प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
कार्यक्रम अंतर्गत शिक्षण परिषद माहे सप्टेंबर २०१९.
पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव - टीचर
लेखकाचे नाव - सिल्विया ऐष्टन
वार्नर मराठी अनुवाद - अरुण ठाकूर
प्रस्तावना - माणसाची जात उन्नत व्हावी म्हणून जगातील बरीच माणसं
स्वत: हून धडपडत असतात. खुपत असतात.अशी धडपडत करा असं त्यांना कुणी सांगत नाही.
त्यांचं तेच ठरवतात की, आपण माणसांच्या उन्नतीच काम करू.त्यासाठी ते आयुष्यभर झटत
राहतात.प्रयोग करत राहतात.आणि नंतर हीच माणस सगळ्या जगाला प्रेरणा देणारी ठरतात.
अशाच एका मागास देशातल्या मागास समाजात शिक्षणाचे आदर्श प्रयोग करणाऱ्या एका बाईची
ही कहाणी .तिच्या जीवापाड राबण्याची , हाल -अपेष्ठा सोसण्याची पण शेवटी आपलं
स्वप्न जिद्दीने पूर्ण करण्याची ही रोचक कहाणी . सगळ्या मागास जगालाच प्रेरणादायी
ठरावी अशीच आहे. शिकायची आणि शिकवायची
इच्छा असलेल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला उपयोगी पडेल अशी एका जबरदस्त बाईची
आणि तिच्या प्रयोगांची ही चरीतगाथा आहे.
एखादे पुस्तक आपल्याला
जीवनातील प्रश्नांकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन प्रदान करते, तेंव्हा ते
पुस्तक नुसते पुस्तक उरत नाही तर जिवंत मार्गदर्शक बनते."समरहील",
"तोतोचान", "टीचर" ही शिक्षण क्षेत्रातील अशी तीन पुस्तके
आहेत. मुळात ती केवळ शालेय शिक्षण याविषयावरची पुस्तके नाहीतच तर ती एक जीवन विषयक
दृष्टीकोन घडविणारी पुस्तके आहेत. सिल्विया वार्नर यांचे टीचर हे पुस्तक न्यूझीलंड
मधील 'मावरी' या आदिवासी जमातीतील मुलांच्या शिक्षणाशी निगडीत आहे. मावरी ही
न्यूझीलंड मधील मुलाची आदिवासी जमात. या देशावर युरोपियन लोकांचे राज्य आहे. मावरी
व युरोपियन या दोन संस्कृती मध्ये सतत संघर्ष चालू असतो.या संघर्षामुळे मावरी मुले
ही कायम मागासलेली म्हणून गणली गेली. त्यांच्यासाठी वेगळ्या वाटेचा शोध घेणारा व
त्या वाटेने चालण्याचे धैर्य दाखवू शकणारा शिक्षक असणे गरजेचे होते. सिल्वियाच्याच
शब्दात सांगायचे तर, शिकविणे म्हणजे विद्यार्थ्यांशी लग्नच करणे असते. सिल्वियाचे
असे लग्न लागले होते.त्यामुळेच तिने या कामात आपले सर्वस्व ओतले. शिक्षणाबद्दल
बोलतांना सिल्विया यांनी मांडलेले विचार चिंतन करण्यास भाग पाडतात. शिकणे म्हणजे
माहीत नसलेले माहित होणे, व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहीत झालेले वापरता येणे,
वापरता येण्यासाठी ते आठवणे आणि शक्य झाले तर माहीत झालेल्यात काही भर घालणे यालाच
आपण शिक्षण म्हणतो. हे सारे माणसात नव्हे तर सर्व सजीवांच्यामध्ये उपजत असते.
