - " समरहिलचे भविष्य तितकेसे
महत्वाचे नाही, पण समरहिल या कल्पनेचे भविष्य मानवजातीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.
पुढच्या पिढयांना मोकळेपणाने वाढण्याची संधी दिली गेली पाहिजे. स्वातंत्र्य बहाल
करणे म्हणजे प्रेम बहाल करणे होय. आणि जगाला फक्त प्रेमच वाचवू शकणार आहे."
समरहिल - समरहिल ही अशी एक विलक्षण कल्पना आहे जिला या जगात
कधीही मरण येणार नाही. नील यांच्या पूर्वीही ती होती पण नील यांच्यामुळे ती
जबरदस्त शक्तीनिशी, गतिमान पध्दतीने, प्रभावीरीत्या समोर आली आहे. नील यांच्या नंतरही
जोपर्यंत माणूस जगतो आणि शिकतो आहे तोपर्यंत ती जगेलच अर्थात अणुस्फोटाने आपल्याला
जगू दिले तर असे समरहिलचे पाठीराखे म्हणतात.यावरूनच समरहिल विषयी जाणण्याची
उत्सुकता वाढते. जेंव्हा समरहिल- बाल संगोपनाचा पुरोगामी मार्ग हे पुस्तक १९६०
मध्ये प्रथम अमेरिकेमध्ये प्रकाशित झाले तेंव्हा एकाही पुस्तक विक्रेता आगाऊ
प्रतीची ऑर्डर देण्यास तयार नव्हता. आणि दहा वर्षानंतर मात्र या पुस्तकाच्या २०
लक्ष प्रती विकल्या गेल्या. अमेरिकेमधील जास्तीत जास्त विकले गेलेल्या पुस्तकाच्या
यादीत या पुस्तकाने अग्रक्रम मिळविला.सहाशेहुन अधिक विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये
हे पुस्तक वाचणे अनिवार्य करण्यात आले. त्यानंतर मात्र विविध देशामधून या
पुस्तकाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. शिक्षण क्षेत्रात अगदी अवघड वाटणारे विषय
मोकळेपणाने व शहाणपणाने यात हाताळले आहे. साधी , सरळ , मनाची पकड घेणारी शैली आणि
जागोजागी विनोदाची पखरण या पुस्तकात आहे. जर्मनी, ऑस्ट्रीया आणि इंग्लंडमधील
"समस्याग्रस्त मुलांसोबत " काम करतांना घडलेल्या भरपूर धक्कादायक
गोष्टींचा समावेश यात केलेला आहे. चोऱ्या करणारी, खोटे बोलणारी, गादीत शु करणारी,
रागाला आवर न घालता येणारी , स्वप्नांच्या दुनियेत रमणारी अशीच मुले नील आपल्या
शाळेत घेत असत. अशा मुलांना प्रेमाने वागवत असत. नीलच्या शाळेतील मुलांना आपल्याला
वाटत असलेल्या भीतीबद्दल बोलण्याची संधी मिळाली. आपली आक्रमकता योग्य पध्दतीने
प्रकट करता आली. आणि आपल्या स्वप्नांचा ती योग्य दिशेने विचार करू लागली. त्यामुळे
मुलांवरचे भावनिक दडपण कमी होउन त्यांचा उत्साह वाढला.याशिवाय एकमेकांना समजून
घेणे, सांभाळून घेणे या गोष्टींची आयुष्यात किती गरज असते याचा त्यांना प्रत्यक्ष
अनुभव मिळाला. समरहिलमध्ये समाज विरोधी कृत्याबाबत सर्व जण एकत्र येऊन निर्णय घेत असत.
प्रौढ व मुले यांना समान हक्क व जबाबदाऱ्या असत. जर मानसशास्त्राचा हेतू "बरे
करणे " हे असेल तर मानसशास्त्राने फक्त "दु:खातून मुक्त होणे " या
एकाच उद्देशाने काम करावे असे नील यांनी आपल्या द प्रोब्लेम चाईल्ड या पुस्तकाच्या
म्हटले आहे. शाळेतील कडक शिस्तीचे अनुकरण करण्यापेक्षा मुलांचे खेळगडी व्हावे असे
त्यांनी सुचविले आहे. समरहिल शाळेच्या तत्वाबद्दल बोलायचे झाल्यास "
विद्यार्थी आणि शिक्षक यांचे स्वयंशासन , तासाला जाण्याचे व न जाण्याचे स्वातंत्र्य
. खेळण्याचे स्वातंत्र्य , धार्मिक, नैतिक व राजकीय शिकवणुकी पासून मुक्तता , कोणी
दुसऱ्याने आपले चारित्र्य घडविण्यापासून मुक्तता." हे होय. एक स्वतंत्र
व्यक्ती आणि सामाजिक भान असणारा समाजघटक अशी मुले शिक्षणामुळे तयार व्हायला हवीत,
आणि स्वयं शासनामुळे हे नि: संशय घडून येते. सध्या शाळेत आज्ञाधारकपणा हा सदगुण
समजला जातो ,आणि तो विद्यार्थ्यावर इतका बिंबवला जातो की नंतरच्या आयुष्यात कशाला
तरी आव्हान देणारी माणसे जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच दिसून येतात.