त्यामुळे शिकणे ही एक खरी नैसर्गिक प्रक्रिया आहे. जे नैसर्गिक घडते, त्यातून आनंद
मिळतो. म्हणूनच शिक्षण ही आनंददायी घटना आहे. माणसाच्या जन्मापासूनच त्याची
शिकण्याची प्रक्रिया सुरु होते. म्हणूनच हल्ली अडीच वर्षे पूर्ण झाल्यावर मुलांना
प्ले गृपमध्ये / अंगणवाडीमध्ये घालतात. पूर्वी अशी काही व्यवस्था नसल्याने
विद्यार्थी ५ ते ६ वर्षे घरीच राहत असत. ही मुले घरामधील वातावरण मधून ऐकून,
पाहून, निरीक्षणाने व अनुकरणाने शिकत असतात. त्यामुळे अशा मुलांना शाळेत आल्यावर
वेगळे वातावरण आहे असे वाटू न देता त्याचे शिक्षण पुढे सुरु ठेवणे हे खरे
शिक्षकाचे कौशल्य असते. सिल्वियाने हे नेमकेपणाने ओळखून बालकांसाठी वेगळे शब्द ,
स्थानिक भाषा वापरून मुलांमध्ये आत्मविश्वासाची निर्मिती केली. टीचर या
पुस्तकामधून सिल्विया यांनी केलेले प्रयोग व आपले अनुभव मांडले आहे. म्हणूनच प्रत्येक शाळेच्या ग्रंथालयात हे
पुस्तक असणे गरजेचे वाटते.
शालेय शिक्षणात रोचक पुस्तकांचा
अधिकाधिक वापर होणे आजची शैक्षणिक गरज आहे. केवळ पाठय़पुस्तकांतून दिल्या जाणाऱ्या
शिक्षणातून शिक्षणाची उद्दिष्टय़े साध्य होऊ शकत नाहीत. त्या भागविण्याचे कार्य नाविन्यपूर्ण
उपक्रमांची पुस्तके, शालेय ग्रंथालय व विविध सेवांच्या आणि उपक्रमांच्या द्वारे
पार पाडू शकते. शिक्षक व विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावून त्यांना आवश्यक ते
साहित्य उपलब्ध करून दिले आणि त्याचा वापर करण्याचे शिक्षण दिले तर स्वाभाविकच
ज्ञानार्जनाची आवड निर्माण होते. शाळेतील सर्वच विषयाच्या अध्ययन अध्यापन व
मूल्यमापनासाठी पूरक वाचनाच्या पुस्तकांची , ग्रंथालयाची मदत होते. विविध
शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करता येते. विविध
पुस्तकांचे परीक्षण करून त्याची माहिती शैक्षणिक उपक्रम, संमेलन व शिक्षण
परिषदेमधून दिल्यास शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये मदत होते. म्हणूनच सध्या विविध
शिक्षण परिषदांमधून पुस्तक परीक्षण वा चर्चा घडवून आणल्या जात आहे. विविध शैक्षणिक
प्रयोग यशस्वी केलेल्या लेखकांची पुस्तके ही शिक्षण क्षेत्रामध्ये मार्गदर्शकाची
भूमिका बजावत असतात. विचारवंत, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना ही पुस्तके
नेहमीच उपयोगी ठरलेली आहे. आज प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत
प्रत्येक केंद्रामधून शिक्षण परिषदांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये पुस्तक
परीक्षण हा महत्वाचा विषय घेण्यात आलेला आहे. पुस्तक परीक्षणासाठी टीचर हे पुस्तक
देखील निवडण्यात आलेले आहे. या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती प्रस्तुत लेखात
देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
लेखकाचा परिचय - सिल्विया यांचा जन्म न्यूझीलंड येथे झाला. त्यांची
कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. सिल्व्हिया आणि त्यांचे पती यांनी मावरी
मुलांसाठी शिक्षणाचे कार्य सुरु केले त्यावेळी त्यांच्या समोर अनंत अडचणी होत्या.