आयुष्यभर दुसऱ्याने दिलेला आकार मोडून काढणे फार कठीण असते. आणखी एक पिढी मोठी
होते आणि ती नव्या पिढीवर तीच ती जुनी बंधने नीतिनियम आणि शैक्षणिक वेडेपणा लादते.
अशाप्रकारे हे दुष्टचक्र सुरु राहते. म्हणूनच समरहिलमध्ये विद्यार्थी स्वातंत्र्य
व स्वयंशिस्त अत्यंत महत्वाची मानली गेली आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या
प्रत्येक शिक्षक , मुख्याध्यापक व शैक्षणिक विचारवंतानी समरहिल एकदा अभ्यासणे
गरजेचे झाले आहे.
समरहिल
वाचण्यापूर्वी या पुस्तकाचे लेखक नील यांनी "पान उलटण्यापूर्वी " नावाचे
सदर लिहिले आहे आहे यात त्यांनी पुस्तकाबद्दल अत्यंत कमी शब्दात अत्यंत मोठा सार
सांगितला आहे.
पान
उलटण्यापूर्वी - मानवी जीवनाच्या आंतरिक उर्जेबद्दल आपल्याला अजून खुपच अज्ञान
आहे. मानसशास्त्रामध्ये कोणालाच फारसे काही माहिती नसते. फ्राईडची अलौकिक
बुद्धिमत्ता आणि जाण यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपणास ज्ञात झाल्या असल्या तरी ते एक
शास्त्र आहे. आजपासून ५० वर्षानंतर खूप मोठे बदल होणार आहे. बालकांचे विश्व खूप
वेगळे आहे. त्यामध्ये समस्या ग्रस्त बालक असल्यास त्याचे विश्व वेगळे असते.
समस्याग्रस्त मुले हे समस्याग्रस्त बनविले जाते ते त्याला मिळणाऱ्या चुकीच्या
वागणुकीमुळे. समस्याग्रस्त मुल हे असमाधानी मुल असते. त्याच स्वत:शीच युध्द सुरु
असते. त्याचा परिणाम म्हणून ते जगाशी युध्द पुकारते. समस्याग्रस्त मोठ्या
माणसाचेही असेच असते . कोणताच आनंदी माणूस सुव्यवस्थेचा भंग करीत नाही. युध्द
पुकारत नाही किंवा कायदा हातात घेत नाही. सर्व गुन्हे , युध्द आणि द्वेष यांच्या
मुळाशी असमाधानच सापडेल. असमाधान कस निर्माण होत, त्यान मानवी जीवन कस उद्ध्वस्त
होत आणि हे असमाधान मुळातच निर्मांण न होण्यासाठी मुलांना कस वाढवता येईल हे
मांडण्याचा प्रयत्न समरहिलमध्ये केला आहे. ही त्या समरहिल ची गोष्ट आहे जिथे
मुलांच असमाधान दूर करून त्यांना आनंदात वाढवलं जात.... त्या समरहिलची .......
ए.एस.नील
समरहिल
शाळा - समरहिल शाळा ही लंडनपासून १००
मैलावर आहे. वय वर्षे पाच पासून ते वय वर्षे पंधरा पर्यंतची मुले या शाळेत येतात.
शाळेत राहतात. मुलांचे वयानुसार तीन गट केले जातात. लहान गट वय वर्षे पाच ते सात
वर्षे , मधला गट वय वर्षे आठ ते दहा वर्षे, मोठा गट वय वर्षे अकरा ते पंधरा वर्षे.