सिल्वियाने शिक्षणात नवनवीन प्रयोग करण्याचे धाडस केले. सिल्विया विद्यार्थ्यांना
जे गृहपाठ देत असत ते "वाच, आठव आणि लिही" या प्रकारचे नव्हते.त्यात
कर्मेंद्रियांचा वापर करण्याची संधी होती. सिल्वियाच्या मते एकविसाव्या शतकात देशाला
हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीधरापेंक्षा
"हार्डवर्क युनिव्हर्सिटीच्या" पदवीधराची गरज आहे. श्रमप्रतिष्ठा ही
शिक्षणात अत्यंत आवश्यक बाब आहे. महात्मा गांधी यांनी देखील नई तालीम या शिक्षण
पध्दतीमध्ये ही संकल्पना मांडली होती. श्रमालये
ही गांधीजींची संकल्पना . ही
कार्यसंस्कृती जोपासण्यासाठी उपयुक्त आहे. शाळांच्या अभ्यासक्रमात श्रमप्रतिष्ठा
या संकल्पनेचा समावेश करणे गरजेचे आहे. हे सिल्वियाने आपल्या कार्यामधून दाखवून
दिले. त्यांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच गायन, वादन, नृत्य, नाट्य,कला,क्रीडा यांचा
समावेश अभ्यासक्रमात केला. कर्मेंद्रीयाच्या वापरातून ज्या प्रकारची बुद्धिमत्ता
जोपासली जाते त्याला कायनेस्थेटिक इंटलेजन्सी म्हणतात. अशाप्रकारची बुद्धिमत्तेची वाढ होण्यासाठी
शाळेमध्ये कर्मेंद्रियाचा वापर असणाऱ्या अनेक उपक्रमाची रेलचेल असली पाहिजे.
सिल्वियाने आपल्या शाळेत तेच केले. सर्जनशीलता व मानसिकता यावर जास्त लक्ष
केंद्रित केले. सिल्वियाने आपल्या जीवनाची सुरुवात शिक्षिका म्हणून केली.
व्यावसायिक गरज म्हणून १९२८ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी शिक्षकी पेशाचे प्रशिक्षण
त्यांनी पूर्ण केले. त्यांचे पतीदेखील शिक्षकच होते. १९३७ साली न्यूझीलंड मधील
सरकारने तिथल्या मावरी मुलांसाठी एक शैक्षणिक योजना सुरु केली होती. याच
योजनेमध्ये सिल्विया व तिचे पती यांनी आपल्या 'सर्जनात्मक शिक्षण' नावाच्या
प्रयोगाला प्रारंभ केला. शिक्षक झाल्यानंतर तिने कधीही आपले काम "पाट्या टाकू"
पध्दतीने केले नाही. इतकेच नव्हे तर तिचे काम आगळ्या वेगळ्या प्रकारचे ठरून त्याला
शैक्षणिक जगतात मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळाली.
'वाचाल तर वाचाल' ही घोषणा कायम सजीव राहण्यासाठी वाचनाची गोडी लावणे
हा कळीचा मुद्दा आहे. गोडी कशामुळे लागते? ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, भावतात
त्या करण्यास आपण उत्सुक असतो.
हे सूत्र सिल्विया यांनी पकडून
विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके त्यांच्या मदतीने तयार केली. मुलांनी तयार केलेली
पाठ्यपुस्तके वापरणे हा एक अभिनव प्रयोग आहे. भावनिक जीवनाशी लेखन व वाचन
जोडल्यामुळे या दोन्ही गोष्टी मावरी मुले सहजतेने चांगल्या प्रकारे शिकली.
ज्ञानभाषेवर प्रभुत्व असले की सर्वच विषय शिकणे मुलाला सोपे वाटते.म्हणून ती
उत्साहाने शिकतात.आपोआप शिक्षणातील नापासी व गळती कमी होते. मानसिक उभारी वाढते
आणि शिक्षणाची गाडी भरधाव जाते. मेंदू विकासाच्या बाबतीत देखील सिल्विया यांनी
आपले विचार स्पष्टपणे मांडले व मेंदू विकसनासाठी उपक्रम घेतले. मेंदूमध्ये
न्युरोन्सची संख्या जितकी जास्त , तितकी बुद्धी जास्त अशी समजूत पूर्वी होती. यात आता बदल झाला आहे. न्युरोन्सच्या
संख्येपेक्षा न्युरोन्समधील परस्परसंबंधाच्या जोडण्या (connections) जितक्या जास्त तितके तुम्ही अधिक बुद्धिमान . या
जोडण्या निर्माण होण्यासाठी मुलांना विविध प्रकारच्या अनुभूती देणे गरजेचे असते.