मुलांची वयोगटानुसार राहण्याची व्यवस्था केलेली असते. प्रत्येक गटाबरोबर एक "आई"
राहते. एका खोलीत तीन ते चार विद्यार्थी राहतात. तर्कदृष्ट्या पाहिले तर समरहिल हे
असे ठिकाण आहे जिथे एखाद्याचे उपजत गुण आणि इच्छाशक्ती जर त्याला विद्वान होण्यास
अनुकूल असेल तर तो विद्वान होईल आणि ज्याची क्षमता रस्ते झाडण्याची आहे तो
झाडूवाला होईल. पण आजपर्यंत एकही झाडूवाला येथे तयार झालेला नाही. येथे शिकलेले
सर्वच विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या जीवनात यशस्वी ठरलेले आहे.
आहे तरी
कशी ही समरहिलची शाळा?
एक तर
तासाला बसने ऐच्छिक असते. मुळे तासाला बसू शकतात. किंवा बाहेर ही बसू शकतात.वेळापत्रक
आहे पण ते शिक्षकासाठी. बहुतेक वेळा मुलांचे तास त्यांच्या वयोगटाप्रमाणे
होतात.कधी कधी ते आवडीप्रमाणे पण होतात. जी मुल बालवाडीपासून समरहिलमध्ये येतात ती
सुरुवातीपासूनच तासाला हजर राहतात, पण जी मुळे इतर शालामधून येतात ती खेळतात,
सायकलिंग करतात. ती वर्गापासून दूर राहतात. कधी कधी हे अनेक महिन्यापर्यंत चालत.
आधीच्या शाळेने त्यांच्या मनात किती प्रमाणात तिरस्कार निर्माण केला त्यावर
त्यांना परत मार्गावर यायला किती काळ लागेल हे अवलंबून असते. सर्वात जास्त काळ
वर्गाबाहेर राहण्याचे रेकॉर्ड एका कॉन्व्हेट मधून आलेल्या मुलीचे आहे. तिने तीन
वर्ष इकडे तिकडे घालविले . साधारणपणे तासांचा तिटकारा घालविण्याचा कालावधी तीन
महिन्यांचा असतो. अशाप्रकारे विद्यार्थी जो पर्यंत विषयाच्या अभ्यासाला तयार होत
नाही तो पर्यंत त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. असे असले तरी समरहिलमध्ये
मुळे भरपूर शिकतात. शिक्षण पूर्ण करून गेलेल्या विविध विद्यार्थ्यांचे अनुभव
त्यांनी या पुस्तकात सांगितलेले आहेत. त्यापैकी एका अनुभवांचा उल्लेख याठिकाणी
करावासा वाटतो.
हुकुमशाही
विरोधात एका बालकाची प्रतिक्रिया - शाळेत असलेल्या शाळेच्या सरकारने राजीनामा
दिला. आणि निवडणुकीसाठी कोणीच उभ राहायला तयार होत नव्हत. यावर काही काळासाठी नील
यांनी सूचना लावली - "सरकारच्या अनुपस्थित मी स्व:तला हुकुमशहा जाहीर करत
आहे. नील चा विजय असो." यावर प्रतिक्रिया म्हणून सर्वत्र कुजबुज सुरु झाली.
दुपारी सहा वर्षाचा व्हिवियन नील यांच्याकडे आला आणि म्हणाला "नील , मी
जिममधील खिडकी फोडली आहे." नील हे कामात असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. व
त्यास जाण्याविषयी सांगितले. तो गेला. थोड्यावेळाने व्हिवियन परत नील यांच्याकडे
आला आणि म्हणाला "मी दोन खिडक्या फोडल्या आहेत." आता मात्र नील यांची
उत्सुकता वाढली आणि त्यांनी विचारले "व्हिवियन हे काय चालवल आहेस ?"
तेंव्हा तो म्हणाला की "मला हुकुमशहा आवडत नाही." मग आता तू काय करणार
आहेस ? नील यांनी विचारले . त्यावर "मी आणखी खिडक्या फोडणार आहे"
असे उत्तर व्हिवियनने दिले. "चालू दे" असे नील यांनी त्याला सांगितले . आणि व्हिवियन रागाने
पुन्हा निघून गेला. व्हिवियन
परत आला तेंव्हा त्याने जाहीर केले
की, त्याने सतरा खिडक्या फोडल्या आहेत. पण तो कळकळीने म्हणाला की तो याचे पैसे
भरून देणार आहे. नील ले त्याला विचारले की तो हे पैसे कसे उपलब्ध करणार त्यावेळी
त्याने आपण हे पैसे आपल्या पॉकेट मनिमधून देणार असे जाहीर केले. त्याच्या पॉकेट
मनी चा विचार करता सर्व पैसे भरून द्यावयास त्याला १० वर्ष लागणार होते. नील यांनी
ही कथा जेव्हा त्याच्या एका भाषणामधून सांगितली तेंव्हा एक तरुण त्यांच्या कडे चालत
आला आणि म्हणाला ही रक्कम त्या व्रात्य कार्ट्याच्या खिडक्यांसाठी. पुढे चालून तो
विद्यार्थी आपल्या जीवनात प्रसिध्द इंजिनियर म्हणून नावारूपाला आला.