सिल्वियाने हे जाणून रोज निसर्गात फिरण्यासाठी वेळापत्रकात वेळ / तासिका निश्चित
केली. सिल्वियाच्याच भाषेत सांगायचे झाल्यास " प्रेरणा असेल तर कल्पनांची
टंचाई नसते." शालेय उपक्रमाप्रमाणे सहशालेय उपक्रमांचे महत्व ओळखून व सहज
शिक्षण पद्धतीचा प्रभावी वापर करून सिल्विया यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे
कार्य उभे केले. त्यांनी एकूण २४ वर्षे सेवा केली. या २४ वर्षाच्या कालवधीत
त्यांनी आपल्या शाळेत जे प्रयोग केले त्याच्या नोंदी ठेवलेल्या दिसून येतात. शालेय
अभ्यासक्रमाच्या मर्यादा ओळखून त्यांनी न्युझीलंड मधील मावरी मुलांचा स्वतंत्र
अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तयार केला. यामध्ये पायाभूत शब्दसंग्रह, मावारीच्या
बालवाडीत वाचनाच्या तयारीची मार्गदर्शक तत्वे , व्यक्तिगत आधारभूत शब्दावली
शिकविण्याचे तंत्र - मंत्र , सहज लेखन , जीवननिष्ठ सहज लेखनाचे तंत्र व मंत्र ,
मावरीची संक्रमण वाचनमाला , मावरी शाळेतील
जीवन , सहज वर्तन व्यवहार इत्यादी मुद्द्यांचा समावेश होता. वरील विषय सोबतच
त्यांनी त्यांना आलेले विविध अनुभवांचे टीचर या पुस्तकामध्ये लेखन केलेले आहे. हे
पुस्तक त्यांनी सुरुवातीला न्यूझीलंड मध्ये प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला पण तो
यशस्वी झाला नाही. सेवा निवृत्तीनंतर ७ वर्षांनी त्यांनी केलेल्या प्रयोगाबद्दल लेखन
करण्याबाबत अमेरिकेमधील एका प्रकाशनाने त्यांना विनंती केली. त्यानंतर त्यांनी
पुन्हा नव्या जोमाने आपण केलेल्या अनुभव व प्रयोगाबद्दल लेखन केले. या पुस्तकाचे
प्रकाशन अमेरिकेत १९६३ साली झाले. त्यानंतर भारतात हिंदीमध्ये झाले. त्यानंतर
मराठी आवृत्ती काढण्याचे महत्वपूर्ण कार्य श्री अरुण ठाकूर यांनी केले. सिल्विया
यांची शैक्षणिक उंची इतकी उत्तुंग कशामुळे
झाली असावी? हा प्रश्न उपस्थित होतो. शिक्षण क्षेत्रामध्ये नित्य नवीन प्रयोग
करणारे शिक्षक , अधिकारी व तज्ज्ञ यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे असेच आहे.
पुस्तकाची प्रस्तावना अत्यंत सोप्या भाषेत लिहिण्यात आलेली आहे.
प्रस्तावनेमधूनच पुस्तकामधील उपक्रमाची व लेखनाची कल्पना येते. प्रस्तावनेमध्येच
सर्जनशीलता व मानसिकता या संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
जीवनामधील ८० टक्के अपयश हे दुबळ्या मानसिकतेमुळे असते. जेंव्हा मानसिकता हरवते
तेंव्हा सर्जनशीलता तोंड लपवते. हे कोणीही मुद्दाम करत नसले तरी हे घडत असते
याबद्दल कोणाचे दुमत होण्याचे कारण नाही. साध्या साध्या व छोट्या छोट्या अयोग्य
घटनामधून मानसिकता मारली जाते, तशी ती योग्य घटनांमधून जोपासली पण जाते.