अशाच
प्रकारे समस्याग्रस्त बालक, समस्याग्रस्त पालक, समस्याग्रस्त शिक्षक ,
समस्याग्रस्त कुटुंब अशा सर्व प्रकारच्या समस्या या पुस्तकात दिलेल्या आहेत. या
समस्या सोडवितांना आलेले अनुभव वाचतांना प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.
समरहिलमधील
शिक्षण आणि सर्व मान्य शिक्षण याबद्दल नील यांनी आपले विचार प्रखरपणाने मांडले
आहे. जीवनचे ध्येय आनंदाचा शोध हे आहे. शिक्षणामधून आपण जगावे कसे याची तयारी
व्हावी. आपली संस्कृती ही फारशी यशस्वी झालेली नाही. आपले शिक्षण , राजकारण, आणि
राजकारण हे संघर्षासाठी उद्युक्त करतात. औषधांनी रोगाचे समूळ उच्चाटन केलेले नाही.
धर्मामुळे अन्याय व अधर्म नाहीसा झालेला नाही. या युगाची प्रगती ही तांत्रिक
प्रगती आहे. रेडीओ, टेलिव्हिजन , इलेक्ट्रोनिक्स , मोबाईल, इंटरनेट , जेत
विमानाच्या रुपाने ती दिसत आहे. जागतिक युद्धाची दहशत आहेच कारण जगाची सामाजिक सद्सद्विवेक
बुद्धी अजूनही आदिमानवाच्या काळातीलच आहे. सध्या शाळांमधून फक्त पाठ्य पुस्तके
शिकविण्याचे कार्य सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थी विकास मर्यादित राहतो. शाळेमधले
शिक्षण किती कमी महत्वाचे असते हे लक्षात येईपर्यंत पालक खूप वेळ वाया
घालवतात.मुळे ही जे मोठ्यांनी शिकविले तेच शिकतात. सुयोग्य व्यक्तिमत्व विकासाला
बाजूला टाकतात. शाळेमध्ये पुस्तक हे सर्वात कमी महत्वाचे साधन आहे.कोणत्याही मुलाला
गरज आहे ती फक्त लेखन , वाचन आणि गणिताची . बाकी मग शाळेत वेगवेगळी शेतीची अवजारे
, वेगवेगळे काम करण्याची साधने , माती, खेळ, नाट्य, रंग असावेत आणि जोडीला पूर्ण
स्वातंत्र्य असावे असे नील म्हणतात. त्यांच्या समरहिल शाळेबद्दल त्यांनी केलेले
लेखन वाचतांना व्यक्तिमत्व विकासाच्या वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन होते.
स्वयंशासन,
सहशिक्षण, काम, खेळ, नाट्य, नृत्य आणि संगीत, मैदानी आणि इतर खेळ, मुलांचे संगोपन,
प्रेम आणि संगोपन, भीती, विध्वंसक वृत्ती , जबाबदारी, आज्ञाधारकता , शिस्त ,
बक्षीस आणि शिक्षा, आरोग्य आणि स्वच्छता , झोप, खेळ आणि खेळणी, विनोद, लैगिकता,
नैतिक शिक्षण, गुन्हेगारी, पालकांच्या समस्या, बालकांचे मानसशास्त्र अशा विविध
विषयावर या पुस्तकामध्ये सविस्तर व उपयोगी असे लेखन करण्यात आलेले आहे. या
पुस्तकाच्या वाचानामधून मुख्याध्यापक व शिक्षकांना या अनुभवाचा निश्चित असा फायदा होणार
आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने हे
पुस्तक एकदा जरूर अभ्यासावे.
पुस्तक परीक्षण सारांश
असिफ शेख.
दिनांक 31/08/2019
Asif Sir आपण पुस्तक वाचण्यासाठी उत्सुकता वाढवली. मस्त
ReplyDeleteखुपचं अभ्यासपूर्ण लेखन.
ReplyDelete