वर्गामध्ये एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले तर "तुला एवढी साधी अक्कल नाही
" हा सर्व वर्गादेखात मिळालेला शेरा त्या मुलाचे मन भाजून काढतो. त्यामुळे
वर्गात शिक्षकाने बोलातांना / अभिव्यक्त होतांना काळजी घ्याला हवी. अन्यथा तो
विद्यार्थी अपयशाच्या दुष्ट चक्रात अडकण्याची शक्यता असते. अशावेळी "तुझे
उत्तर बरोबर नाही, पण तू उत्तर देण्याचा प्रयत्न मात्र केलास, शांतपणे विचार करून
पुन्हा प्रयत्न केल्यास तुझही उत्तर बरोबर येईल. " असं संवाद घडल्यास
मुलाच्या मनाला उभारी वाढेल. यानंतर शिक्षकाने शिकविलेला पाठ्यभाग विद्यार्थ्याला
आकलन होण्याची शक्यता आहे. मनावर ताण आल्यास व्यक्तीची आकलनशक्ती, निर्णयशक्ती,
स्मरणशक्ती व सर्जनशीलता या दुबळ्या होतात. व्यक्तीची कार्यक्षमता नष्ट होते.
मानसिकता उत्तम राखल्यास अगदी सामान्य माणूससुद्धा असामान्य कृती करून दाखवितात.
मानसिकतेबद्दल एक अत्यंत समर्पक
उदाहरण प्रस्तावनेमध्ये देण्यात आलेले आहे. ते पुढीलप्रमाणे
न्यूझीलंड मधील एका वृत्तपत्रामध्ये
नोकरीसंबंधी जाहिरात आली ती अशी - 'अकाऊंटंटच्या तीन जागा भरणे आहे.' त्यापुढे
त्या जागेच्या पगाराचे स्केल दिले होते.त्याखाली शैक्षणिक पात्रता दिली होती . ती
अशी "अर्ज करणारे उमेदवार कमीत कमी तीन वेळेला "B.Com" नापास झालेले असले पाहिजेत.कृपया इतरांनी अर्ज करू नये . जास्त
वेळा नापास झालेल्यांना प्राधान्य देण्यात येईल.जाहिरात वाचून सर्वांना आश्चर्य
वाटले . तरीही अनेकांनी अर्ज केले. त्यातून तिघांची निवड करण्यात आली.यातला पहिला
पाचवेळा नापास झाला होता. दुसरा व तिसरा चार वेळा नापास झालेले होते. त्यांना
सन्मानाने कंपनीमध्ये वागविण्यात आले. एक तारखेला पगार पण झाला. आता या तिन्ही
मुलांना घरामध्ये पूर्वी कधी नव्हता एवढा मान सन्मान प्राप्त झाला. आमचा मुलगा
नोकरीला आहे अशा शब्दात आता त्यांच्या घरचे लोक त्यांची ओळख करून देत असत. एकंदरीत
नोकरी पूर्वीचे मानहानीचे वातावरण बदलून आता सतत कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. एक दिवस
कंपनीने त्यांना नोटीस दिली. पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला बसावे
लागेल आणि पास व्हावे लागेल अन्यथा तुम्हाला नोकरीवरून कमी करण्यात येईल अशी ती
नोटीस होती. नोटीस वाचून तिघेही खूप विचारात पडले. शेवटी त्यांनी परीक्षा दिली. या
परीक्षेचा निकाल काय लागला असेल ? ...... हे तिघेही चांगल्या मार्कांनी पास झाले
होते. माणसामध्ये असलेल्या दुबळ्या मानसिकतेमुळे ते क्षीण होतात. उच्च दर्जाची
मानसिकता फाटक्या माणसाच्या अंगातसुध्दा वाघाचे बळ देते. नापास झालो तर नोकरी
जाईल या विचाराने त्यांनी सर्वस्व पणाला लावले आणि अर्थातच यशस्वी झाले . ही झाली
सबळ मानसिकतेच्या यशाची कहाणी. सिल्विया यांनी कडक शिस्तीला नेहमी विरोध केला.
मनावर ताण नसलेले वातावरण हे सर्जनशीलतेला पोषक असते.कडक शिस्तीमधून विचारांची
देवाण घेवाण होऊ शकत नाही. विचारात विविधता येत नाही.त्यातून नवनिर्मिती होत
नाही.अशी शिस्त हवी कशाला ? मुळात शिकणे म्हणजे माहीत नसलेले माहीत होणे त्यात
विचाराची भर घालणे आणि काहीतरी नवीन निर्माण करणे होय. अशाप्रकारे पुस्तकातील
बहुतांश आशय व उपक्रमाची जाणीव लेखिकेने प्रस्तावानेमधून करून दिलेली आहे.
विद्यार्थी सर्वांगीण विकास म्हणजे
काय हे स्पष्ट करतांना सर्वांगीण विकास म्हणजे बौद्धिक , कायनेस्थेटिक, सामाजिक ,
भावनिक व अध्यात्मिक या घटकांचा विकास होय. सध्या सुरु असलेल्या शिक्षण
पद्धतीमध्ये केवळ बौद्धिक पैलूचा विचार केला जातो. सध्याचे शिक्षणाचे हे चित्र
बदलावयाचे असल्यास शिक्षक भूमिका महत्वाची ठरणार आहे. सिल्वियाने हे चित्र आपल्या
प्रयोगातून व कृतीतून करून दाखविले आहे. ज्ञानाचा विस्फोट झाल्यामुळे व जागतिक
स्पर्धेमुळे दिवसेदिवस अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढत आहे. दर दोन वर्षांनी ज्ञान
दुप्पट होत आहे. आणि दर सहा महिन्यांनी शिकलेले ज्ञान कालबाह्य होत आहे. वाढत्या
अभ्यासक्रमांना गवसणी घालण्याचे तंत्र ज्यांना अवगत नाही ते अपयशी होतात.
विद्यार्थी अशाप्रकारे अपयशी होऊ नये म्हणून सिल्वियाने शिकणाऱ्याची मानसिकता व
भावविश्व यांची व शिक्षणाची सुरेख सांगड घातली आहे.यातून तिने स्वत:चे शिकविण्याचे
तंत्र विकसित केले आहे. शिक्षण आनंददायी होण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून त्या
प्रमाणात यश मिळणे आवश्यक आहे. यश व आनंद यांचा संबंध सिल्वियाने स्पष्ट केला आहे.
देशाच्या प्रगती बद्दल बोलतांना
सिल्वियाने देशाची प्रगती व शिक्षण पध्दती यांचा संबंध सांगितला आहे.
"कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील शिक्षण पध्दती किती गतिमान आहे
यावर अवलंबून असते." तसेच गतिमान शिक्षणाची उंची ही त्याच्याशी संबंधित
असणाऱ्या शिक्षकांच्या विचारशक्तीवर व कृतिशक्तीवर अवलंबून असते. शिक्षकांचे बळ
वाढविण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणारे प्रभावी अभ्यासक्रम आयोजित करण्याची गरज
आहे. अशाप्रकारे देश विकास व शिक्षण यांचा संबंध मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
शिकविण्यातील आनंद नेहमीच मिळावा म्हणून शिक्षकाने काय करावे
यासाठी सिल्वियाने काही उपक्रम दिले आहेत.
१) शिक्षण व आपल्या आवडीच्या अन्य
विषयावरील पुस्तकांचे नियमित,भरपूर वाचन करावे. व्याख्याने , परिसंवाद ,
चर्चासत्रे , अधिवेशने यासारख्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा.
२) एखाद्या चांगल्या पुस्तकाचे
चर्चेसह सामुहिक वचन करावे. चांगल्या शिक्षकांना, शाळा व संस्था यांना भेटी
द्याव्यात.
३) एखाद्या गुणी शिक्षकाचे त्यांच्या
परवानगीने पाठ पहावे. आपले पाठ देखील पाहण्यास सांगावे.
४) दरवर्षी किमान एक नवीन प्रयोग
आपल्या शाळेत करावा.
टीचर पुस्तकातील प्रकरणाविषयी - सिल्विया
यांनी आपल्या पुस्तकामधून त्यांना आलेले प्रत्यक्ष अनुभव, केलेले प्रत्यक्ष प्रयोग
सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.पायाभूत शब्दसंग्रह या प्रकरणातून सिल्विया यांनी
मावरी मुलांसाठी त्यांच्या परिचयाच्या व दैनंदिन जीवनात नित्य वापरत असलेल्या,
ओळखीच्या शब्दाचा संग्रह केलेला सांगितला. ज्या मातीतून मुळे जन्मली त्याच मातीतील
शब्द हवे असे त्या आवर्जून सांगतात. चित्र रुपाने, गायन करून, नृत्य करून हे शब्द
त्या विद्यार्थ्यांना शिकवीत असत. विद्यार्थ्यांना हे शब्द आपले वाटत असत.
त्यामुळे शिकण्यात आनंद निर्मिती करता आली. शाळेत शिकवितांना त्या प्रत्येक मुलाला
जवळ जाऊन विचारत की, "आज तुला कोणता शब्द हवा आहे.?" यानंतर जो शब्द
विद्यार्थ्याने उच्चारला तो एका कार्डावर लिहीत असत.अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी
सांगितलेल्या शब्दांचे कार्ड संग्रहित केले जात असे. विद्यार्थी शब्द संग्रह व
विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या विषयावर पुस्तक तयार केले जात असत. याबरोबरच मावरीच्या
बालवाडीत वाचनाच्या तयारीची मार्गदर्शक तत्वे, व्यक्तिगत आधारभूत शब्दावली, मुलभूत
शब्दावली शिकविण्याचे तंत्र - मंत्र अत्यंत सोप्या भाषेत सांगितल्या आहेत. सहज
लेखन , सहज वाचन, संक्रमण वाचनमाला, सहज वर्तन व्यवहार यासारख्या प्रकरणामधून
आदर्श अशी शिक्षण पध्दती मांडलेली आहे. पुस्तकाच्या एका प्रकरणात सिल्विया यांनी
सर्जनशील विचाराचे महत्व अत्यंत मार्मिकपणे मांडले आहे. या प्रकरणात त्यांनी
सांगितले आहे की, सर्व विषयांना वळण मिळणे हे शिक्षकाला वरदान वाटते. त्यामुळे शिकविणे
ही केवळ आस उरत नाही, तर शिकणे ही सुध्दा विद्यार्थ्याची आस्था बनते. शिक्षक
आता विद्यार्थ्याच्या प्रवाहाविरुध्द नसतो तर त्यांच्या बरोबर असतो. हा प्रवाह आहे
मुलांच्या सर्जनशील शक्तीचा जोमदार प्रवाह. मानसिक शक्ती ही पृथ्वीच्या पाठीवरील
सर्व शक्ती स्त्रोतांपेक्षा बलवान असते. विध्वंस हा अव्यक्त जीवनाचा उद्रेक आहे.
याचा अर्थ मानसिकता ही केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरती मर्यादित बाब नाही. ती
आंतरराष्ट्रीय शांततेच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. युध्दजन्य परिस्थितीत राजकीय
नेत्यांनी एकमेकांशी बोलण्याच्या फेऱ्या
करीत बसण्यापेक्षा शाळामध्ये लक्ष केंद्रित करावे. कारण उग्र युध्द होणार की
शांतता नांदणार याचा निर्णय तिथे होणार आहे. तेथे मनाच्या सर्जनशील शक्तींची घडण
होणार आहे. या विश्वासाने मी सहज शिक्षणाकडे पाहते. हा शांतीच्या प्रस्थापनेसाठी
एका लहानसा प्रयत्न आहे.
अशाप्रकारे लेखिका सिल्विया
यांनी शिक्षणातून व्यक्ती विकास ते देशविकास कसा होतो हे सांगितले आहे तसेच जगात सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यासाठी
शिक्षण कसे असावे हे देखील सांगितले आहे. या पुस्तकाच्या वाचनामधून मुख्याध्यापक व
शिक्षकांना या अनुभवाचा निश्चित असा फायदा होणार आहे. त्यामुळे शिक्षण
क्षेत्रामध्ये कार्य करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक एकदा जरूर
अभ्यासावे.
पुस्तक परीक्षण (सारांश लेखन ) - असिफ
शेख ९८६०३८८०९६
No comments:
Post a Comment